सांगा सरकार मुलांनी शिकायचे कसे, की ढोरंच राखायची?

सांगा सरकार मुलांनी शिकायचे कसे, की ढोरंच राखायची?

सिरोंचा (जि. गडचिरोली) : दीड-दोन वर्षांपासून शाळा बंद असल्याने मुलांचे शिक्षण ऑनलाइन सुरू आहे. परंतु, ज्या ठिकाणी मोबाईलवर बोलतानाच रेंज नसते, तिथे इंटरनेट तरी कसे चालणार? सिरोंचा तालुक्यात नेमकी हीच समस्या आहे. तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या १४८ गावांपैकी फक्त १२ गावांत बीएसएनएलची सेवा पोहोचली आहे. मोबाईल टॉवरच नसल्याने आणि असले तरी रेंज राहात नसल्याने मोबाईल बिनकामाचे ठरले आहेत. तालुक्यातील सिरोंचा, बामणी, झिंगानूर, रोमपल्ली, रेगुंटा, अमरावती, वडधम, सिरोंचा पोलिस स्टेशन, पेंटीपका, अंकिसा, आसराल्ली, पतागुडम या बारा गावांमध्ये बीएसएनएलची सेवा पोहोचली असली तरी ती केवळ नावापुरती आहे.

जेव्हाही कुणाला लावायला फोन हाती घेतला तर ‘डायल केलेला नंबर संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे; कृपया नंतर प्रयत्न करा’ हेच वाक्य ऐकू येत असल्याची नागरिकांची ओरड आहे. आदिमुत्तपूर ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात एकही खाजगी मोबाईल टॉवर नसल्याने नागरिकांनी मोबाईल कुलूपबंद केले. एकीकडे सरकार डिजिटल इंडियाचा नारा देते; तर दुसरीकडे ग्रामीण भागातील चित्र भयंकर आहे. गेल्या दोन वर्षांपासून मुलांचे शिक्षण बंदच असल्याने आमच्या मुलांनी कसे शिकायचे? की आमच्यासारखी गुरंढोरंच राखायची, असा अंतर्मुख करणारा प्रश्न येथील ग्रामस्थ व्यवस्थेला विचारत आहेत. सरकारने त्यांच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे.

सांगा सरकार मुलांनी शिकायचे कसे, की ढोरंच राखायची?
अवघी १५ हजारांची गुंतवणूक अन् झाले कोटींचे मालक

सिरोंचा तालुक्यात सध्या बीएसएनएलची एकमेव सेवा उपलब्ध आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांना मोबाईलची योग्य सेवा उपलब्ध होत नसल्याने बीएसएनएलची सेवा कुचकामी ठरली आहे. बीएसएनएलच्या बोगस सेवेमुळे ग्राहकांमध्ये संताप आहे. मोबाईल सेवा सुरळीत करण्याची मागणी सातत्याने होत आहे. तरीही सुधारणा होत नसल्याने नागरिक आता लगतच्या तेलंगणा राज्यातील जिओ, एअरटेल, आयडिया, वोडाफोन, रिलायन्सच्या सेवेकडे वळले आहेत. शहरातील बीएसएनएलची एकमेव सेवा नावापुरतीच आहे का, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. मोठा गाजावाजा करून केंद्र सरकारने या ठिकाणी सिरोंचा बसस्थानकालगत बीएसएनएलचे टॉवर उभारले. मात्र, सुरुवातीपासून ही सेवा शहरातील भ्रमणध्वनीधारकांसाठी डोकेदुखी ठरली आहे.

मोबाईलमध्ये नेट पॅक मारायचा तरी कशाला?

