अमरावतीत सिटी बस अजूनही क्वारंटाइन; नागरिकांना होतोय त्रास

City bus in Amravati is not started yet
City bus in Amravati is not started yet

अमरावती ः शहरवासीयांची लाइफलाइन कोरोना संक्रमणामुळे गेल्या सहा महिन्यांपासून विलगीकरणातून बाहेर येऊ शकलेली नाही. संक्रमण आटोक्‍यात आल्याचा दावा करीत अनेक उद्योग व व्यवसाय सुरळीत होत असताना शहर बस वाहतूक मात्र बंदच आहे. राज्य परिवहन मंडळाच्या बसेस सुरू झाल्या आहेत, हे विशेष.

परिवहनाची साधने असलेली एसटी बस, रेल्वे व ऑटो ही माध्यमे सुरळीत झाली आहेत. बाजारपेठाही पूर्ण क्षमतेने उघडल्या आहेत. सणासुदीचे दिवस असल्याने शहरातील बाजारपेठेतील गर्दी वाढली आहे. शहरबस सेवा महापालिकेने कंत्राटावर दिली आहे. 25 बसेस या सेवेत आहेत. गेल्या महिन्यांपासून कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर संसर्ग वाढू नये, यासाठी बसेसची वाहतूक बंद करण्यात आली. राज्याच्या उपराजधानीत ही सेवा कार्यरत झाली आहे. विदर्भातील दुसऱ्या क्रमांकाच्या शहरातील सिटी बस मात्र अजूनही सुरू होऊ शकलेली नाही.

मिशन बिगेन अगेन अंतर्गत शहरातील अनेक खासगी व शासकीय कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झाली. याशिवाय उद्योग, व्यापार, दुकाने सुरू झाले आहेत. येथे काम करणारा वर्ग गरीब असून त्यातील अनेकांकडे दुचाकी वाहनांचा अभाव आहे. शिवाय ज्यांच्याकडे दुचाकी वाहन आहे त्यांना दररोज पेट्रोलचा खर्च परवडणारा नाही.

मजूर, कर्मचारी वर्गासाठी सिटी बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी होऊ लागली आहे. कोरोनामुळे बससेवा बंद असल्याने ऑटोसह अनेक खासगी वाहन चालकांची मनमानी वाढली आहे. प्रवाशांकडून जास्तीचे पैसे घेत लूट केली जात आहे. आपली परिवहन सुरू केल्यास खासगी वाहन चालकांच्या मनमानीला वचक बसणार असून रोज कार्यालयीन कामासाठी किंवा अन्य ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सहा महिन्यांत लाखोंचा तोटा

लॉकडाउनपूर्वी शहरातील मुख्य मार्गावर लांबपल्ल्याच्या बसेस धावत होत्या. बाजारपेठेसह शासकीय कार्यालयांतील कर्मचारी, विद्यार्थी व कामगारांना याचा लाभ मिळत होता. सहा महिन्यांपासून बसेस बंद झाल्याने कंत्राटदाराला लाखो रुपयांचा फटका बसण्यासोबतच महापालिकेच्या उत्पन्नावरही परिणाम होत आहे.

चर्चा करून निर्णय घेऊ

शहर बससेवा सुरू करण्यासाठी महापौर व कार्यशाळेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ. ही सेवा अत्यावश्‍यक असल्याने कोरोना नियमांच्या पार्श्‍वभूमीवर कशी सुरू करता येईल याचे नियोजन करणार असल्याचे विधी समितीचे सभापती प्रणीत सोनी यांनी सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com