सर्वाधिक रुग्णवाहिकांच्या संख्येत चंद्रपूर जिल्हा राज्यात दुसरा

श्रीकांत पेशट्टीवार
Friday, 30 October 2020

लोकार्पणानंतर सर्व रुग्णवाहिका ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांमध्ये सेवेसाठी दाखल होणार आहेत. पुणे जिल्ह्यानंतर सर्वाधिक रुग्णवाहिका असलेला चंद्रपूर जिल्हा राज्यात दुसरा ठरला आहे

चंद्रपूर  : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रुग्णांवर तातडीने उपचार व्हावा यासाठी रुग्णवाहिकांची मोठी आवश्‍यकता असते. त्यामुळे खनिज विकास निधीतून जिल्ह्यासाठी तब्बल ३८ रुग्णवाहिका खरेदी केल्या. या रुग्णवाहिकांचे लोकार्पण गुरुवारी (ता. २९) येथे करण्यात आले. 

लोकार्पणानंतर सर्व रुग्णवाहिका ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांमध्ये सेवेसाठी दाखल होणार आहेत. पुणे जिल्ह्यानंतर सर्वाधिक रुग्णवाहिका असलेला चंद्रपूर जिल्हा राज्यात दुसरा ठरला आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. गुरुवारी (ता. २९) पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या हस्ते सर्व ३८ रुग्णवाहिकांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. 

कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मार्च महिन्यांत देशासह राज्यात कोरोनाने एन्ट्री केली. मात्र, तब्बल तीन महिने जिल्ह्यात एकही रुग्ण आढळला नाही. नंतर हळूहळू रुग्णसंख्या वाढू लागली. आजघडीला १३ हजारांवर रुग्णांची संख्या पोहोचली आहे. 

हेही वाचा - ...अन् शोकाकुळ नातेवाईक मृतदेह विसाव्यावर सोडून सैरावैरा पळू लागले

 

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कोरोना व अन्य आजारांच्या रुग्णांवर तातडीने उपचार व्हावा यासाठी आरोग्य यंत्रणेत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. खनिज विकास निधीच्या माध्यमातून सुमारे १३ ते १४ कोटी रुपये खर्च करून ३८ रुग्णवाहिका खरेदी केल्या.

नक्की वाचा - कोरोनाकाळात दिवसभर कोमट पाणी पिताय? जरा थांबा. तुमच्या शरीरावर होऊ शकतात परिणाम
 

या रुग्णवाहिकांमध्ये सर्व सुविधा असून, त्या वातानुकूलित आहेत. ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांत या रुग्णवाहिका दाखल होणार आहेत, अशी माहिती यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

संपादन ः राजेंद्र मारोटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrapur district has the second highest number of ambulances in the state