पशुपालकांनो सावधान! जनावरांवरील गोचिडमुळे तुम्हाला जीवघेण्या तापाचा धोका

रुपेश खैरी
Tuesday, 29 September 2020

या रोगाचा प्रादुर्भाव यापूर्वी कोंगो, दक्षिण आफ्रिका, चीन, हंगेरी, इराण या देशांमध्ये झालेला आहे. हा रोग नैरो व्हायरसमुळे होत असून हा विषाणू मुख्यत्वे करून ह्यालोमा या जातीच्या गोचिडांद्वारे एका जनावरांपासून दुसऱ्या जनावराला व बाधित जनावरांपासून मानवांमध्ये संक्रमित होतो.

वर्धा : कोरोना संसर्गाशी सर्वसामान्यांचा लढा सुरू असतानाच पुन्हा ‘क्रिमीन कोंगो होमोरेजिक फिव्हर’ हे नवे संकट माणसाभोवती घोंगावत आहे. त्यामुळे सतर्कता बाळगण्याच्या सूचना आल्या आहेत. हा ताप माणसाला जनावरांपासून होत असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

गुजरात राज्यातील बोताड व कच्छ या जिल्ह्यांमध्ये ‘क्रिमीन कोंगो होमोरेजिक फिव्हर’ या रोगाचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये झाल्याचे आढळून आले आहे. हा रोग झुनोटिक स्वरूपाचा म्हणजे जनावरांपासून माणसांना होणारा असून जिल्ह्यातील पशुपालकांनी काळजी घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन अधिकारी प्रज्ञा डायगव्हाणे यांनी केले आहे. 

त्वरित निदान व उपचार न झाल्यास मृत्यूची भीती

या रोगाचा प्रादुर्भाव यापूर्वी कोंगो, दक्षिण आफ्रिका, चीन, हंगेरी, इराण या देशांमध्ये झालेला आहे. हा रोग नैरो व्हायरसमुळे होत असून हा विषाणू मुख्यत्वे करून ह्यालोमा या जातीच्या गोचिडांद्वारे एका जनावरांपासून दुसऱ्या जनावराला व बाधित जनावरांपासून मानवांमध्ये संक्रमित होतो. अशा वाहक जनावरांच्या संपर्कामध्ये आलेल्या मानवांना या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्‍यता आहे. मानवांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव अत्यंत घातक असल्याचे दिसून आले आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे बाधित व्यक्तींपैकी ३० टक्‍क्‍यांपर्यंत व्यक्ती त्वरित निदान व उपचार न झाल्यास मृत्यू पावण्याची शक्‍यता आहे. 

हस्त, चित्रा, स्वाती नक्षत्रही बसरणार; हवामान अभ्यासकाने वर्तविला अंदाज
 

आजाराची लक्षणे 

या रोगाने बाधित झालेल्या व्यक्तींमध्ये प्रारंभी डोकेदुखी, जास्त ताप येणे, सांधेदुखी, पोटदुखी, उलटी होणे, वगैरे लक्षणे दिसून येतात. आजारी व्यक्तींचे डोळे लाल दिसतात. घशात तसेच तोंडातील वरच्या भागाला लाल ठिपके दिसू लागतात. आजार बळावल्यास त्वचेखालील रक्तस्राव, नाकातून रक्तस्राव, लघवीतून रक्तस्राव अशी विविध लक्षणे दिसून येतात. काही रुग्णांमध्ये कावीळसारखी लक्षणे दिसतात. या रोगामध्ये मृत्यूचे प्रमाणे ९ ते ३० टक्‍के आहे. 
 

पेट्रोलपंप मालकाने केला कडक नियम, `नो मास्क नो पेट्रोल`!
 

संक्रमण कसे होते? 

सीसीएचएफ रोगाची लागण प्रामुख्याने, ज्या व्यक्तीचा व्यावसायिक कारणामुळे संक्रमित पशूंशी संपर्क येतो, अशा व्यक्तींना होण्याची शक्‍यता जास्त असते. पशुपालक किंवा पशुधन प्रक्षेत्रावर काम करणारे कामगार, पशुवैद्यकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्तींचा यात समावेश आहे. याशिवाय मानवी आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना देखील या रोगाची लागण होण्याचा धोका अधिक असतो. महाराष्ट्र गुजरातलगत असल्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव राज्यात होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. 
 

उपाययोजना 

खबरदारीची उपाययोजना म्हणून जनावरांवरील, शेळ्या-मेंढयांवरील व गोठ्यातील गोचिड आणि कीटकांचे उच्चाटन करावे. हा आजार पशूंचे कच्चे मांस खाल्ल्याने होऊ शकतो. त्यामुळे मांस चांगल्याप्रकारे शिजवून खावे. आजारी जनावरांवर उपचार करताना वापरलेल्या साहित्याचे निर्जंतुकीकरण करावे. आजारी जनावरांवर उपचार करताना पशुवैद्यकांनी हॅण्डग्लोव्ज, मास्क, संरक्षक चष्मा वापरावा. जनावरांच्या संपर्कात येत असणाऱ्या व्यक्ती शेतकरी, पशुपालक, पशुवैद्यक यांनी देखील योग्य ती काळजी घेणे आवश्‍यक आहे.

संपादन ः राजेंद्र मारोटकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beware, due to insects on the body of animals risk of danger fever