बेला व्हावा तालुका; कोंढाळीला हवे नायब तहसीलदार

फोटो ओळी बेला ः 30वर्षांपासून सुरू असलेल्या मागणीला केराची टोपली दाखविण्यात आल्यामुळे जनतेत भडकलेला रोष.
फोटो ओळी बेला ः 30वर्षांपासून सुरू असलेल्या मागणीला केराची टोपली दाखविण्यात आल्यामुळे जनतेत भडकलेला रोष.

नागपूर ः बेला तालुका व्हावा, याकरिता गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिकांचा संघर्ष कायम आहे. दळणवळण, सोयीसुविधांसाठी 35 वर्षांपासूनची नागरिकांची ही मागणी आहे. दुसरीकडे नगर परिषद व्हावी अशी अपेक्षा कोंढाळीवासी करीत आहेत. त्यासोबतच प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने परिसरातील गावांच्या समस्या सोडविण्यासाठी नायब तहसीलदार कार्यालय सुरू करावे, अशीही मागणी होत आहे. मध्यंतरी बेला येथे नायब तहसीलदार कार्यालय सुरू करण्यात आले होते. नंतर ते काही कारणास्तव बंद पडले. उमरेड तालुक्‍याच्या शेवटच्या टोकावर नागपूर व वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या बेला परिसराची लोकसंख्या 50 हजार इतकी आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा कारभार सुरळीत व्हावा व दूर पसरलेल्या गावांची दळणवळणाच्या दृष्टीने सोय व्हावी, याकरिता बेला तालुका झालाच पाहिजे, अशी सामाजिक संघटनांची मागणी आहे.

35 वर्षांपासूनची बेलावासींची मागणी थंडबस्त्यात
बेला : जिल्ह्याच्या व उमरेड तालुक्‍याच्या शेवटच्या टोकावर असलेले मोठे गाव म्हणजे बेला. दोन-तीन किलोमीटर अंतरावरून येथून वर्धा जिल्ह्याला प्रारंभ होतो. कोर्टकचेरी व तहसील कार्यालयाच्या कामकाजासाठी बेला व परिसरातील जनतेला पन्नास किलोमीटर अंतरावरील उमरेड येथे चकरा माराव्या लागतात. त्यामुळे बेला तालुका झालाच पाहिजे, अशी येथील जनतेची गेल्या तीस वर्षांपासूनची आग्रही मागणी आहे. पण त्याकडे दुर्लक्ष होत आहे. तालुक्‍याच्या मागणीसाठी बेला तालुका आंदोलन समितीने अनेकदा आंदोलन केले. परंतु राजकारण्यांनी आश्वासनांचे "चॉकलेट' देऊन आंदोलनकर्त्या नेत्यांची बोळवण केली. दरम्यान, तहसीलची मागणी असताना फडणवीस सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर केले होते. मात्र तेही आजतागायत सुरू झाले नाही. त्यामुळे जनतेच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे.

प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित
कोंढाळी ः काटोल तालुक्‍याची वाढती लोकसंख्या, मोठे क्षेत्रफळ, डोंगराळ व आदिवासीबहुल भागामुळे तालुक्‍यात कोंढाळी राजस्व सर्कलच्या भागात कोंढाळीला तालुका किंवा अपर तहसील कार्यालय बनविण्याची शासनदरबारी कागदपत्रांची पूर्तता होऊनही फक्त लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याआभावी कोंढाळीला असूनही अपर तहसील कार्यालयाचा दर्जा मिळाला नाही. हे कोंढाळी व परिसरातील आदिवासी जाती-जमाती व भटके अनुसूचित जाती, समाजी, भटक्‍या जाती व इतर मागास प्रवर्गातील नागरिकांचे दुर्भाग्यच समजावे, अशा प्रतिक्रिया या भागातील नागरिक व युवावर्गातून व्यक्‍त होत आहेत. सध्या काटोल तालुक्‍यावर मोठ्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने कामाचा अतिरिक्‍त ताण पडत आहे, याकरिता प्रशासकीय व जनसामान्यांच्या सोईकरिता काटोल तालुक्‍याच्या कोंढाळी नायब तहसीलदार कार्यालयाचा वा अपर तहसील कार्यालयाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. जिल्ह्यातील देवलापार, गोंदिया जिल्ह्यातील चिचगड व चंद्रपूर या जिल्ह्यातील चिमूर तालुक्‍याचे विभाजन करून अपर तहसील कार्यालयाचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र, मागील 30 वर्षांपासून कोंढाळी येथील नागरिकांनी तालुक्‍याची मागणी करूनही आजही साधे अपर तहसील कार्यालय मंजूर झाले नाही.

समस्या सुटतील
बेला तालुका झाला तर अनेक समस्या सुटतील व खऱ्या अर्थाने परिसराचा विकास होईल, अन्यथा जनताच निवडणुकीत हिसका दाखवेल.
सुनील गावंडे, ग्रा. पं. सदस्य, बेला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com