आम्हाला तुमचा अभिमान! महाराष्ट्रातील 'टॅलेंट'चा विधानमंडळात देवदुर्लभ गौरव

CM udhhav Thackeray and Nana Patole  Felicitated UPSC cleared students
CM udhhav Thackeray and Nana Patole Felicitated UPSC cleared students

यवतमाळ: 'महा' या शब्दातच महाराष्ट्राचे मोठेपण सामावले आहे. कला, क्रीडा, शिक्षण, कृषी, उद्योग, राजकारण, समाजकारण अशा सर्वच अंगाने महाराष्ट्राचे देशातील एक पाऊल नेहमीच पुढे पडलेले आहे. परंतु देशाचे प्रशासन ज्यांच्या हाती संयमित असते, त्या नागरी प्रशासनातील आय.ए.एस.चा टक्का बिहार, उत्तर प्रदेश वा दक्षिणेतील प्रांतांपेक्षा कमी असल्याची खंत नेहमीच व्यक्त केल्या जात होती. यंदा मात्र संघ लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) भारतीय नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींच्या यशाचा ध्वज उंच उंच फडकला आहे. निश्चितच महाराष्ट्रासाठी ही गौरवाची बाब आहे.

भारतीय प्रशासन, पोलिस, राजस्व, परदेश, वनसेवा अशा महत्वपूर्ण लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षांमधील यश निश्चितच भूषणावह असते. या वर्षीच्या 'यूपीएससी'च्या परीक्षेत महाराष्ट्रातील ७९ 'यंग, एनर्जेटिक अँड डायनॅमिक' युवा- युवतींनी  गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. प्रथमच एवढे मोठे यश मिळाले आहे. 

एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील दहा टक्के विद्यार्थी आहेत. महाराष्ट्रातील 'टॅलेंट'चा हा आकडा आयएएस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या नवीन उमद्या उमेदवारांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे . बरेचदा अशा गगन भरारी घेणाऱ्या उमेदवारांचा त्यांच्या परिवार, गाव परिसर, शाळा-महाविद्यालयात अथवा सामाजिक संस्थांद्वारे गौरव करण्यात येतो. हा सत्कार इतर युवक-युवतींसाठी प्रेरक ठरतो. सत्काराच्या भाषणात आपली यशकथा सांगताना ध्येय गाठण्यासाठी केलेला संघर्ष, उपसलेले कष्ट, अभ्यासातील सातत्य, यश मिळवण्याची जिद्द यावर प्रकाश टाकला जातो. यशकथा साकारणाऱ्या आपल्या परिसरातील मुला- मुलींचे कौतुक केले जाते. मात्र या कौतुकाची थाप खुद्द महाराष्ट्र राज्याच्या प्रमुखांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष विधिमंडळात मिळाली तर...! ही संकल्पना 'सकाळ'च्या माध्यमातून पुढे आली. 

योगायोगाने यवतमाळ जिल्ह्यातील चौघांनी युपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेत बाजी मारली. त्यांच्या या यशकथा दैनिक 'सकाळ'ने समाजापर्यंत पोचविल्या. सामाजिक कार्यकर्ते देवानंद पवार यांनी या गुणवंतांचा सत्कार करण्याचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या समक्ष ठेवला. विधानसभा अध्यक्षांनी तत्परतेने ही संकल्पना स्वीकारत पुढाकार घेतला आणि विधानमंडळाच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ता.२५ ऑगस्ट रोजी हा महाराष्ट्रातील 'टॅलेंट'चा देवदुर्लभ दिमाखदार गौरव सोहळा पार पडला. 

विधानमंडळात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच देशातील पहिलीच घटना आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे विधिमंडळ गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करणारे देशातील पहिले विधिमंडळ ठरले आहे. याचे श्रेय विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने इतिहासात नोंद होईल यात शंका नाही. छत्रपती राजर्षी शाहू महाराज राज्यातील गुणवंतांचा गौरव करीत. त्यांना शिष्यवृत्ती देत, नोकऱ्या देत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दिलेल्या शिष्यवृत्तीची दखल इतिहासाने घेतली आहे. महाराष्ट्र विधिमंडळाने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केलेला हा गौरव विविध संदर्भ निर्माण करणारा ठरणार आहे. या सोहळ्याने महाराष्ट्राचे पुरोगामीत्व सिद्ध केले आहे.

महाराष्ट्रातील युवकांनी मिळविलेले भारतीय नागरी सेवा परीक्षांमधील यश निश्र्चितच देदीप्यमान आहे आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या युवक-युवतींच्या यशकथा भन्नाट आहेत. त्या जिद्दीने साकारणाऱ्या उमेदवारांचा विधिमंडळाच्या सभागृहात झालेला सत्कार सोहळा एकमेवाद्वितीय म्हणावा लागेल. या सत्कार सोहळ्यातून संपूर्ण महाराष्ट्रातील 'आयएएस' बनण्याची प्रेरणा अधिक दृढ होणार आहे. महाराष्ट्र सरकारने प्रथमच केलेला हा उपक्रम निश्चितच सर्वांगसुंदर व प्रशंसनीय आहे. यापुढे हाच पायंडा कायम ठेवल्यास यशोविरांचा आकडा तीन अंकी व्हावा, अशी अपेक्षा करण्यात काहीही हरकत नाही. 

या गौरव सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या आवेशपूर्ण शैलीत 'यश संपादन करणाऱ्या युवक-युवतींनी राज्य व देश सर्वोत्तम बनावा, हे स्वप्न कायम मनात बाळगा. राज्य, देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करताना माती आणि मातेला विसरू नये' असा मौलिक संदेश दिला आहे. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती राम राजे निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, विधान सभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्य मंत्री अनिल परब, विधान मंडळाचे सचिव राजेंद्र भागवत उपस्थित होते. 

भारतीय नागरी सेवा परीक्षेत महाराष्ट्रातील बहुतांश कष्टकरी व शेतकऱ्यांच्या मुलांनी ही यशोगाथा रचली आहे. यातून कुणी जिल्हाधिकारी तर कुणी उच्च पोलिस अधिकारी बनणार आहे. त्यांनी अधिकाराने वलयांकित खुर्चीत बसल्यानंतर आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहावे व खऱ्या अर्थाने देशाची सेवा करावी, अशा समाजाच्या अपेक्षा आहेत. समाजाबद्दलची संवेदनशीलता जपल्याशिवाय या यशकथांची पूर्तता होणार नाही, हा संदेशही या गौरव सोहळ्याने दिला आहे. 'आकांक्षापुढती गगन ठेंगणे !' या काव्यपंक्तीचा प्रत्यय दरवर्षी यापुढे या सोहळ्यातून व्हावा, अशी उर्मी प्रत्येकाच्या मनात दाटून आली आहे. या पार्श्वभूमीवर हा सोहळा देखणा ठरला आहे.

"यावर्षी UPSC च्या नागरी सेवा परीक्षेत यश संपादन करून देशाच्या प्रशासकीय सेवेत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातील ७९ उमेदवारांचा गौरव विधानमंडळातर्फे करण्यात आला. महाराष्ट्रातून UPSC उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा  विधानसभा अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्या पुढाकाराने असा गौरव राज्यात प्रथमच करण्यात आला आणि तेही राज्याच्या कायदेमंडळाद्वारे. ग्रामीण भागातून आलेल्या उमेदवारांसाठी ही कौतुकाची थाप महत्वाची आहे. हा पायंडा यापुढेही पाळल्या गेला पाहिजे."
-देवानंद पवार,
प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र किसान काँग्रेस (विदर्भ)

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com