esakal | तूर खरेदीचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर; अशी चालते मिलीभगत...वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

toor kharedi.jpg

सध्या नांदुरा तालुक्यात ठराविक दिवशी वेगवेगळ्या पीक वाणांची खरेदी कॉटनमार्केटमध्ये सुरू असून सोशल डिस्टन्सिंग पाळून व्यवस्थित सुरू आहे.

तूर खरेदीचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर; अशी चालते मिलीभगत...वाचा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदुरा (जि.बुलडाणा) : सध्या शासनाकडून शासकीय हमीभावातून तूर खरेदी सुरू असून, या खरेदीमध्ये नेहमीच गैरप्रकार होत असल्याचे व तशा नेहमी तक्रारी येत असल्याने खरेदी विक्री संघाचे संचालक तथा शिवसेना उपजिल्हा प्रमुख वसंतराव भोजने यांनी या प्रकारची शहानिशा करण्याकरिता बनावट शेतकरी बनत मोबाईल वरून संबंधितांना विचारणा केली असता 100 रुपये प्रति क्विंटल आकारून शेतकऱ्यांची कशी पिळवणूक केली जाते. त्याचा ऑडिओच व्हायरल केल्याने खरेदी विक्रीतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला आहे. तशी तक्रार देखील त्यांनी जिल्हा उपनिबंधकाकडे केली आहे.

सध्या नांदुरा तालुक्यात ठराविक दिवशी वेगवेगळ्या पीक वाणांची खरेदी कॉटनमार्केटमध्ये सुरू असून सोशल डिस्टन्सिंग पाळून व्यवस्थित सुरू आहे. ज्यांनी शासकीय खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्या शेतकऱ्यांची तूर खरेदी खरेदीविक्री संघाकडून केली जात आहे. खरेदी विक्रीत गैरप्रकार चालतात तशा तक्रारी नेहमीच शेतकरी करीत आले आहे.

आवश्‍यक वाचा - बापरे! हा जिल्हा झाला कोरोनामुक्त; मात्र, ओढावले नवे संकट

पैसे दिल्याशिवाय तूर खरेदी होत नसल्याची बाब समोर आल्याने सत्यता पडताळण्यासाठी खरेदी विक्री संघाचे संचालक व शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख यांनी 29 रोजी संबंधित कार्यालयातील कर्मचाऱ्यास फोनच्या माध्यमातून शेतकरी बोलत असल्याचे सांगून 15 क्विंटलसाठी किती पैसे लागतील असे विचारले असता प्रति क्विंटल 100 रुपये लागतील असे संभाषणच ऑडिओच्या माध्यमातून संचालक असलेले वसंतराव भोजने यांनी तालुकाभर व्हायरल केला. 

हेही वाचा - हृदयद्रावक : दहा वर्षीय मुलासह मातेची विहिरीत उडी अन्...वाचा

या खरेदीविक्रीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालतो हे सिद्ध झाले आहे. संबंधित विषयाबाबत 29 एप्रिल रोजी वसंतराव भोजने यांनी शेतकऱ्यांची होत असलेली लूट पाहता जिल्हा उपनिबंधकाकडे तक्रार दाखल करीत असल्याचे सांगितले. याबाबत खरेदी विक्री संघातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन घेण्याचे टाळले.

भ्रष्टाचाराचे ‘कुरण’ जैसे थेच
नांदुरा खरेदी विक्री संघातील भ्रष्टाचार सर्वश्रृत आहे. काही शेतकऱ्यांनी याबाबत नागपूर हायकोर्टात याचिका सुद्धा दाखल केल्या असून, त्याचा निकाल प्रलंबित असताना आजही हे भ्रष्टाचाराचे ‘कुरण’ जैसे थेच आहे. येथील कर्मचारी पैसे घेऊन निकृष्ठ माल खरेदी करत असतात व ज्या शेतकऱ्यांचा माल चांगला असतो अशाजवळून धाक दाखवून पैसे उकडले जातात.
- वसंतराव भोजने, संचालक, खरेदी विक्री संघ, नांदुरा