डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्हा बॅंकेसाठी मतदान होण्याची शक्यता; अधिकृत कार्यक्रमाकडे सर्वांच्या नजरा

चेतन देशमुख 
Saturday, 28 November 2020

कर्जवाटप, साहित्य खरेदी, नोकरभरती, विविध निविदा, भाड्याची वाहने आदी माध्यमांतून वार्षिक कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक तब्बल 12 वर्षांनंतर होत आहे

यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाची निवडणूक येत्या डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे. 12 डिसेंबरला मतदान व 13 डिसेंबरला मतमोजणी होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळेच आता चर्चांना उधाण आले असून, प्राधिकरणाच्या अधिकृत कार्यक्रमाकडे नेत्यांचे लक्ष लागले आहे.

कर्जवाटप, साहित्य खरेदी, नोकरभरती, विविध निविदा, भाड्याची वाहने आदी माध्यमांतून वार्षिक कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक तब्बल 12 वर्षांनंतर होत आहे. बॅंकेत संचालक म्हणून जाण्यासाठी अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यासोबतच राजकीय पक्षांनीही आपली सत्ता यावी, यासाठी कंबर कसली आहे. राज्यातील सत्तासमीकरण बदलल्यानंतर भाजप बॅंकेवर सत्तास्थापित करण्याच्या प्रयत्नात आहे. 

जाणून घ्या - पन्नासावर सुवर्णपदके जिंकून देणारी आंतरराष्ट्रीय महिला पॉवरलिफ्टरला करावा लागतोय हा व्यवसाय

दुसरीकडे महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तिकीट वाटपावरून झालेल्या गोंधळाने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान संचालकांनी बंडाचा झेंडा उचलला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या एकूण 21 संचालकांच्या पदांसाठी निवडणूक होणार आहे. गेल्या 26 मार्चला निवडणूक होऊ घातली होती. मात्र, कोरोनामुळे निवडणूक स्थगित करण्यात आली. जिल्ह्याच्या राजकारणाच्यादृष्टीने शेतकऱ्यांची बॅंक व त्यावरील सत्ता महत्त्वाची आहे. 

जिल्हा बॅंकेची स्थगित झालेली निवडणूक येत्या 12 डिसेंबरला होण्याची शक्‍यता आहे. तशी चर्चा शुक्रवारी (ता.27) दिवसभर राजकीय वर्तुळात होती. अनेक संचालकांनीही निवडणुकीच्या तारखेला दुजोरा दिला असून, 13 डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता प्राधिकरणाकडून अधिकृत कार्यक्रमाची प्रतीक्षा अनेकांना लागली आहे.

हेही वाचा - काय सांगता! आज रविवार आहे, अंत्यसंस्कार विधी होणार नाही! ही आहे अडचण

आदेशाची प्रतीक्षा

डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात कुठल्याही परिस्थितीत निवडणुका होण्याचे संकेत मिळत आहेत. शुक्रवारी (ता.27) निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, असा अंदाज होता. त्यामुळे निवडणूक कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रात्री उशिरापर्यंत निवडणूक लढणारे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या संपर्कात होते.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chances of District bank elections in december second week