esakal | दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : शिवकुमारचा जामीन अर्ज फेटाळला

बोलून बातमी शोधा

deepali chauhan suicide news
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : शिवकुमारचा जामीन अर्ज फेटाळला
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याचा जामीनअर्ज अचलपूर न्यायालयाने शुक्रवारी (ता. २३) फेटाळला.

हेही वाचा: ऑनलाइन प्रेमातून मुलीला मारण्याचा प्रयत्न

आय.एफ.एस. अधिकारी असलेले शिवकुमार यांच्यावर केल्या गेलेले आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी स्वत:च्या हस्ताक्षरात लिहून ठेवलेल्या तीनही पत्रामध्ये शिवकुमार याच्या नावाचा उल्लेख आहे. तपासातील जबाब व चौकशीतील बहुतांश मुद्दे हे अर्जदाराच्या विरोधात आहेत. अनेकांचे बयाण, जबाब अद्याप नोंदवायचे असून दोषारोपपत्रसुद्धा दाखल झालेले नाही, असे शिवकुमारचा जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने म्हटले आहे.

शिवकुमार यांच्या वकिलांच्या वतीने आपण एक आय.एफ.एस. अधिकारी आहोत. जबाबदारीने काम करतो. कुठेही पळून जाणार नाही. त्यामुळे आपल्याला जामीन द्यावी, असे म्हटले आहे. कामानिमित्ताने रात्रंदिवस ठिकठिकाणी फिरावे लागते. आपले नागपूर मुख्यालय ठरले आहे. त्यामुळे जामीन मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली गेली. तर, जिल्हा सरकारी वकिलांनी घटना घडल्यानंतर विनोद शिवकुमार हे हरिसाल येथून परतवाड्यात आले. तेथून नागपूरला निघून गेले. त्यांनी जाणूनबुजून याप्रकरणाकडे दुर्लक्ष केले, असे न्यायालयासमोर सांगितले. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर शिवकुमारचा जामीन अर्ज फेटाळला.

हेही वाचा: पोलिस शिपायांची आंतरजिल्हा बदली रद्द

तत्पूर्वी, अचलपूर न्यायालयात दाखल जामीन अर्जावर गुरुवारी (ता. २२) सुनावणी झाली. बचावपक्ष व सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला. दीपाली यांच्या आत्महत्येनंतर समाजात संतप्त पडसाद उमटले होते. २५ मार्च २०२१ रोजी हरिसाल येथील आपल्या शासकीय निवासस्थानी वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांनी गोळी झाडून आत्महत्या केली होती.

कारागृहातील मुक्काम वाढला

अचलपूर न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यामुळे विनोद शिवकुमारचा कारागृहातील मुक्काम अधिक काही दिवस वाढला. जवळपास एकवीस दिवसापेक्षा अधिक दिवसांपासून ते कारागृहात आहेत.