
अमरावती : आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये कोरोना नियंत्रणात आणता येऊ शकते, तेव्हा अमरावतीत का नाही?, त्यासाठी प्रशासनासोबतच अमरावतीकरांनी हातात हात घालून प्रयत्न केले पाहिजेत, काहीही करून कोरोनाला हरवायचचं, असा दृढविश्वास घेऊन हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे सर्वेसर्वा पद्मश्री प्रभाकरराव वैद्य आता मैदानात उतरणार आहेत.
हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, हेल्पलाइन तसेच जिल्हा प्रशासनाकडून आता संयुक्त आराखडा तयार केला जात आहे. त्यानुसार वॉर्डा-वॉर्डात कोरोना योद्धे तयार करण्यात येणार असून, कोरोनाबाधित तसेच विलगीकरणातील नागरिकांवर ते पाळत ठेवतील. मागील काही दिवसांत अमरावतीमधील कोरोना रुग्णांच्या संख्येने एक हजारचा आकडा पार केलेला आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, प्रशासनदेखील हतबल झाले आहे.
काय करावे काहीच कळत नाही, असे वातावरण निर्माण झालेले असतानाच आता खुद्द प्रभाकरराव वैद्य यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी हव्याप्र मंडळ तसेच हेल्पलाइनचा असलेला जनाधार पाहता शहरात नवीन प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. धारावीसारख्या झोपडपट्टीमध्ये स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या मदतीने कोरोनावर काही अंशी नियंत्रण मिळविले आहे. ते पाहता शहरातदेखील धारावी पॅटर्न लागू करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
तीन दिवसांपासून हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. गुरुवारी (ता. 16) शहरातील नगरसेवक तसेच डॉक्टरांची बैठक प्रभाकरराव वैद्य, डॉ. माधुरी चेंडके तसेच प्रा. संजय तिरथकर यांच्या उपस्थितीत पार पडली. वॉर्डा-वॉर्डात कोरोना योद्धे तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
सामान्यपणे एखाद्या कुटुंबातील सदस्य कोरोनाबाधित झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला शासकीय विलगीकरण केंद्रात आणण्यात येते, त्यामुळे नागरिकांमध्ये भीती व चिंतेचे वातावरण निर्माण होते. ते टाळण्यासाठी घरीच विलगीकरणाची व्यवस्था असल्यास कुटुंबाला घरीच विलगीकरणात राहू देण्याबाबत चर्चा करण्यात आली. विलगीकरणातून बाहेर येणाऱ्या व्यक्तींवर कोरोना योद्धांकडून लक्ष दिले जाईल. नियमांचा भंग करणाऱ्यांची माहिती प्रशासनाला कळविण्यानंतर संबंधितांवर कारवाई होईल, असेही या बैठकीत सांगण्यात आले. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय जिल्हाधिकारी व आरोग्ययंत्रणेचा राहणार आहे.
शहरातील सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, मनपाचे पदाधिकारी व नगरसेवकांशी चर्चा झाल्यानंतर आता शुक्रवारी शहरातील खासदार व आमदारांना हेल्पलाइनच्या बैठकीला पाचारण करण्यात आल्याचे प्रा. संजय तीरथकर यांनी सांगितले. शनिवारी कोरोना योद्धांच्या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल.
संपादन : अतुल मांगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.