हृदयद्रावक! तिला जगण्याने छळले; मृत्युनेही केली अवहेलना...वयोवृद्धेच्या मृत्यूची शोकांतीका

women died in washim district.jpg
women died in washim district.jpg

कारंजा (जि.वाशीम) : हातापायात ताकद होती तेव्हा पोटच्या गोळ्यांना जगविण्यासाठी कष्ट उपसले असतील. मुले मोठे झाल्यानंतर त्यांच्या कामधंद्याचा प्रश्न मिटवीत हात पिवळे करून देत त्यांच्या प्रपंच्याचा गाडा सजवून दिला असेल, यामध्येच आयुष्याची पुंजी खर्च झाली. 

उत्तर आयुष्याच्या सायंकाळी जगण्याचा आधार हवा असताना बेलमंडळ येथील वृद्ध कमलाबाईने स्थानिक बस स्थानकावर बेवारसरित्या अखेरचा श्वास घेतला. मात्र, तिच्या मृतदेहावरून प्रशासनाच्या शिलेदारांमध्ये खडाजंगी झाल्याने या ठिकाणी तब्बल सहा तास हा मृतदेह पडून होता. त्यामुळे जगण्याने तर छळलेच होते, अन् मृत्यूनंतरही अवहेलना पाठ सोडली नसल्याचे वास्तव शुक्रवारी (ता.22) समोर आले.

या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, वयाची पासष्टी उलटून गेली. खावे काय, कोणाचा आधार घ्यावा, कोरोना म्हणजे काय, याची या जीवाला भीती ना त्याची काही तमा. अशा, परिस्थितीत बेलमंडळ येथील कमला पांडुरंग मोडक ह्या गेल्या काही दिवसांपासून कारंजा शहरातील बस स्थानक परिसरात जगण्याच्या आकांताने पोटातील भूकेची आग शमविण्यासाठी परिसरात फिरत होती. 

मात्र, जेवणाची व्यवस्था न झाल्याने ती भूकबळीमुळे मृत्यूमुखी पडल्याची चर्चा आहे. तिला दोन विवाहित धडधाकडं मुले असून, तरीही जीवनाच्या प्रश्नाला उत्तर उरले नाही. घरच्यांचा आधार सुटून निराधार होऊन दारोदारी ठोकरा खात पायपीट करण्याशिवाय ठिगळलेल्या पदरी काहीच पडले नाही. अखेर, या कफल्लक मायेने बेवारसरित्या देह त्यागला. मात्र, तिच्या मृतदेहाची सुद्धा अवहेलना झाली.

कशी झाली अवहेलना?
बस स्टॅन्ड येथील फलाट क्रमांक 8 येथे एक वृद्ध महिला मृतावस्थेत असल्याची माहिती वर्तमानपत्र वितरक यांनी सर्वधर्म आपत्कालीन संस्थेला दिली. याठिकाणी ही चमू दाखल होताच त्यांनी मृत महिलेची ओळख पटवुन सदर, कमला पांडुरंग मोडक रा. बेलमंडळ वय 65 वर्षे असल्याची माहिती प्राप्त करून तिच्या आप्तेष्टांचा शोध घेत सदर घटनेची माहिती पोलिस प्रशासन आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य विभागाला दिली. मात्र, आरोग्य विभागाने घटनास्थळी येण्यास नकार दिला. तर, पोलिस प्रशासनाने पंचनामा केला. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठलीही सुरक्षा साधने नसल्याने मृतदेहाला हात न लावण्याचा पवित्रा घेतल्याने हा मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पोहचवायची जबाबदारी नेमकी कोणाची यावरून, खडाजंगी होत. सदर, महिलेच्या मृतदेहाची तब्बल सहा तास अवेहेलना झाली. अखेर, जिल्हा प्रशासनाने यामध्ये, हस्तक्षेप करीत तालुका प्रशासनाला आदेश देत महसूल, नगर पालिका व पोलिस यांनी समन्वयाने रुग्णालयात दाखल करीत शवविच्छेदनानंतर मृत वृद्ध महिलेवर स्मशानभूमी येथे अत्यंसंस्कार करण्यात आले.

यांनी केले अंत्यसंस्कार...
तहसीलदार धीरज मांजरे, पोलिस निरीक्षक सतीश पाटील, मुख्यधिकारी डॉ. अजय कुरवाडे, आरोग्य निरीक्षक विनय वानखडे, नगर परिषद कर्मचारी, सास प्रमुख श्याम सवाई, रुग्णवाहीका चालक सुमेद बागडे, ग्राम बेलमंडळ सरपंच सचिन एकनार, ग्राम सेवक सचिन राठोड, पोलिस पाटील गजानन वर, ग्राम रोजगार सेवक गजानन हिरोडे, मुलगा प्रकाश मोडक, पुरुषोत्तम मोडक व नातू रोहन मोडक, कोतवाल गजानन वानखडे हे हजर होते.

कुठल्या प्रशासन विभागाची कोणती जबाबदारी
उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी जबाबदारी आमची नाही, असे म्हणले. नंतर निवासी उपजिल्हाधिकारी हिंगे यांच्या माध्यमातून कारंजा नगर पालिका, पोलिस व महसूल विभागाच्या सहभागाने सदर मृतदेह उपजिल्हा रुग्णालय येथे पोहचले. या घटना क्रमात सहा तासाच्यावर कालावधी गेला. असे प्रसंग निर्माण झाल्यास कुठल्या प्रशासन विभागाची कोणती जबाबदारी आहे? हे स्पष्ट होणे आवश्यक वाटते.
-श्याम सवाई, सर्वधर्म आपत्कालीन संस्था, कारंजा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com