मोबाईलने दहा, बारा, पंधरा वेळा कॉल करण्याचा प्रयत्न केल्यानंतर एखादवेळी फोन लागतो. या टॉवरची इंटरनेटसेवा नावापुरतीच आहे का, असा प्रश्न शहर व ग्रामीण भागालगत असलेल्या आदिमुत्तपूर गावातील नागरिक विचारतात. कितीही प्रयत्न केले तरी इंटरनेटची चक्री सतत फिरत असल्याने मोबाईलमध्ये नेट पॅक मारायचा तरी कशाला, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जातो. बीएसएनएलच्या मोबाईलसेवेत सुधारणा होण्याऐवजी दिवसेंदिवस कुचकामी ठरत आहे. त्यामुळे याबाबतची नुकसानभरपाई देणार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या टॉवरची रेंज शहर व परिसरातील आसरअल्ली मार्गावरील राजीवनगरपर्यंत राहते. आल्लापली मार्गावरील कारसपल्ली ते नगरमदरम्यान दोन-तीन किलोमीटरपर्यंत एकही टॉवर नाही.

ऑनलाइन शिक्षणाचा फज्जा

आजचे युग इंटरनेटचे आहे. सध्या आॅनलाइन शिक्षणामुळे इंटरनेट अत्यावश्यक झाले आहे. मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने स्मार्टफोनची खरेदी केली. परंतु हे महागडे मोबाईल कुचकामी ठरले आहेत. सिरोंचा शहर व ग्रामीण भागात बीएसएनएलचा एकच मनोरा असल्याने सिरोंचा शहरात एक नवीन खाजगी टॉवर उभारण्यासाठी परवानगी दिली. हे टॉवर वॉर्ड क्रमांक ५ मध्ये उभारण्यात आले. मात्र, खाजगी टॉवरची रेंज दोन किलोमीटरनंतर येत नसल्याने ग्रामीण भागात लवकरात लवकर नवीन टॉवर उभारून शहर व ग्रामपंचायत आदिमुत्तपूरअंतर्गत येणाऱ्या मोबाईलधारकांना चांगली सुविधा मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे. रेंजच नसल्याने आॅनलाइन शिक्षणाचा तालुक्यात फज्जा उडाला आहे.

सिरोंचा तालुका राज्याचे व दक्षिण गडचिरोलीचे शेवटचे टोक आहे. या तालुक्यात आजही नव्वद टक्के गावे बीएसएनएल मोबाईल नेटवर्क सेवेपासून वंचित आहेत. सिरोंचा तालुक्यात मोबाईल वापरकर्त्यांची संख्या हजारोंच्या संख्येत आहे. अनेक गावांमध्ये मोबाईल टॉवर नसल्याने मोबाईलधारकांना तेलंगणाच्या मोबाईल सेवेवर अवलंबून राहावे लागते. संबंधित विभागाचा भोंगळ कारभार व लोकसंख्येनुसार तालुक्यात गरजेनुसार टॉवर न उभारल्याने आजही नव्वद टक्के मोबाईलधारक नेटवर्कच्या बाहेर असतात. एकीकडे सरकारकडून डिजिटल इंडियाचा ढिंढोरा पिटला जात असताना दुसरीकडे या तालुक्यातील नव्वद टक्के गावे आजही साध्या मोबाईल नेटवर्कपासून वंचित आहेत, ही राज्य व केंद्र सरकारसाठी लाजिरवाणी बाब आहे.
- रवी सल्लमवार, सामाजिक कार्यकर्ते, सिरोंचा
सांगा सरकार मुलांनी शिकायचे कसे, की ढोरंच राखायची?
मध्यान्ह भोजन : प्लॅस्टिकचा तांदूळ, छे हा तर पोषकच
सिरोंचा तालुक्यात आवश्यक ठिकाणी बीएसएनएलचे टॉवर उभारून मोबाईलधारकांना सुरळीतपणे सुविधा न दिल्यास आदिवासी विद्यार्थी संघाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. दिवसेंदिवस सिरोंचा शहरासह तालुक्यात बीएसएनएलची मोबाईल सेवा रेंगाळत आहे. याला सर्वस्वी अधिकारी-कर्मचारी जबाबदार आहेत. या क्षेत्राच्या खासदारांनी याकडे लक्ष द्यावे. अन्यथा या विभागाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध आदिवासी विद्यार्थी संघ रस्त्यावर उतरेल. सिरोंचा तालुक्यात बीएसएनएलची सेवा कुचकामी ठरत असल्याने अनेक विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित आहेत.
- बानय्या जनगाम, सिरोंचा तालुकाध्यक्ष, आदिवासी विद्यार्थी संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com