शोकमग्न निंभोरा राज गावात रविवारी चुली पेटल्याच नाहीत! 

सायराबानो अहमद 
Monday, 28 September 2020

या गावातील काही महिला व मुले एकादशी व अधिकमासच्या पूजेसाठी गावाजवळ असलेल्या चंद्रभागा नदीवर गेले होते. या नदीचे खोलीकरण झाल्याने पाण्याचा अंदाज त्यांना आला नाही.

धामणगाव रेल्वे (जि. अमरावती) ः एकीकडे परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे जीवनमान विस्कळित झाले असताना दुसरीकडे गावानजीक असलेल्या चंद्रभागा नदीवर एकादशी व अधिकमासनिमित्त पूजेसाठी गेलेल्या एका महिलेसह तीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना रविवारी (ता. २७) सकाळी ९ वाजताच्या सुमारास नजीकच्या निंभोरा राज येथे घडली होती. या घटनेमुळे निंभोरा राज गावात शोककळा पसरली असून रविवारी गावात कुणाच्याच घरात चुली पेटल्या नाहीत. संपूर्ण गाव शोकमग्न होते. 

या गावातील काही महिला व मुले एकादशी व अधिकमासच्या पूजेसाठी गावाजवळ असलेल्या चंद्रभागा नदीवर गेले होते. या नदीचे खोलीकरण झाल्याने पाण्याचा अंदाज त्यांना आला नाही. त्यामुळे सोबत असलेली तीन मुले पाय घसरून पाण्यात बुडत असल्याने त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात महिलेचाही मृत्यू झाला. सदर घटना घडताच इतरांनी गावाकडे ओरडत धूम ठोकली. घटनेचे वृत्त कळताच लगेच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत चौघांनीही वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. परंतु जीवन चवरे, यश चवरे व सोहम झेले यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर पुष्पा चवरे (वय ४५) यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे नेत असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली. 

जीवन चवरे हा दहाव्या वर्गात, यश चवरे हा सहाव्या तर सोहम झेले हा चौथ्या वर्गात शिकत होता. या घटनेमुळे निंभोरा राज गावात शोककळा पसरली. रविवारी (ता.२७) गावात चुलीच पेटल्या नाहीत. 

हस्त, चित्रा, स्वाती नक्षत्रही बसरणार; हवामान अभ्यासकाने वर्तविला अंदाज
 

तत्काळ चौकशीचे निर्देश 

ही घटना अत्यंत दुर्दैवी असून नदीपात्रात खोलीकरण झाल्याची तक्रार गावकऱ्यांकडून मिळाल्यानुसार घटनेच्या सर्वस्तरीय चौकशीचे निर्देश संबंधित प्रशासनाला दिले आहेत. दुसरीकडे मृतांच्या कुटुंबीयांना तत्काळ शासकीय मदत उपलब्ध व्हावी या दृष्टीने सुद्धा प्रशासनास निर्देश दिले असल्याचे आमदार प्रताप अडसड त्यांनी सांगितले. 

पेट्रोलपंप मालकाने केला कडक नियम, `नो मास्क नो पेट्रोल`!
 

नैसर्गिक आपत्ती निधीतून मदत 

निंभोरा राज या गावी घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून मृतांच्या कुटुंबीयांना नैसर्गिक आपत्ती निधीच्या माध्यमातून मदत केली जाईल, असे तहसीलदार भगवान कांबळे यांनी सांगितले. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: With the death of four, stoves did not burn in Nimbhora Raj village!