अखेर नगरपरिषदेची सर्वसाधारण सभेची मोहीम फत्ते, विकासकामांवर गाजली सभा

मिलिंद उमरे
Sunday, 13 December 2020

सभेत नगर परिषद क्षेत्रातील लांजेडा व स्नेहनगर येथील नागरिकांच्या मागणीनुसार ओपन पेसवर पाच लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे बांधकाम करण्यासाठी प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत गडचिरोली शहराला 'ओडीएफ' करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

गडचिरोली : नगर परिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष योगिता पिपरे यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष यांच्या दालनात ऑनलाइन व ऑफलाइन पार पडली. सभेत 2020-21 च्या आर्थिक नियोजन तसेच शहरविकासाच्या 72 मुद्यांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान, विकासकामांना अडथळे निर्माण करणाऱ्या विरोधकांचे मनसुबे नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी हाणून पाडले. 

हेही वाचा - विद्यार्थ्यांनो, पदव्युत्तर प्रवेशाला मिळणार नाही मुदतवाढ

सभेत नगर परिषद क्षेत्रातील लांजेडा व स्नेहनगर येथील नागरिकांच्या मागणीनुसार ओपन पेसवर पाच लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे बांधकाम करण्यासाठी प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत गडचिरोली शहराला 'ओडीएफ' करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. 2 ऑक्‍टोबर 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये माझी वसुंधरा अभियान राबविण्याबाबत प्राप्त शासननिर्णयानुसार नगर परिषदेत अभियानाची अंमलबजावणी करण्यात आली. नगर परिषदेकडून दलित वस्तीसाठी वाढीव वीजखांबांसाठी 54 लाखांचा निधी महावितरण विभागाकडे पाठविला आहे. विसापूर, सुभाष वॉर्ड, नेहरू वॉर्ड, गांधी वॉर्ड, लांजेडा, इंदिरानगर, रामनगर या वस्त्यांमध्ये गरजू लोकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांची निविदा डीपीआर शासनाकडे पाठविला आहे. गडचिरोली शहरात नगर परिषदेच्या वतीने गोकुलनगर, शाहूनगर, फुले वॉर्ड येथील सुधारित अतिक्रमित जागेचा प्रस्ताव मंजूर करून शासनाकडे पाठविण्यात आला. शहरातील 11 वर्षांपूर्वी राहत असलेल्या झोपडपट्टी भागातील अतिक्रमण नियमित करण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा - राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रार्थना मंदिराचा वाद...

जिल्ह्याअंतंर्गत वैशिष्ट्यपूर्ण नगरोत्थान, दलित वस्ती, दलितेतर, प्रस्ताव व अनुदान आदी अनुदानामधून गडचिरोली शहरातील व संकुल परिसरातील सिमेंट रस्ते, डांबरीकरणाचे रस्ते, सिमेंट नाली बांधकामाच्या प्रस्तावाला 2019-20 व 2020-21 वर्षामध्ये 15 कोटींची मंजुरी देण्यात आली. सुभाष वॉर्ड येथील आठवडी बाजाराला संत जगनाडे महाराज नाव देण्याचे सभेत मंजूर करण्यात आले. तसेच चंद्रपूर मार्गावरील परिसराला गणेशनगर नाव देण्यात आले. गोकुलनगर येथील नगर परिषद प्राथमिक शाळा इमारतीत असलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र या शाळेच्या पटांगणात नवीन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे बांधकाम एयूएचएमअंतर्गत करण्याबाबत चर्चा करण्यात आली. हरितपट्टा, वृक्षारोपण, वृक्षजतन, संवर्धन आदीबाबत प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. सभेला नगर परिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, मुख्याधिकारी संजीव ओहोळ, बांधकाम सभापती आनंद श्रुंगारपवार, महिला व बालकल्याण सभापती लता लाटकर, वित्त व नियोजन सभापती नीता उंदीरवाडे, पाणीपुरवठा सभापती वैष्णवी नैताम, शिक्षण सभापती रितू कोलते, नगरसेवक सतीश विधाते, रमेश चौधरी, भूपेश कुळमेथे, प्रशांत खोब्रागडे,  रमेश भुरसे आदी उपस्थित होते.

हेही वाचा - सिंचन विहीरींसाठी अनुदानच नाही, शेतकरी उसनवारीवर करतात बांधकाम

अखेर मोहीम फत्ते -
यापूर्वी नगर परिषदेच्या अध्यक्ष योगिता पिपरे व मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांनी पालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केला होता. पण, तेव्हा बहुतांश नगरसेवकांनी याला विरोध करत सभेकडे पाठ फिरवली होती. आमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही, अशीही न पटणारी गंमतीदार कारणे काही नगरसेवकांनी पुढे केली होती. पण, आता ऑनलाइन व ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने सभा घेतल्याने सर्वसाधारण सभेची ही मोहीम फत्ते झाली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: development works discus in gadchiroli corporation meeting