चिखलदऱ्याचा रस्ता गेला खड्ड्यात, आमदारांवरच आली आंदोलनाचा इशारा देण्याची वेळ

नारायण येवले
Wednesday, 27 January 2021

दोन वर्षांअगोदरपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे काम एका कंपनीला दिले होते. या कंपनीने परतवाडा ते धामणगावगढी 10 किलोमीटर रस्ता बनवला.

चिखलदरा (जि. अमरावती) : सार्वजनिक बांधकाम विभाग व वनविभागाच्या आपसी वादात विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा रस्त्याची वाट लागली आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनाच या रस्त्यासाठी आंदोलनाचा इशारा देण्याची वेळ आली. त्यामुळे आता रस्त्यासाठी कोणाला मागणी करावी? असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. 

हेही वाचा - वाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन

बहुतांश पर्यटकांना परतवाडामार्गे चिखलदऱ्याला यावे लागते. परतवाडा ते चिखलदरा हे अंतर 31 किलोमीटर आहे. हा रस्ता मागील दोन वर्षांपासून अतिशय खराब झाला असून, धामणगावगढीनंतर खड्ड्यांतूनच वाहने न्यावी लागतात. त्यामुळे या मार्गाने वाहने चालविणे कठीण होऊन बसले आहे. 31 किलोमीटर प्रवास करण्यासाठी एक ते दीड तास लागतो व वाहनांचेसुद्धा नुकसान होते. त्यामुळे चिखलदरा पर्यटनावर याचा परिणाम होत आहे. 

दोन वर्षांअगोदरपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे काम एका कंपनीला दिले होते. या कंपनीने परतवाडा ते धामणगावगढी 10 किलोमीटर रस्ता बनवला. परंतु, इतर 20 ते 25 किलोमीटर रस्ता वनविभागाच्या हद्दीतून जात असल्याने या रस्त्याची परवानगी वनविभागाने दिली नाही. त्यामुळे रस्त्याचे काम रखडले. आता या रस्त्याची परवानगी मिळाली तर कंपनी काम करायला तयार नाही. या सर्व भानगडीत चिखलदरा-परतवाडा रस्त्यावरून प्रवास करताना पर्यटकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. आता दुसरी एजन्सी नेमून कामाला सुरुवात होणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

हेही वाचा - पुलगावरून नागपूरला निघाले कुटुंब, पण वाटेतच मायबापांसह नवऱ्यावर काळाचा घाला

शहरातही खड्डेच खड्डे -
चिखलदरा शहरात प्रवेश करताच पर्यटनाचा आस्वाद घेण्यासाठी आलेल्यांचा मुख्य रस्त्याच्या खड्ड्यांमुळे हिरमोड झाल्याशिवाय राहत नाही. हा रस्तासुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत असल्याने नगरपरिषददेखील हतबल झाली आहे. 
चिखलदरा-परतवाडा रस्ता अतिशय खराब झाला आहे. हा प्रश्‍न पर्यटकांसह मेळघाटातील जनतेचाही आहे. यासंदर्भात मी शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. लोक रस्त्यावर उतरले तर शासनाने मला म्हणू नये. आंदोलनाचा निर्णय मंगळवारी (ता.26) घेणार आहे. आंदोलन झाले तर ते जनतेचे राहील. 
-राजकुमार पटेल, आमदार, मेळघाट.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chilkhaldara road are dangerous in amravati