अखेर जिल्हा बॅंकेची निवडणूक घोषित; 21 डिसेंबरला होणार मतदान; जिल्ह्यात 29 मतदान केंद्रे

राजकुमार भितकर 
Tuesday, 15 December 2020

कर्जवाटप, साहित्य खरेदी, नोकरभरती, विविध निविदा, भाड्याची वाहने आदी माध्यमांतून वार्षिक कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक तब्बल 13 वर्षांनंतर होत आहे.

यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम सोमवारी (ता. 14) सहकार निवडणूक प्राधिकरणाने घोषित केला आहे. सोमवारी (ता. 21) जिल्ह्यातील 29 केंद्रावर मतदान होणार असून मंगळवारी (ता. 22) मतमोजणी होणार आहे.

कर्जवाटप, साहित्य खरेदी, नोकरभरती, विविध निविदा, भाड्याची वाहने आदी माध्यमांतून वार्षिक कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक तब्बल 13 वर्षांनंतर होत आहे. बॅंकेत संचालक म्हणून जाण्यासाठी अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यासोबतच राजकीय पक्षांनीही आपली सत्ता यावी, यासाठी कंबर कसली आहे. 

सविस्तर वाचा - कोरंभीच्या नदीपात्रात आढळलेल्या मृतदेहाची पटली ओळख; प्रियकराच्या मदतीनं केला पतीचा खून

राज्यातील सत्ता समीकरणे बदलल्यानंतर भाजप शेतकरी सहकारी विकास आघाडीच्या माध्यमातून बॅंकेवर सत्ता स्थापित करण्याच्या प्रयत्नात आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहे. मात्र, तिकीट वाटपावरून झालेल्या गोंधळाने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान संचालकांनी बंडाचा झेंडा उचलला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या एकूण 21 संचालकांच्या पदांसाठी निवडणूक 26 मार्चला होऊ घातली होती. मात्र, कोरोनामुळे निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. 

यातील दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आता 29, 19 जागेसाठी मतदान होणार आहे. जिल्ह्याच्या राजकारणाच्या दृष्टीने शेतकऱ्यांची बॅंक व त्यावरील सत्ता महत्त्वाची आहे. जिल्हा बॅंकेची स्थगित झालेली निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांत तारखेचा खेळ सुरू होता. अखेर सोमवारी (ता. 14) निवडणूक प्राधिकरणाने या तारखांना 'ब्रेक' लावला. सहकार निवडणूक प्राधिकरणाने अधिकृत निवडणूक कार्यक्रम पाठविला आहे. त्यामुळे आता निवडणुकीत आणखी रंगत वाढणार आहे. महाविकास आघाडी विरोधात भाजपपुरस्कृत विकास आघाडी असा सामना होणार आहे.

क्लिक करा - मातोश्रीवर उरकला प्रेम विवाह अन् नामकरण सोहळा, पाणावले अनेकांचे डोळे

जिल्ह्यात तेराशेवर मतदान

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीची अधिकृत यादी प्राधिकरणाने पाठविली आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने यापूर्वीच तयारी पूर्ण करून ठेवली आहे. जिल्हा बॅंकेसाठी 29 मतदान केंद्रे असणार आहेत. याठिकाणी जिल्हागटातील अनुक्रमानुसार एक हजार 46 तर तालुकागटासाठी 595 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dates of district bank elections announced in Yavatmal