CCI procures six crore quintals of cotton
CCI procures six crore quintals of cotton

कापूस खरेदी : शेतकरी सुखावला; तब्बल इतक्या कोटी क्विंटल खरेदी

Published on

नागपूर : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून देशात यावर्षी विक्रमी सहा कोटी क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. देशात यावर्षी सुमारे १९ कोटी क्विंटल कापूस उत्पादकतेचा अंदाज आहे. महाराष्ट्रात अद्यापही पणन महासंघाकडून कापसाची खरेदी होत आहे.

केंद्र सरकारने कापसाला यावर्षी ५५५० रुपये क्विंटलचा दर जाहीर केला होता. बाजारात मात्र हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांनी सीसीआय तसेच महाराष्ट्रात कापूस पणन महासंघाला कापूस विकण्यावर भर दिला. त्यामुळे दोन्ही यंत्रणांकडे कापसाची यावर्षी विक्रमी आवक नोंदविण्यात आली.

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यावर्षी देशभरात सुमारे पाचशे वीस लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. त्यापासून १०४ लाख गाठी तयार करण्यात आल्या. महाराष्ट्रात सीसीआयचा एजंट म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने कापूस खरेदीसाठी पुढाकार घेतला. सीसीआयने महाराष्ट्रात १४० लाख क्विंटल कापसाची खरेदी केली. पणन महासंघाची कापूस खरेदी आजवर ९५ लाख क्विंटल झाली आहे. या माध्यमातून सीसीआयचा ५२० लाख क्विंटल तर पणन महासंघाचा ९५ लाख क्विंटल अशी मिळून देशात सुमारे सहा कोटी क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आयात-निर्यात प्रभावित झाली आहे. त्याचा फटका कापसावर आधारित प्रक्रिया उद्योगालाही बसला आहे. कापूस गाठींना मागणी नसल्याने गेल्या वेळचा शिल्लक स्टॉक आणि यावर्षी तयार गाठींची विक्री करण्याचे आव्हान सीसीआय समोर आहे. त्यावर पर्याय म्हणून कापूस गाठीची विक्री सवलतीच्या दरात करण्यावर भर देण्यात आला आहे.

कापूस खरेदीसाठी सवलतीचा दर मिळावा यासाठी काही लाख गाठींच्या खरेदीची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. अशाप्रकारे गेल्या दीड महिन्यात तीस लाख गाठींची विक्री करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. यामध्ये यावर्षीच्या हंगामातील २६ लाख गाठींचा समावेश आहे. उर्वरित गाठी गेल्या हंगामातील असल्याची माहिती देखील देण्यात आली.

देशाची स्थिती

  • १९ कोटी क्विंटल उत्पादकता
  • ७ कोटी क्विंटल सीसीआय खरेदी
  • १३ कोटी क्विंटल खासगी खरेदी

सप्टेंबर महिन्यात पुन्हा खरेदी
देशात यावर्षी सुमारे सहा कोटी क्विंटल कापसाची खरेदी सीसीआयने केली आहे. पावसाच्या कारणामुळे महाराष्ट्रात सध्या खरेदी बंद असली तरी कापूस विक्रीसाठी आल्यास सप्टेंबर महिन्यात पुन्हा खरेदी सुरू करू.
- प्रदीप कुमार अग्रवाल,
अध्यक्ष, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड

१९ कोटी क्विंटल कापसाचे उत्पादन अपेक्षित
देशात यावर्षी १९ कोटी क्विंटल कापसाचे उत्पादन अपेक्षित आहे. सीसीआयने हमीभावाने सहा कोटी क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. उर्वरित खरेदी खासगी व्यापाऱ्यांकडून झाली आहे.
- गोविंद वैराळे,
ज्येष्ठ कापूस तज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com