सात वेळा झाला शरीराचा सौदा, जिवंतपणीच भोगाव्या लागल्या नरकयातना

human trafic
human trafic

चंद्रपूर : चंद्रपुरातील बंगाली कॅम्प परिसरातील काली मंदिरात खेळत असताना एका दहा वर्षीय मुलीला गुंगीचे औषध देवून थेट हरियानात विक्री करण्याचे खळबळजनक प्रकरण तब्बल दहा वर्षांनंतर उघडकीस आले. दरम्यानच्या काळात दलालांनी या मुलीचे सात लग्न लावून दिले. तिच्याकडून देहविक्रीही करवून घेतली. दोन मुलांचे मातृत्व लादले. अखेर या मानवी व्यापाराचे बिंग फुटले व चार दिवसांपूर्वी चंद्रपूर पोलिसांनी या मुलीला हरिणायातील फतेहबाद येथून परत आणले. तिची विक्री करणाऱ्या चंद्रपुरातील दोन महिलांना पोलिसांनी अटक केली असून यानिमित्ताने मानवी तस्करीचे मोठे रॅकेट पोलिसांच्या हाती लागण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

कविताचा (नाव बदलले आहे) चंद्रपूर ते हरियाना हा प्रवास थरकाप उडविणार आहे. चार जून 2010 रोजी मंदिरात मैत्रिणींसोबत खेळत असताना कविताला प्रसादातून गुंगीचे औषध दिले. बेशुद्ध अवस्थेतच तिला चंद्रपुरातील जान्हवी नामक महिलेने थेट रेल्वेने हरियानात नेले. तेव्हा ती फक्त अकरा वर्षांची होती. प्रवासात पानिपत रेल्वेस्थानकावर कविता शुद्धीवर आली. अनोळखी व्यक्ती आणि ठिकाण बघून ती रडायला लागली. तेव्हा परत तिला पाण्यातून गुंगीचे औषध दिले गेले. बेशुद्धावस्थेत असलेल्या कविताला जान्हवीने हरियानातील नारायणगढ येथील सपना नामक महिलेकडे नेले.

15 हजारांत विक्री, सात लग्न, कोवळ्या वयात दोन अपत्ये
त्यानंतर कविताला करनालमध्ये दोघांना विकण्यात आले. त्या ठिकाणी तिच्यावर आठ युवकांनी शेतातील घरात तब्बल चार दिवस सामूहिक अत्याचार केला. इकडे चंद्रपुरात कविताच्या कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. शेवटी 16 जून 2010 रोजी मुलगी हरविल्याची तक्रार रामनगर पोलिसात दाखल केली. पोलिसांनी काही काळानंतर प्रकरण फाईलबंद केले.

थरकाप उडवणारा प्रवास
तिकडे हरियानात कविताच्या नरकयातना सुरू झाल्या होत्या. वीस-पंचवीस हजारात सपना कविताची विक्री करायची. या काळात कवितांचे सात जणांशी लग्न लावून देण्यात आले. नाव लग्नाचे होते. मात्र काही काळापुरते तिला संबंधित व्यक्ती ठेवून घ्यायचा. त्यानंतर परत दुसऱ्याकडे पैशाच्या मोबदल्यात लग्नाच्याच नावावर तिची रवानगी व्हायची. 13 वर्षांची असताना 2012 मध्ये कविताने मुलीला जन्म दिला. दोन वर्षांनी परत मुलगा झाला. या काळात तिने अनेकदा पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात ती यशस्वी झाली नाही. उलट पळून जाण्याची शिक्षा म्हणून तिला कित्येक दिवस उपाशी ठेवून मारहाण केली जायची.


दीड महिन्यांपूर्वी फतेहबाद येथील धर्मबीर नामक व्यक्तीने तिची दीड लाख रुपयांत लग्नासाठी खरेदी केली. धर्मबीरच्या शेतातील घरात तिला डांबून ठेवले. त्याठिकाणी धर्मबीरचा भाऊ राकेश आणि कृष्णाने तिच्यावर अत्याचार केले. काही दिवसानंतर सपनाने तिला शेतातून हलवले व फतेहबाद येथील एका भाड्यात घरात ठेवले. मात्र, सपनाच्या हालचालींचा घरमालकाला संशय आला. त्याने कविताची विचारपूस केली. तेव्हा प्रकरणाचे गांभीर्य कळले. त्यांनी स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली आणि तिची सुटका झाली.

मानवी तस्करीचे रॅकेट उघडकीस
हरियाना पोलिसांनी चंद्रपुरातील रामनगर पोलिसांना याची माहिती दिली. रामनगर पोलिस थेट हरियानात गेले आणि तिला 2 जानेवारी 2020 रोजी चंद्रपुरात आणून कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. कविताने तिच्या दोन्ही मुलांना सोबत आणले नाही. अनेक पुरुषांनी अत्याचार केला. त्यामुळे झालेली मुले कुणाची हे सुद्धा तिला माहित नाही, असे तिने पोलिसांना सांगितले.

बारा अटकेत
कविताने दिलेल्या माहितीवरून रामगनर पोलिसांनी काल सोमवारला रात्री जान्हवी (वय 42) आणि सावित्री (55) या दोघींना अटक केली. हरियाना पोलिसांनीही याप्रकरणात दहा लोकांना अटक केली आहे. जान्हवीने केवळ 10 ते 15 हजार रुपयात कविताची विक्री केल्याचे पोलिसांचे सांगितले. अटकेतील दोघांनाही 10 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. याप्रकरणात आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्‍यता आहे. मानवी तस्करीच्या याप्रकरणाचे तार झारखंडसोबत जुळले असल्याचे समजते.

हरविलेल्या मुलींच्या तक्रारींची तपासणी
मानवी तस्करीचे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिस यंत्रणाही सतर्क झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यात मागील दहा वर्षांत हरविलेल्या मुलींच्या संदर्भातील तक्रारींची शहानिशा करण्याचे काम सुरू केले आहे. अटकेतील दोन्ही महिला आरोपी मानवी तस्करीतील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडून आणखी बऱ्याच मुलींची विक्री केल्याची जाण्याची शक्‍यता पोलिसांना आहे. त्यामुळे या टोळीतील आरोपी पसार होऊ नये, यासाठी याप्रकरणात पोलिस कमालीची गोपनीयता बाळगून आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com