नक्षलवादाला विकास हेच उत्तर; शरद पवार | Naxalism | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar
नक्षलवादाला विकास हेच उत्तर; शरद पवार

नक्षलवादाला विकास हेच उत्तर; शरद पवार

गडचिरोली - मागील काही वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद कमी होत आहे. पण, तो संपला किंवा लगेच संपेल या भ्रमात राहण्यात अर्थ नाही. नक्षलवादाला आधीपासूनच सामाजिक-आर्थिक समस्या मानले गेले. त्यानुसार विकास करण्याचा प्रयत्न झाला. पण नक्षलवादाला सर्वंकष विकास हेच उत्तर आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. तर देसाईगंज येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी धर्मरावबाबा आत्राम हे लोकसभेचे तर त्यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम-हलगेकर विधानसभेच्या उमेदवार राहतील, असे घोषित केले.

गडचिरोली जिल्हा दौऱ्यादरम्यान पवार यांनी गुरुवारी (ता. १८) सर्किट हाउस येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम-हलगेकर आदी उपस्थित होते. पवार म्हणाले की, मुख्यमंत्रिपदाच्या काळात मी जिल्ह्याची स्थिती समजून घेतली होती. येथे दळणवळणाची सुविधा नव्हती. म्हणून रस्त्यांचे बांधकाम मोठ्या प्रमाणात केले. नागरिकांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रम व इतर उपक्रमांसाठी आर्थिक तरतूद केली. त्या कामाचे सकारात्मक परिणाम आता दिसून येत आहेत. मात्र, गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद फोफावण्याचे मुख्य कारण येथील विकासाकडे झालेले दुर्लक्ष आहे. म्हणूनच सुरजागडसारखे मोठ्या संख्येने रोजगार देणारे उद्योग या जिल्ह्यात अत्यावश्यक आहेत.

हेही वाचा: "तुम्ही आदिवासींमध्ये फूट पाडत आहात"; फडणवीसांचा पवारांना टोला

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाबद्दल ते म्हणाले की, त्यांच्या मागण्यांसंदर्भात केंद्र सरकारने चर्चा करायला हवी. कायद्यात जिथे दुरुस्तीला वाव आहे तिथे दुरुस्ती करावी. राज्यात सुरू असलेले एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत पवार यांनी सांगितले की, विलीनीकरण सोडून इतर मागण्यांवर एकमत झाले आहे. कारण विलीनीकरण सोपे नाही. या महामंडळाचे विलीनीकरण केले तर इतर महामंडळांकडून अशीच मागणी येण्याची शक्यता आहे.

नाना पटोले यांना त्यांनी टोला लगावला. मला असे वाटत होते की काँग्रेसमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार दिल्लीच्या नेत्यांना आहेत, पण आता चंद्रपूर, भंडारा, गोंदियाचे नेते काँग्रेसचे निर्णय घेत आहेत, अशी टिप्पणी पवार यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अतिशय उत्तम मुख्यमंत्री असल्याचेही ते म्हणाले.

निवडणुकीचा बिगूल

दरम्यान, देसाईगंज येथील मेळाव्यात बोलताना पवार यांनी अहेरीचे विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना लोकसभेचे, तर त्यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम-हलगेकर यांना विधानसभेचे तिकीट देण्याचे जाहीर केले. जिल्ह्यातील एक लोकसभा आणि एक विधानसभेचा उमेदवार थेट मेळाव्यातून घोषित करून त्यांनी निवडणुकीचा बिगुल फुंकल्याचे मानले जात आहे. आगामी निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय झाला नसताना पवारांनी उमेदवार घोषित केले आहेत.

हेही वाचा: ‘दंगली घडविणाऱ्यांच्या हाती सत्तेची सूत्रे जाता काम नये’

फूट पाडण्याचा प्रयत्न

चंद्रपूर - त्रिपुरामध्ये घटनेनंतर अमरावतीमध्ये दंगल पेटण्याचे कारण काय? याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. धर्म, जात, भाषा यावरून काही विघातक शक्ती फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. देश एकसंध ठेवायचा असेल तर दंगली घडविणाऱ्या लोकांच्या हातात सत्तेची सूत्रे जाता काम नये, असे आवाहन शरद पवार यांनी जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे (ग्रामीण) मूल येथील क्रीडा संकुलात गुरुवारी आयोजित मेळाव्यात केले.

loading image
go to top