काळा करकोचा बघितलाय का, चला मेळघाटला, पर्यटकांचे आकर्षण

file photo
file photo

अचलपूर (जि. अमरावती) : मेळघाटच्या जंगलात नदी, तलावावर रंगीबेरंगी विदेशी पक्ष्यांचे आगमन मोठ्या प्रमाणात होत असते. यात काळा करकोचा या विदेशी पाहुण्याने पर्यटकांना चांगलीच भुरळ घातल्याचे दिसून येत आहे.

कोलकासजवळील सिपना, तापी खोऱ्यात काळा करकोचा पर्यटकांचे मन मोहून घेत त्यांना आकर्षित करीत आहे. परिणामी पर्यटकांची पावले व्याघ्रप्रकल्पाच्या जंगलाकडे वळत आहेत.

दिसायला अतिशय सुंदर व आकर्षक असलेला काळा करकोचा हा पक्षी गेल्या अनेक वर्षांपासून मेळघाटच्या जंगलात आढळून येत असून तो पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. राज्यात अस्तित्वात असलेल्या जंगलांपैकी मेळघाट जंगल पक्ष्यांसाठी अग्रणीय आहे.

उंच झाडावर घरटे

या पक्षाचे घरटे उंच झाडावर काटक्‍यांचे बनविलेले असते. करकोचा पक्षाची मादी एका वेळी तीन ते पाच पांढऱ्या शुभ्र रंगाची अंडी देते. हा करकोचा पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार व युरोपमधून मेळघाटच्या जंगलात येत असतो. मेळघाटच्या जंगलातील नद्यांत लहान-लहान मासोळ्यांचा पाहुणचार मिळत असल्याने हा पक्षी कोलकास येथील परिसरात हमखास आढळून येतो. परिसर या पक्ष्याचे निवासाचे ठिकाण बनले आहे.

करकोचा प्रेमाचे प्रतीक

भारतीय संस्कृतीमध्ये करकोचा पक्ष्याला मानाचे स्थान आहे. असे मानले जाते की वाल्मीकी ऋषींना सारस पक्षाच्या जोडीकडे पाहून काव्य सुचले आणि रामायणाची निर्मिती झाली. विशेष म्हणजे, हे पक्षी एकाच जोडीदाराबरोबर जीवन व्यतीत करीत असल्याने तसेच मेटिंगच्या वेळी मनमोहक नृत्य करीत असल्याने या पक्ष्यांना प्रेमाचे प्रतीक मानले जाते. राजस्थानमध्ये या पक्षाला अतिशय मानाचे स्थान असल्याने त्यांची शिकार केली जात नाही. असे मानतात की यापैकी एकाची शिकार केली तर तो अथवा ती जोडीदारासाठी झुरून प्राण त्याग करतो. परिणामी या पक्ष्यांना कोणीही शिकार करण्याचा विचारही मनात आणत नाही.

खाद्य मिळत असल्याने मुक्काम
मुबलक खाद्य मिळत असल्याने काळा करकोचा सध्या मेळघाटात मुक्कामाला आहे. मेळघाटच्या जंगलातील नदी-नाल्यांत कीटक, मासे मुबलक मिळत असल्याने आणि हेच खाद्य या करकोचा पक्ष्याचे असल्याने मेळघाटात हा पक्षी नेहमीच आढळून येतो.
- सम्राट मेश्राम, वनपरिक्षेत्र अधिकारी, व्याघ्रप्रकल्प, कोलकास.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com