जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार, दोन महिन्यात निवडणूक घेण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 20 February 2021

जिल्ह्यातील 14 सेवा सहकारी सोसायट्यांची निवडणूक घेण्याबाबतचे आदेश यापूर्वीच सहकार विभागाकडून देण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक घेण्याबाबतचे निर्देश सहकार विभागाला देण्यात आले आहे.

अमरावती : जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राचा कणा मानल्या जाणाऱ्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार दोन महिन्यांच्या आता निवडणूक घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे आता सहकार क्षेत्रात खऱ्या अर्थाने रणधुमाळी सुरू होणार आहे.  

हेही वाचा - धक्कादायक! जिल्हा परिषदेच्या आणखी १३ शाळा होणार बंद, विद्यार्थ्यांचे दुसऱ्या शाळेत...

जिल्ह्यातील 14 सेवा सहकारी सोसायट्यांची निवडणूक घेण्याबाबतचे आदेश यापूर्वीच सहकार विभागाकडून देण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक घेण्याबाबतचे निर्देश सहकार विभागाला देण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेवर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख तसेच माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांची एकहाती सत्ता असून प्रा. उत्तरा जगताप या विद्यमान अध्यक्षा आहेत. विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ डिसेंबर 2015 मध्येच संपुष्टात आला होता. मात्र, त्यानंतर युती सरकारकडून बँकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आला होता. मात्र, संचालक मंडळाने न्यायालयात जाऊन या निर्णयाला स्थगनादेश घेतला होता. तेव्हापासून विद्यमान संचालक मंडळाच्याच हाती बँकेचा कारभार सुरू आहे. मात्र, आता नव्याने निवडणुकीचा बिगुल वाजला असून सहकार क्षेत्रातील वातावरण सुद्धा तापणार आहे. लवकरच बँकेवर सहकार विभागाकडून प्रशासकांची नियुक्ती करण्यात येऊन निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होणार असल्याची माहिती आहे. 

हेही वाचा - मेळघाटची नवी ओळख; रोजगारामध्ये चिखलदरा प्रथम क्रमांकावर, मजुरांचे स्थलांतरही घटले

पाच वर्षांपूर्वी आम्ही कार्यकाळ संपल्यानंतर निवडणूक घेण्याची मागणी केली होती, मात्र तत्कालीन भाजप सरकारकडून प्रशासक बसविण्यात आल्यानंतर आम्ही न्यायालयात गेलो, न्यायालयाने विद्यमान संचालक मंडळालाच मुदतवाढ दिली होती. त्यानंतर आता निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. 
- बबलू देशमुख, संचालक तथा माजी अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: district bank election will held soon in amravati