
सायबर गुन्हेगारीवर राज्य करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केल्यामुळे उपविभागीय पोलिस अधीक्षक उदयसिंह चंदेल, ठाणेदार सोनाजी आम्ले, सहायक पोलिस निरीक्षक धिरेंद्रसिंह बिलवाल, दीपक ढगे यांचे कौतुक होत आहे.
दिग्रस (जि. यवतमाळ) : स्थानिक रहिवासी असलेले सेवानिवृत्त रेणुराव विठ्ठलराव ठाकरे यांच्या खात्यातून ऑनलाईन पद्धतीने गंडा घातल्याचा प्रकार गेल्या ९ महिन्यांपूर्वी घडला होता. ती ऑनलाईन गंडा घालणारी टोळी दिग्रस पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. या टोळीतील एका आरोपीला बिहार राज्यातील नवादा जिल्ह्यातून अटक करण्यात दिग्रस पोलिसांना यश आले आहे. मात्र, मुख्य आरोपीचा अद्याप पत्ता लागलेला नाही.
सविस्तर वृत्त असे, नऊ महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त रेणुराव ठाकरे यांच्या दिग्रस शाखेच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यातून दोन लाख ४० हजारांची रक्कम ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून विविध बोगस बँक खात्याचा वापर करून वळती केली होती. या प्रकरणाचा तपास करीत दिग्रस पोलिस बिहार राज्यातील आजमपूर, पोष्ट जलालपूर, तालुका वार्सलिगज, जिल्हा नवादा या ठिकाणी पोहोचले. यावेळी दिग्रस पोलिस हे फिर्यादी रेणुराव ठाकरे यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्याची सखोल चौकशी करीत होते.
अधिक वाचा - टिनाच्या शेडात पाच मुली, माय आणि आजी, चार महिन्यांपासून नाही अंघोळ
दिग्रसच्या पोलिसांनी २७ ते २९मे २०२० पर्यंत घडलेल्या सर्व घटनाक्रमाचा बारीक पद्धतीने अभ्यास केला. त्यावरून आरोपी विकास कुमार विनोदसिंह याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने वेगवेगळ्या बोगस खात्यांचा एटीएम, बोगस सिमकार्ड आणि मोबाईल व त्याच्या फसवणुकीच्या भाषाशैलीचा वापर करत सुमारे २ लाख ४० हजार रुपयांची रक्कम लंपास केलेल्याची सविस्तर माहिती उघडकीस आली.
माहितीवरून दिग्रस पोलिसांनी आरोपीच्या राहत्या घराची झाडाझडती घेतली असता आरोपी विकास कुमार विनोदसिंह याच्याकडून एसबीआय बँकेचे २ एटीएम, २ हजार किमतीचा रियल मी कंपनीचा मोबाईल हँडसेट, दुसरा १ हजार ५०० रुपये किमतीचा रियल मी कंपनीचा मोबाईल हँडसेट, तिसरा १० हजार रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल हँडसेट आणि ७०० रुपयाचा सॅमसंग कंपनीचा हँडसेट तसेच ऑनलाइन खात्यातून रक्कम काढण्यात वापरण्यात येणारे साहित्य यावेळी जप्त करण्यात आले.
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधीक्षक उदयसिह चंदेल यांच्या मार्गदर्शनात दिग्रसचे ठाणेदार सोनाजी आम्ले, सहाय्यक पोलिस निरीक्षक धीरेंद्रसिंग बीलवाल, दीपक ढगे यांनी पार पाडली. ऑनलाइन गंडा घालणाऱ्या टोळीतील एकास दिग्रस पोलिसांनी पकडले असले तरी मुख्य आरोपी आद्यपही फरार आहे.
विदर्भातल्या ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा
दिग्रसचे फिर्यादी ठाकरे यांच्या खात्यातून पहिल्या टप्प्यात ४९ हजार, दुसऱ्या टप्प्यात ४२ हजार, तिसऱ्या टप्प्यात ९९ हजार ५०० रुपये व चौथ्या टप्प्यात ४९ हजार ५०० रुपये असे एकूण २ लाख ४० हजार रुपये खात्यातून लंपास केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या विरुद्ध ५२१ /२०२० भादवी कलम ४२० सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (ड) प्रमाणे गुन्ह्याची नोंद करत पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता आरोपीला शनिवारपर्यंत (१३ फेब्रुवारी) पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
सायबर गुन्हेगारीवर राज्य करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केल्यामुळे उपविभागीय पोलिस अधीक्षक उदयसिंह चंदेल, ठाणेदार सोनाजी आम्ले, सहायक पोलिस निरीक्षक धिरेंद्रसिंह बिलवाल, दीपक ढगे यांचे कौतुक होत आहे. या प्रकरणात आणि या प्रकरणाशी निगडित असलेल्या भारतातील अनेक अशा टोळ्यांचा तपास करण्यासाठी ठाणेदार सोनाजी आम्ले आपल्या टीमच्या माध्यमातून पुढील कार्यवाही करीत आहेत.
या प्रकरणाचा छडा लागल्यामुळे देशातील मोठे जाळे हाताला लागून एक टोळी उजेडात येऊ शकते असे ठाणेदार सोनाजी आम्ले यांच्याकडून सांगण्यात आले. सदर प्रकरणातील आरोपीस पकडण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक धिरेंद्रसिंह बिलवाल आणि त्यांच्या टीमचे मोठे योगदान असून या घटनाक्रमा बाबत बिलवाल यांना विचारले असता, त्यांनी सदर टोळी समोरच्या व्यक्तीला गुंगारा देण्याच्या हेतूने झारखंड मधून बोगस सिमच्या माध्यमातून कॉल करणे, बिहार मधून बोगस बँक खात्याच्या माध्यमातून पैशाची उलाढाल करणे आणि पश्चिम बंगाल मधून संपूर्ण यंत्रणा चालवणे अशा पद्धतीने यांची हे आंतराज्यीय पद्धतीने काम चालत असल्याचे ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
फिक्स डिपॉझिट अकाउंटमधून २ लाख ४० हजार रुपये बनावट खात्यात वळते केल्याचा प्रकार घडल्यानंतर २ जून २०२० ला ‘सकाळ’ने बातमी प्रसिद्ध केली होती. सायबर गुन्ह्यांत वाढ होत असल्याने पोलिसांनी विशेष लक्ष देण्याबाबत ‘सकाळ’ने वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपी टोळीला पकडण्यासाठी विशेष तपास करण्यात आला. यामुळे ज्यांच्या खात्यातून रक्कम वळती केली होती त्या रेणुराव ठाकरे यांनी ‘सकाळ’चे आभार मानले.