esakal | COVID19 : मुंबई, ठाणे व बऱ्हाणपूर रिटर्न इफेक्ट; इनकमिंग नागरिकांकडून या जिल्ह्याला कोरोनाचे धक्के
sakal

बोलून बातमी शोधा

corona positive.jpg

नुकतेच मुंबईवरून डॉक्टरांना न सांगता आलेल्या मलकापूर पांग्रा येथील मुलीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे ताजे असतानाच नरवेल येथील मुलीचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले आहेत. तर खामगाव मधील पॉझिटिव्ह रुग्ण देखील मुंबईहून परतला आहे.

COVID19 : मुंबई, ठाणे व बऱ्हाणपूर रिटर्न इफेक्ट; इनकमिंग नागरिकांकडून या जिल्ह्याला कोरोनाचे धक्के

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : आठवडाभरापूर्वी कोरोनामुक्त झालेला मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्याला बाहेरून येणाऱ्या नागरिकांमुळे कोरोनाचे एकावर एक धक्के बसायला सुरुवात झाली आहे. मुक्त झालेल्या या जिल्ह्यात आज पाच कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. यापैकी चार जण हे बाहेरून आलेल्या पैकी आहेत. लॉक डाऊनची बंधने काहीशी शिथिल झाल्याने व बाहेर जिल्ह्यांमधून येणारे नागरिक विनासायास येऊ शकत असल्याने जिल्ह्याला कोरोनाचा धोका वाढला आहे. 

नुकतेच मुंबईवरून डॉक्टरांना न सांगता आलेल्या मलकापूर पांग्रा येथील मुलीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे ताजे असतानाच नरवेल येथील मुलीचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले आहेत. तर खामगाव मधील पॉझिटिव्ह रुग्ण देखील मुंबईहून परतला आहे. जळगाव जामोद येथील पॉझिटिव्ह असलेला रुग्ण बिनदिक्कतपणे मोटरसायकलवर मध्यप्रदेशात जाऊन आला होता. अर्थात आज रोजी जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या पाच पैकी चार जणांचे कनेक्शन बाहेरून आलेल्यांमध्ये आहे.

आवश्यक वाचा - अबब! सोन्यापेक्षाही महाग असलेल्या कस्तुरीच्या मातीची हवेली, तीही महाराष्ट्रातील या जिल्ह्यात, सुगंधासाठी पर्यटकही...

काल (ता. 16) शेगाव आणि खामगावमध्ये एक-एक कोरोना बाधित आढळलेत. मलकापूर तालुक्यातील नरवेल येथील त्या कोरोना संशयित कुटुंबातील एक 7 वर्षांची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. काल या कुटुंबातील 4 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. या कुटुंबातील कुटुंबप्रमुख 9 मे रोजी ठाणे येथे कोरोनामुळे मरण पावले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील 6 जण आपल्या मूळ गावी नरवेल येथे पोहोचले. येथे गावकऱ्यांनी या सर्वांना आधी कोरोना टेस्टिंगचा आग्रह धरल्यामुळे या सर्वांना खामगाव येथे पाठविण्यात आले होते. 2 रिपोर्ट प्रतीक्षेत होते... त्यापैकी ही बालिका पॉझिटिव्ह आली.

हेही वाचा - Lockdown : 'तुम्ही कंटेन्मेंट झोनमध्ये आहात विसरलाय वाटतेय...'

गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील बाहेर जिल्हा हुन येणाऱ्या मार्गांच्या सीमांवर फारशी गांभीर्याने तपासणी केली जात नाही. एकीकडे हा धोका वाढत असताना वाहनांची तपासणी न होणे हे देखील या वाढत्या घटनांना कारणीभूत ठरत आहे. बुलडाणा शहरातील धोका आटोक्यात आला आहे. ज्या पद्धतीने शहरातील नाकाबंदी व कंटेनमेंट झोनमध्ये खबरदारी घेण्यात आली, तसेच खबरदारी जर जिल्ह्याच्या सीमांवर घेण्यात आली तर या प्रकारांना आळा बसू शकेल.

सकाळ'च्या वृत्ताची दखल घेऊन नुकतेच पालकमंत्र्यांनी एक आढावा बैठक घेऊन जिल्ह्याच्या व राज्याच्या सीमांवर कडक तपासणी व अंमलबजावणी करा, असे निर्देश देखील दिले आहेत. पुण्या-मुंबई सोबतच आता बुलडाण्याच्या जास्त संपर्कात असलेल्या अकोला आणि औरंगाबाद येथील रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळे देखील धोका अधिक वाढलेला आहे पोलिस प्रशासनाने हे प्रकार गांभीर्याने घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

आकडा 29 वर
बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा एकूण आकडा आता 29 वर पोहोचला आहे. यापैकी 23 जणांना सुट्टी देण्यात आलेली आहे. एकाचा मृत्यू झाला आहे. पाच रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.