अमरावती विद्यापीठाचा परीक्षा प्रक्रियेचा निर्णय योग्यच, २४ नोव्हेंबरपर्यंत बाजू मांडण्याचे न्यायालयाचे आदेश

सुधीर भारती
Sunday, 1 November 2020

२६ ऑक्‍टोबरपासून विद्यापीठाच्या परीक्षा सुरू  झाल्या आहेत. परीक्षा प्रक्रियेविरोधात प्रीती राहुल तायडे ऊर्फ प्रीती बबनराव मते या विद्यार्थिनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती.

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने विद्या परिषद, परीक्षा व मूल्यमापन मंडळाने घेतलेला परीक्षा प्रक्रियेचा निर्णय उच्च न्यायालयाने योग्य ठरविला आहे. २४ ऑक्‍टोबरला निर्गमित केलेल्या निर्देशाप्रमाणे परीक्षा प्रक्रियेची कार्यवाही करावी व २४ नोव्हेंबरपर्यंत विद्यापीठाने आपली बाजू मांडावी, त्यानंतर अंतिम निर्णय देण्यात येईल, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.

२६ ऑक्‍टोबरपासून विद्यापीठाच्या परीक्षा सुरू  झाल्या आहेत. परीक्षा प्रक्रियेविरोधात प्रीती राहुल तायडे ऊर्फ प्रीती बबनराव मते या विद्यार्थिनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती. विद्यापीठाने २४ ऑक्‍टोबरला परीक्षा संचालनासाठी निर्गमित केलेला निर्देश रद्द करावा, अशी मागणी याचिकाकर्त्या विद्यार्थिनीने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केली होती. त्यावर २८ ऑक्‍टोबरला उच्च न्यायालयाने सुनावणी घेऊन त्यामध्ये विद्यापीठाकडून घेतल्या जात असलेल्या परीक्षेला स्थगनादेश न देता विद्यापीठाने २४ ऑक्‍टोबरला प्रसिद्ध केलेल्या निर्देशानुसार परीक्षा संचालन व निकालाची प्रक्रिया पूर्ण करावी, असा आदेश दिला आहे.

हेही वाचा - हृदयद्रावक! मुलगा बुडताना पाहून वडील धावले मदतीला, पण दोघांचाही झाला अंत

२६ ऑक्‍टोबरपासून सुरू झालेल्या विद्यापीठाच्या जवळपास ७० टक्‍के परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. २ नोव्हेंबरपर्यंत परीक्षा संचालित होत असून विद्यापीठाकडून निकालसुद्धा लवकरात लवकर लावण्याचा प्रयत्न आहे. प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर यांनी यवतमाळ जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर भेटी देऊन परीक्षा संचालन कार्याचा आढावा घेतला.

पर्यावरण अभ्यासक्रमाची परीक्षा ६ तारखेला -
जे विद्यार्थी पर्यावरण अभ्यासक्रमाची परीक्षा अनुत्तीर्ण झाले असतील किंवा ते यापूर्वी पर्यावरण अभ्यासक्रमाच्या परीक्षेला प्रवेशित नसतील, अशा विद्यार्थ्यांची परीक्षा ६ नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी आठ ते नऊ या वेळेत महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. पर्यावरण अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिक बहुपर्यायी स्वरुपात (एमसीक्‍यू) विद्यापीठाकडून महाविद्यालयाला पाठविण्यात येणार असून सदर परीक्षेसाठी गुगल फॉर्मसुद्धा विद्यापीठाकडून महाविद्यालयांना पुरविण्यात येणार आहे.

हेही वाचा - अशोक चव्हाण कडाडले; तुम्ही सरकार पाडून दाखवा, आम्ही महाविकासआघाडीची ताकद दाखवू

परीक्षा घेतेवेळी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना परीक्षा क्रमांक द्यावे. यासंदर्भात काही अडचण असल्यास विद्यार्थ्यांनी सहाय्यक कुलसचिव मोनाली तोटे व सहाय्यक कुलसचिव दीपक वानखडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: decision of amravati university examination process is correct says high court