Video : मनात आले नी मूळ गावासाठी दिले हे धम्मदान...

donation
donation

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : बोरगावातील बुद्धविहार अनेकांना प्रेरणा देणारे. विहारालगतच बाबासाहेबांचा पुतळा असावा व भविष्यात चांगल्या वाचनालयाची निर्मिती करून नव्या पिढीसाठी ते प्रेरणास्रोत ठरावे, यासाठी गावकऱ्यांनी नियोजन केलेल्या उपक्रमाची माहिती मूळचे बोरगावचे अन्‌ सध्या गडचिरोली येथे वास्तव्यास असणाऱ्या दांपत्यांना समजली. अन्‌ काय त्यांनी थेट बोरगाव गाठले. आपल्या बांधवांची भेट घेत त्यांनी गावकऱ्यांना मोठे सरप्राईज गिफ्ट दिले. यामुळे समाजबांधवांसह गावकरीही थक्क राहिले. गिफ्ट होत चक्क एक लाख रुपयांच्या धम्मदानाचे.

गोंडपिपरी तालुक्‍यातील बोरगाव. आंबेडकरी चळवळीचे, बाबासाहेबांच्या चळवळीसाठी स्वत:ला वाहून घेणारे, अशी या गावाची ओळख आहे. बाबासाहेबांच्या शिका, संघटित व्हा अन्‌ संघर्ष करा, या संदेशाला सार्थक ठरवीत गावातील अनेक तरुणांनी उच्चशिक्षण घेत स्वत:ला सिद्ध केले. आता नवी पिढी समोर येत असताना त्यांना बाबासाहेबांची प्रेरणा सतत तेवत राहावी. यासाठी गावातील बौद्धविहाराच्या बाजूला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. गावातील अनेक जण नोकरीनिमित्ताने विदर्भातील विविध भागात स्थानिक झाले आहेत.

बोरगावसाठी गडचिरोलीच्या अरुण फुलझेले दांपत्याचा पुढाकार
अरुण फुलझेले हे यापैकीच एक. ते सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. सध्या आपल्या कुटुंबीयांसोबत ते गडचिरोली येथे वास्तव्यास आहेत. आपल्या गावातील समाजबांधव व गावकरी अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचे नियोजन करीत असल्याची माहिती त्यांना मिळाली. मग काय आपल्या पत्नीसोबत ते थेट बोरगावला पोहोचले. बुद्धविहारात आपल्या समाजबांधंवाची भेट घेतली. आपुलकीने चर्चा केली अन्‌ चक्क एक लाख रुपयांचे धम्मदान सुपूर्द केले. यावेळी समाजबांधवांसह गावकरीही भावुक होत थक्क राहिले. धम्मदानाची मागणी न करता स्वत:हून गावात येत त्यांनी ही भेट दिल्याने उपस्थितांसाठी हा विशेष प्रसंग ठरला.

फुलझेले यांच्यासह परिसरातील समाजबांधवाच्या मदतीने बोरगावच्या बुद्धविहाराच्या अगदी बाजूलाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा तयार करण्यात आला आहे. माझ्या भिमाई पुण्याई... अंगठी सोन्याची बोटाला, हे गाणं प्रचंड लोकप्रिय झाले होतं. पण आपला विकास साधण्यासोबतच समाजासाठी योगदान देत कृतज्ञता दाखविणाऱ्या अरुण फुलझेले यांच्या या भूमिकेची समाजात चांगली चर्चा सुरू आहे.

आज लोकार्पण
बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण व अनावरण सोहळा सोमवारी (ता. 20) आयोजित करण्यात आला आहे. अखिल भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे. डॉ. बंडू रामटेके, प्रा. पंडित फुलझेले, आनंद भडके, संगीतभाई फुलझेले, प्रा. विश्वास शंभरकर, अनिल ढेंगणे, डॉ. संजय दुधे, तहसीलदार सीमा गजभिये, ठाणेदार संदीप धोबे, उपविभागीय अभियंता रमेश शंभरकर यांच्यासह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी समाजप्रती औदार्य दाखविणाऱ्या अरुण फुलझेले यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

हेही वाचा - किराणा भडकला : शेंगदाणा, मूगडाळ, मटकी, खाद्यतेलाचे भाव भिडले गगनाला

चळवळीचे गाव
गोंडपिपरी तालुक्‍यातील बोरगावला चळवळीचे गाव म्हणून ओळखले जाते. चंद्रपूरला 16 ऑक्‍टोबर 1956 रोजी बाबासाहेबांनी धम्मदीक्षा दिली होती. यावेळी बोरगावातील शेकडो नागरिकांनी बाबासाहेबांची भेट घेत त्यांना बोरगावातही धम्मदीक्षेचा कार्यक्रम घेण्याची विनंती केली होती. ती त्यांनी मान्य केली पण वेळेअभावी ते शक्‍य झाले नाही. यानंतर बाबासाहेबांचे मानसपुत्र बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या उपस्थितीत 18 मे 1957 रोजी बोरगावात ऐतिहासिक धम्मदीक्षा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी जिल्हाभरातील आंबेडकरी अनुयायांची उपस्थिती होती. साधारणत: 1200 लोकसंख्येच्या बोरगावातील 350 लोक आज शासकीय नोकरीवर आहेत. गावातील अनेक तरुणांनी आपल्या अभिनयातून रंगभूमी गाजवीत बाबासाहेब मांडला आहे.

अभ्यासिका सुरू करण्याचा मानस
आंबेडकरी चळवळीचे गाव असलेल्या बोरगावात सोमवारी बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे. नव्या पिढीला चळवळीची प्रेरणा मिळण्यासाठी बाबासाहेबांचे विचार महत्त्वाचे आहेत. येणाऱ्या काळात सुसज्ज अभ्यासिका सुरू करण्याचा आमचा मानस आहे. अरुण फुलझेले यांनी अनपेक्षितपणे समाजाला केलेली मदत भावनिक करणारी ठरली.
- सुधाकर जीवने, अध्यक्ष, पुतळा समिती, बोरगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com