esakal | पूर आला, पंचनामे झाले अन् काहीशी मदतही मिळाली; मग आता केंद्रीय पथकानं कशाची केली पाहणी?
sakal

बोलून बातमी शोधा

central government review team visit brahmpuri

30, 31 ऑगस्ट व एक सप्टेंबर या कालावधीत वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गोसीखुर्दचे 33 दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे ब्रह्मपुरी, मूल, सावली, गोंडपिपरी, सिंदेवाही या 5 तालुक्‍यांमध्ये कोट्यवधीचे नुकसान झाले आहे.

पूर आला, पंचनामे झाले अन् काहीशी मदतही मिळाली; मग आता केंद्रीय पथकानं कशाची केली पाहणी?

sakal_logo
By
साईनाथ सोनटक्के

चंद्रपूर : केंद्रीय पथकाने शुक्रवारी (ता. 25) जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्‍यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. पूर येऊन गेल्यानंतरच्या कालावधीत शासनाकडून पंचनामे पूर्ण झाले आहेत. आत्तापर्यंत 42 कोटींची मदत देण्यात आली. मात्र, तरीही पायाभूत सुविधांमधील अनेक मोठी कामे अपूर्ण असून यासाठी आणखी मदतीची गरज असल्याची मागणी नागरिकांनी पथकापुढे केली. मात्र, पूर ऑगस्टमध्ये आला आणि चार महिन्यानंतर केंद्रीय पथक कशाची पाहणी करायला आले, असाही सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

हेही वाचा - पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवड्याला झुकते माप? अमरावती विभागाला फक्त ९२ लाखांचा टंचाई...

30, 31 ऑगस्ट व एक सप्टेंबर या कालावधीत वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गोसीखुर्दचे 33 दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे ब्रह्मपुरी, मूल, सावली, गोंडपिपरी, सिंदेवाही या 5 तालुक्‍यांमध्ये कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. यासाठी तातडीने पंचनामे करून राज्य शासनाने आतापर्यंत 42 कोटी कोटींची मदत मंजूर केली. त्यापैकी 36 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत. राज्य शासनाने या पुरामध्ये झालेल्या जीवितहानी, पशुधनाचे नुकसान, पूरग्रस्त भागामधील पुनर्वसन, तात्पुरता निवारा, कृषी मालाचे नुकसान, पुरानंतर जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप,  दुकानदारांना मदत अशा अनेक घटकांमध्ये आतापर्यंत 36 कोटीचे वाटप केले आहे. उर्वरित 6 कोटी रुपयांचे  वितरण लवकरच करण्यात येत आहे.

हेही वाचा - मजुरांअभावी पांढरे सोने शेतातच, कापूस उत्पादनातही मोठी घट

ब्रह्मपुरी तालुक्‍यात राज्य शासनाने केलेले पंचनामे, त्यानंतर केलेली मदत, पायाभूत सुविधांमध्ये झालेले नुकसान त्यामध्ये करण्यात आलेली दुरुस्ती, आणखी पुढे लागणारी मदत या संदर्भात केंद्रीय पथकाने भेट देऊन पाहणी केली. यापूर्वी 11 ते 13 सप्टेंबर या कालावधीत पथकाने भेट दिली होती. आजच्या दुसऱ्या पाहणी पथकामध्ये पथकप्रमुख राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्लीचे सह सचिव रमेश कुमार घंटा, नवी दिल्ली येथील केंद्र सरकारच्या ग्रामविकास विभागाचे उपसचिव यश पाल, केंद्रीय वित्त मंत्रालयाचे आर. बी. कौल, कृषी विभाग नागपूरचे संचालक आर. पी. सिंग, नवी दिल्ली येथील रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे मुख्य अभियंता तुषार व्यास, जलशक्ती नागपूरचे अधीक्षक अभियंता महेंद्र सहारे यांच्यासोबत विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश  कुंभेजकर, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील, उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा व विविध विभागप्रमुख सहभागी झाले होते.

हेही वाचा - कॉंग्रेसच्या अधिवेशनापासून अधिक तीव्र झाली होती स्वातंत्र्य चळवळ; नागपूर अधिवेशनाला तब्बल १०० वर्ष...

कृषी, पायाभूत सुविधा, रस्ते व पूल यांचे नुकसान याची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकाने लाडज, पिंपळगाव, बेलगाव येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करून शेतकरी, गावकऱ्यांशी संवाद साधला. बोटीने प्रवास करीत पथकाने लाडज येथील नुकसान झालेल्या शेताची व घरांची पाहणी केली.