सावधान! शेतशिवारात "त्याचे' वास्तव्य... 

file photo
file photo

सिहोरा/चांदपूर (जि. भंडारा) : सातपुडा पर्वतरांगांतील चांदपूर जंगलात वन्यप्राण्यांचा मुक्त संचार आहे. या जंगलात परिसरातील गावकऱ्यांचे वास्तव्य वाढले आहे. तसेच चारा व पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावांच्या परिसरात येत आहेत.

यामुळे शेतातील पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जंगलाशेजारी असलेल्या गोंदेखारी शिवारात वाघाने ठाण मांडल्याचा अनुभव येथील गावकऱ्यांना आला आहे. 

वाघाच्या हल्ल्यात व्यक्ती जखमी 

शनिवारी सकाळी गावाजवळ असलेल्या नाल्यात वाघ दडून बसल्याची कल्पना गावकऱ्यांना नव्हती. सकाळी वाघाने डरकाळी मारली. त्यानंतर गावातील काही नागरिक नाल्याच्या दिशेने शोध करण्यास गेले. परंतु, झुडपात दडून बसलेला वाघ त्यांना दिसला नाही. परंतु, वाघाची डरकाळी ऐकू येत होती. त्यामुळे झुडपात शोध घेण्यासाठी गणेश बनकर गेला असता वाघाने त्याच्यावर हल्ला केला. यात तो जखमी झाला. त्यावेळी सोबत असलेल्या इतरांनी आरडाओरडा केला. त्यामुळे वाघ गणेशला सोडून जवळच्या शेताकडे पळून गेला. 

गावकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी 

जखमी गणेशला उपचारासाठी सिहोरा येथील ग्रामीण रुग्णालयात व नंतर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. गावाच्या शिवारात वाघ आल्याची माहिती बपेरा वनविभागाला देण्यात आली. सिहोरा पोलिसांनी घटनास्थळी येऊन गावकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. वनविभागाने परिसरात लोखंडी पिंजरा मांडून वाघाला जेरबंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 

जीवितहानी नाही 

गोंदेखारी शिवारात वाघाच्या उपस्थितीमुळे गावकऱ्यांत दहशत निर्माण झाली आहे. वाघ रात्रभर गावाजवळच्या नाल्यात होता, असे गावकरी सांगतात. याबाबत गावात वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला आहे. मात्र, आतापर्यंत या वाघामुळे अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com