किराणा भडकला : शेंगदाणा, मूगडाळ, मटकी, खाद्यतेलाचे भाव भिडले गगनाला

nagpur gracerry news
nagpur gracerry news

नागपूर : पावसामुळे बाजारात शेतमालाची आवक घटली आहे. त्यामुळे लोकांना भाजीपाला, कडधान्ये, दूध इत्यादी रोजच्या वापरातील वस्तू जास्त दराने खरेदी कराव्या लागत आहेत. किराणा मालाच्या किमतीतही मोठी वाढ झाल्याने लोकांच्या मासिक खर्चात वाढ झाली आहे.

भाजीपाला, दूध, गॅस सिलिंडरपाठोपाठ आता किराणा मालातही मोठी दरवाढ झाल्याने खर्चाचा ताळमेळ बसविताना सर्वसामान्यांची दमछाक होत आहे. किराणात शेंगदाणा, साबुदाणा, डाळी, खाद्यतेल, गहू यांच्या भावात लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचबरोबर खोबरे, खारीक, बदाम, तीळ यांचे बाजारभावही वाढले आहेत. गेल्या दोन महिन्यांत शेंगदाणा 100 रुपये किलोवरून 125 रुपये किलो झाला आहे. सोयाबीन तेलाचा 1340 रुपयांना असणारा 15 किलोंचा डबा आता 1590 रुपयांचा झाला आहे. तर, शेंगदाणा तेलाचा 15 किलोंचा डबा तब्बल 1800 रुपयांचा झाला आहे. भगर 80 रुपयांवरून 100 रुपये किलो झाली आहे.

महत्त्वाची बातमी - सुटे पैसे दिले नाही म्हणून चिडला पिंगर विक्रेता अन्‌ केले 'छपाक'

विलायचीचा सुगंध गायब
विलायचीची किंमत गेल्या दोन महिन्यांत तब्बल 2700 रुपयांनी वाढली. विलायची 4 हजार रुपये किलो झाली आहे. किंमत प्रचंड वाढल्यामुळे सध्या चहात विलायची वापरण्याच्या प्रमाणात घट झाली आहे. अनेक व्यावसायिकांनी चहात सुगंधासाठी विलायची वापरणे बंद केले आहे. त्यामुळे चहामधून विलायचीचा सुगंध गायब झाल्याचे दिसत आहे.

गॅल सिलिंडरचे दरही चढेच
सहा महिन्यांपूर्वी म्हणजेच ऑगस्ट 2019 मध्ये घरगुती गॅस सिलिंडरचे दर 621 होते. ते जानेवारी 2020 मध्ये तब्बल 139 रुपयांनी वाढून 760 रुपयांवर पोहोचले आहेत. व्यावसायिक सिलिंडरचेही दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने खाद्यपदार्थ व चहा विक्रेत्यांनीही आपले दर वाढविले आहेत. सिलिंडचे गेल्या सहा महिन्यांतील दर : ऑगस्ट- 621, सप्टेंबर- 637, ऑक्टो बर- 700, नोव्हेंबर-726, डिसेंबर-741, जानेवारी- 760.

दुधाचे दरही तीन ते चार रुपयांनी वाढले
पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याचा परिणाम म्हणून दुधाचे दरही तीन ते चार रुपयांनी वाढले आहेत. गायीचे पॅकिंग दूध 2 रुपयांनी, तर म्हशीच्या दुधात 3 रुपयांनी वाढ महिन्याभरापासून करण्यात आली आहे. मदर डेअरीने दुधाची किंमत तीन रुपयांनी, तर अमूलने दोन रुपयांनी वाढविली आहे. टोंड दूध तीन रुपयांनी वाढले. 42 रुपयांना मिळणारे टोंड दूध आता 45 रुपयांना मिळत आहे. अमूल गोल्डच्या एक लिटर दुधाची किंमत 56 रुपये इतकी झाली आहे.

मिरची पावडरही झाली "लाल'
अवकाळी पावसामुळे गव्हाच्या किमती तीन रुपये प्रति किलोने वाढल्या आहेत. किमती अजून वाढण्याची शक्यहता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे. डिसेंबरमध्ये 27 रुपये किलोचा गहू आता 30 रुपये किलो मिळत आहे. गव्हापाठोपाठ लाल मिरची पावडरही आवक घटल्याने ग्राहकांना घाम फोडत आहे. 130 रुपये असणारी मिरची पावडर या महिन्यात 170 रुपये किलोने विकली जात आहे.


अशा आहेत किमती (भाव प्रतिकिलो)

तेल 15 किलोंचा डबा - 1590
शेंगदाणा - 125
साखर -  39
साबुदाणा - 80
मूगडाळ -  90
उडीदडाळ - 115
गहू - 30
मटकी - 110
मिरची पावडर - 170
विलायची-  4000


ताळमेळ बसविताना दमछाक
महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. त्या तुलनेत उत्पन्न जेवढे होते तेवढेच आहे. पतीला फक्त दहा हजार रुपये पगार मिळतो. एवढ्या पैशात घरभाडे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, दूध, गॅस सिलिंडर, किराणा, भाज्या या सगळ्यांचा ताळमेळ बसविताना दमछाक होते. एकट्याच्या पगारात घरखर्च भागत नाही म्हणून मी नोकरीचा शोध घेत आहे.
-स्मिता खोरे, गृहिणी, नागपूर
 

व्यवसाय करणे परवडत नाही
किराणा मालातील खाद्यतेलासह शेंगदाणा, गहू, मिरची पावडर आणि कडधान्यांच्या किमतीत लक्षणीय वाढ महिन्याभरात झाली आहे. ग्राहक आम्हाला महागात वस्तू विकत असल्याच्या तक्रारी करतात; परंतु घाऊकमध्ये किमती वाढल्या तर आम्हालाही व्यवसाय करणे परवडत नाही.
-शिवलाल नंदा, लाल किराणा स्टोअर, नागपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com