
शनिवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास भंडारा जिल्हा रुग्णालयात आग लागली होती. यामध्ये १० बालकांचा होरपळून मृत्यू झाला. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळाला भेट दिली.
भंडारा : भंडारा जिल्हा रुग्णालयातील दुर्घटना गांभीर्याने घेतली आहे. ही घटना अंत्यत दुर्दैवी असून यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे हे झालंय का? याबाबत चौकशी करणा आहे. यामध्ये मुद्दाम कोणाला दोषी ठरविणार नाही. पण, दोषी असणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. आज त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा - एकाचवेळी पाच बालकांना हातात घेऊन शूर परिचारिकेची आगीतून धाव, मेयोमधील घटनेची अनेकांना आठवण
या दुर्घटनेत ईलेक्ट्रीक फॉल्ट आहे का? याबाबत चौकशी केली जात आहे. त्यानंतर आग का लागली? यामागचे कारण कळेल. त्यासाठी समिती स्थापन केली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, भंडाऱ्याचे विश्वजीत कदम उपस्थित होते.
हेही वाचा - भंडारा रुग्णालय आग प्रकरण : आऊट बॉर्न युनिटबद्दल समोर आली धक्कादायक माहिती
दरम्यान, भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात केअर युनिटमधील अग्निकाडांत विविध गावातील दहा नवजात शिशूंचा मृत्यू झाल्याने या गावांमध्ये दुःखाचा महापूर आला आहे. रुग्णालय प्रशासनाने काही तासांच्या आतच पालकांच्या हातात दोन ते तीन दिवसांच्या चिमुकल्यांचे शव दिले. हे शव घेऊन जाताना प्रत्येकाचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. या साऱ्या आई वडिलांनी गमावलेल्या नवजात शिशूंच्या वेदनांनी भरलेले दुःख सारखेच होते.
एकाच वेळी दोन, तीन नव्हे तर दहा चिमुकल्यांचे शव पिवळसर कपड्यात लपेटून पालकांच्या स्वाधीन केले. हे दृश्य बघून येथील गर्दीच्या दुःखाचा बांध फुटला. मात्र, सारे पालक थरथरत्या हातात आपआपल्या चिमुकल्यांचे शव घेऊन विविध रुग्णवाहिकांमध्ये बसत असताना त्या पीडितांचा आक्रोशाने मन हेलावून गेले.
संपादन - भाग्यश्री राऊत