स्थलांतरित पक्ष्यांसाठी पक्षीप्रेमींच्या वाट्याला प्रतीक्षाच 

साईनाथ सोनटक्के
Tuesday, 17 November 2020

चंद्रपूर जिल्ह्यात हिवाळ्याच्या दरम्यान सररूची, थापट्या, सुंदरबटवा, लालसरी, तिरंगी बदक, ब्राह्मणी बदक, पट्टकादंब, विविध प्रजातींचे धोबी, दलदल ससाणा, कलहंस असे अनेक परदेशी पाहुणे पक्षी येतात. यंदाही हे पक्षी येणार असले तरी त्यांना यायला जरा उशीर होणार आहे.

चंद्रपूर : यंदा अधिक प्रमाणात पाऊस पडल्याने तलाव व इतर पानस्थळांमधील जलस्तर उंचावला आहे. परदेशातून येणाऱ्या स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन उशिरा होण्याची चिन्हे दिसत आहेत. दरवर्षी ऑक्‍टोबर महिन्यापासूनच अनेक ठिकाणी स्थलांतरित पक्षी दिसू लागतात. परंतु, यंदा अजूनही ते फारसे दिसत नसल्याने पक्षीप्रेमींच्या वाट्याला प्रतीक्षाच येत आहे.

दरवर्षी पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातून उड्डाण करीत अनेक पक्षी भारतासारख्या उष्ण कटीबंधीय देशात येतात. साधारणत: सप्टेंबर महिना संपल्यानंतर ऑक्‍टोबरच्या मध्यापासूनच अनेक ठिकाणी स्थलांतरित पक्षी दिसू लागतात. पण यंदा पाऊस जास्त झाल्याने जलस्तर उंचावला असून या हिवाळी पाहुण्यांसाठी आवश्‍यक शैवाल व इतर खाद्य अद्याप तयार नाही. त्यामुळे पक्ष्यांचे स्थलांतर लांबणार असे सुतोवाच पूर्वीच पक्षीतज्ज्ञांनी केले होते.

जाणून घ्या - Video : जनावरांना बिल्ला लावल्यास तातडीने मिळणार नुकसान भरपाई; हेही आहेत फायदे

चंद्रपूर जिल्ह्यात हिवाळ्याच्या दरम्यान सररूची, थापट्या, सुंदरबटवा, लालसरी, तिरंगी बदक, ब्राह्मणी बदक, पट्टकादंब, विविध प्रजातींचे धोबी, दलदल ससाणा, कलहंस असे अनेक परदेशी पाहुणे पक्षी येतात. यंदाही हे पक्षी येणार असले तरी त्यांना यायला जरा उशीर होणार आहे.

शिवाय अनेक तलाव तुडुंब भरून असल्याने या पक्ष्यांचे जवळून दर्शन घेताना काही अडचणी येणार आहेत. पण, एकूणच यंदा पाऊस चांगला झाल्याने सर्वत्र हिरवाई असून या पार्श्‍वभूमीवर उशिरा आलेले पक्षीही मोठा आनंद देतील, असा विश्‍वास व्यक्त होत आहे.

परदेशी पाहुण्यांची वाट

दरवर्षी या काळात विशेषत: दिवाळीच्या सुट्ट्यांत मोठ्या संख्येने स्थलांतरित पक्ष्यांचे निरीक्षण करण्यासाठी विविध पाणस्थळांवर जाणाऱ्या पक्षीप्रेमींची निराशा झाली आहे. अद्यापही ते या परदेशी पाहुण्यांची उत्कंठतेने वाट बघत आहेत. 

येथे होते दर्शन

चंद्रपूर जिल्ह्यात इरई धरण, चारगाव धरण, चंदई नाला, ॲश पॉंड, जुनोना तलाव, अमल नाला, मूल येथील तलाव, सुशीचा (दाबगाव) तलाव, मोहुर्लीचा तलाव, घोडाझरी तलाव, पाथरी येथील तलाव, इरई, वर्धा, झरपट नदीचा परिसर अशा अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने स्थलांतरीत पक्षी दिसून येतात.

अधिक माहितीसाठी - नागपुरात शहरात पुन्हा गॅंगवॉर भडकले; विजू मोहोड हत्याकांडाचा घेतला बदला

पक्षी येण्यास विलंब
पाहिजे तशी थंडी अजूनही पडली नाही. जिल्ह्यातील अनेक तलावांत पाणी भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे स्थलांतरित पक्षी येण्यास विलंब लागत आहे.
- बंडू धोतरे,
अध्यक्ष, इको प्रो. संघटना चंद्रपूर

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disappointment of bird watchers going for observation