esakal | गडचिरोलीत नवरात्रोत्सवातही दारूची सर्रास विक्री सुरूच; मद्यपींचा आनंद द्विगुणित
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव काळात अनेकजण मांसाहार व मद्यपान वर्ज्य करतात. मात्र, काही मद्यप्रेमी सणाचा आनंद साजरा करण्याच्या नावाखाली मद्यपानाला पसंती देतात. जिल्ह्यात काही व्यक्ती छुप्या मार्गाने मोहाची दारूविक्री करीत आहेत. त्यामुळे भामरागड पोलिसांनी मुख्य मार्गावर छापा टाकून एका व्यक्तीकडून २० लिटर मोहाची दारू जप्त केली आहे.

गडचिरोलीत नवरात्रोत्सवातही दारूची सर्रास विक्री सुरूच; मद्यपींचा आनंद द्विगुणित

sakal_logo
By
लीलाधर कसारे

भामरागड (जि. गडचिरोली)  :  सध्या देशात नवरात्रोत्सवास सुरुवात झाली असतानासुद्धा काही दारूविक्रेते छुप्या मार्गाने अवैध्यरीत्या दारू वाहतूक करून इतर दारूविक्रेत्यांना दारू पुरवठा करीत आहेत. याबाबत माहिती मिळताच पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप भांड यांनी अशा तस्करांवर पाळत ठेवून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी एका तस्करावर कारवाई करीत २० लिटर मोहाची दारू जप्त केली.

रविवारी (ता. १९) सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास एक व्यक्ती दुब्बागुडा येथून मुख्य मार्गाने भामरागडकडे हातभट्टीची मोहाची दारू घेऊन येत असल्याबाबत माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक संदीप भांड यांनी पोलिस उपनिरीक्षक किरण उघडेंसोबत गजानन राठोड, गणेश मडावी यांना पाठविले.

अवश्य वाचा :  आता नरभक्षी वाघाला ठार माराच, शेतकरी संघटनेची मागणी

२० लिटर मोहाची दारू जप्त

भामरागड येथील आयटीआयजवळ त्यांनी पाळत ठेवली असता दुब्बागुडाकडून येणाऱ्या लालसू वंजा मुहंदा (वय ३०) रा. जुव्ही, ता. भामरागड यांच्याकडील थैलीची तपासणी केली. या थैलीत असलेल्या प्लॅस्टिक कॅनमध्ये २० लिटर मोहाची दारू आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध कलम-६५ (अ) महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भामरागड पोलिस करीत आहेत.

सर्रास दारूतस्करी व विक्री

गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अनेक ठिकाणी सर्रास दारूतस्करी व विक्री होत आहे. भामरागड पोलिसांनी नवरात्रोत्सव काळात पोलिस
अधीक्षक अंकित गोयल, अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक सोमय मुंढे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संदीप भांड यांनी सहकाऱ्यांसह ही कारवाई केली.

जाणून घ्या : चकमकीत ठार नक्षलवाद्यांवर होते १८ लाखांचे बक्षीस


सणाचा आनंद, दारू तस्कर सक्रिय

खरेतर गणेशोत्सव, नवरात्रोत्सव काळात अनेकजण मांसाहार व मद्यपान वर्ज्य करतात. मात्र, काही मद्यप्रेमी सणाचा आनंद साजरा करण्याच्या नावाखाली मद्यपानाला पसंती देतात. त्यामुळे नवरात्रोत्सव सुरू असला; तरी दारूची मागणी येत असल्याने तस्कर सक्रिय झाले असून दारूची तस्करी व विक्री करीत आहेत. पोलिस विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग वेळोवेळी दारूतस्कर व विक्रेत्यांवर कारवाई करत असला; तरी जिल्ह्याच्या विविध ठिकाणी दारूतस्करी व विक्री सुरूच असल्याचे दिसून येत आहे.
 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)