esakal | पटाच्या शेऱ्या-वाघ्याची काळ्या मातीत शाळा; शंकरपटावरील बंदीने शौकिनांमध्ये निराशा
sakal

बोलून बातमी शोधा

Disappointment among fans with ban on Shankarpatta Yavatmal news

शंकरपट बघण्यासाठी व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दूरवरून शौकीन हजेरी लावायचे. विशेष बाब म्हणजे या स्पर्धेत बैल सुसाट वेगाने पळावे, यासाठी काठीने मारणे, त्यांना पुरानी टोचण्याला बंधनं होते.

पटाच्या शेऱ्या-वाघ्याची काळ्या मातीत शाळा; शंकरपटावरील बंदीने शौकिनांमध्ये निराशा

sakal_logo
By
रामदास पद्मावार

दिग्रस (जि. यवतमाळ) : साधारणतः एक दशकापूर्वी ग्रामीण संस्कृतीचे चित्र कृषिप्रधान होते. ग्रामीण संस्कृतीचा आत्मा कृषीच होता. आता हे चित्र बदलले दिसते. बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली. मजुरांची जागा यंत्रांनी घेतली. हळुहळू संस्कृती कूस बदलत असून जुन्या अनेक गोष्टी कालबाह्य होताना दिसत आहे. शंकरपट, कुश्त्यांची दंगल व कबड्डीचे सामने आता होताना दिसत नाही. आजही, काही शौकीन जुन्या काळातील खेळ व संस्कृती टिकविण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

नोव्हेंबरमध्ये खरिपातील पिके निघाली की रब्बीला दोन महिने तरी अवधी असायचा. दरम्यान, खेड्यात यात्रा व जत्रा भरत असे. काही गावे तर कबड्डीचे सामने, शंकरपट व कुश्त्यांच्या दंगलीसाठी ओळखली जात. यात्रा-जत्रांमधून नाटक, कव्वाल्यांचे कार्यक्रम, लावण्या, नाच-गाणे, तमाशे सादर व्हायचे. टुरिंग टॉकिजमधून मराठी, हिंदी चित्रपट दाखविले जात. मराठी चित्रपट अभिनेता निळू फुले, श्रीराम लागू, ललिता पवार, दादा कोंडके, उषा चव्हाण यांचे चित्रपट हमखास दाखविले जात.

अधिक वाचा - दुर्दैवी! रुग्णवाहिकेअभावी जुळ्यांचा मृत्यू; मेळघाटच्या आरोग्य व्यवस्थेची लक्तरे वेशीला

अमिताभच्या जंजीर हा चित्रपट अनेकांनी जत्रेतच बघितला असेल. मर्दानी खेळांसोबतच मनोरंजनालाचे अनेक कार्यक्रम बघण्याची संधीच असायची. दहा किलोमीटरच्या आत एका गावात शंकरपट भरायचा. दुरवरून शेतकरी आपली बैलजोडी घेऊन पटाच्या ठिकाणी विकायला आणायचे. शंकरपटाच्या ठिकाणी बैलजोडीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होत. शंकरपटाच्या जोडीला मोठी किमत असायची. पटात धावणारी जोडी लाखांमध्ये विकली जायची.

शेतकरी घरच्या गाईच्या वळूलाच पटासाठी तयार करीत. त्यांना गावखारीत प्रशिक्षण देत. शेऱ्या-वाघ्या, नख्या, लाख्या, जांभळ्या, धवळ्या, पवळ्या, आंब्या, कपील्या अशी पटातील बैलांना मर्दानी नावे ठेवली जात. प्रशिक्षित जोडीलाच शंकरपटात सहभागी केले जायचे. पट हाकलणारेसुद्धा तरबेज असायचे. सेकंदाचा वेग जीवनाचा ठोका चुकवत असत. महिलाही यात मागे नसायच्या. काही महिला तर पटाच्या धूरकरी म्हणून प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांचा सन्मान केला जात होता. ज्यांच्याकडे पटाची जोडी असायची त्यांची गावातच नव्हे तर पंचक्रोशीत चर्चा असायची.

अधिक माहितीसाठी - क्रिम पोस्टवर वर्षानुवर्षे ठिय्या मांडून बसलेल्या पोलिसांना एसपींचा दणका; शहरातून थेट दुर्गम भागांत बदली

सधन शेतकरी म्हणून त्यांना ओळखले जात असे. असा अंगाचा थरकाप उडविणारा व जिवावर बेतणार्‍या शंकरपटावर आज राज्यात सर्वत्र बंदी आहे. मुक्या प्राण्यांची हेळसांड थांबविण्यासाठी प्राणिप्रेमींच्या मागणीला दाद देत न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली जात आहे. शंकरपटाच्या रांगड्या बैलांना वाऱ्याच्या वेगात धावण्याचा विसर पडू नये, यासाठी काळ्या मातीत प्रशिक्षण देण्यासाठी आजही  ‘शाळा’ भरविली जात आहे. दिग्रस जवळील आपल्या गावखारीत शेऱ्या-वाघ्याला प्रशिक्षण देत असलेल्या शेतकऱ्याने भूतकाळातील आठवणींना उजाळा दिला आहे.

शंकरपट बंद झाल्याने निराशा झाली खरी. शंकरपट पुन्हा सुरू व्हावे, यासाठी शेतकरीही न्यायालयात गेले. मात्र, त्यांना यात यश आले नाही. एक दिवस शंकरपट सुरू होईल, अशी अपेक्षा त्यांना आहे. कसदार, रांगडी बैल जोडी आपल्या संपूर्ण ताकदीनिशी वार्‍याच्या वेगाने धावते. तर या वेगवान जोडीवर ताबा ठेवणाऱ्या धुरकऱ्याला शंकरपटात मानाचे स्थान आहे. वर्षभर शेतात राबराब राबणारा शेतकरी व त्याच्या बैलजोडीला प्रोत्साहित करण्यासाठी शंकरपटाचे आयोजन यात्रा व ऊर्समध्ये केले जायचे.

जाणून घ्या - सुखी संसाराचा करूण अंत; मैत्रिणीच्या लग्नास जाण्यास पतीनं केला विरोध अन् नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

शंकरपट बघण्यासाठी व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दूरवरून शौकीन हजेरी लावायचे. विशेष बाब म्हणजे या स्पर्धेत बैल सुसाट वेगाने पळावे, यासाठी काठीने मारणे, त्यांना पुरानी टोचण्याला बंधनं होते. काठीचा उपयोग केल्यास ती जोडी स्पर्धेतून बाद होत होती. त्यामुळे धुरकरी बैलाचे कासरे आवरून, शेपूट ओढून व तोंडाने ओरडून सुसाट वेगाने पळवून निर्धारित अंतर वेळेत पार करायचे. शंकरपटावर बंदी आली आणि एका थरारक स्पर्धेला विराम मिळाला.

धुरकऱ्याच्या आवाजावर खेळ

मैदानावर धावपट्टी तयार करून धुरकऱ्याच्या आवाज, इशाऱ्यावर आणि केवळ कासऱ्यांच्या हालचालीवर ८० मीटरचे ठराविक अंतर केवळ पाच ते सात सेकंदात पार करणाऱ्या स्पर्धक जोडीला मोठ्या रकमेचे बक्षीस व विशेष सन्मान मिळायचा.

loading image