esakal | म्युकरमायकोसिसचे नवे संकट आव्हानात्मक; लवकर निदान झाल्यास उपचार शक्‍य
sakal

बोलून बातमी शोधा

म्युकरमायकोसिसचे संकट आव्हानात्मक; लवकर निदान झाल्यास उपचार शक्‍य

म्युकरमायकोसिसचे संकट आव्हानात्मक; लवकर निदान झाल्यास उपचार शक्‍य

sakal_logo
By
मिलिंद उमरे

गडचिरोली : कोविड (coronavirus) झालेल्या रुग्णांना राज्यात काही ठिकाणी म्युकरमायकोसिस (Mucor mycosis) या बुरशीजन्य (काळी बुरशी) आजाराची लागण झाल्याचे समोर आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत या आजाराचा फक्त एकच रुग्ण आढळून आला असून, उपचारासाठी नागपूरला पाठविण्यात आले. तरीही हे नवे संकट आव्हानात्मक असून लवकर निदान झाल्यास उपचार शक्‍य आहे. नागरिकांना काही लक्षणे आढळून आल्यास तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. (Doctor said, The new crisis of Mucor mycosis is challenging)

जिल्ह्यात या आजाराचा आतापर्यंत केवळ एकच रुग्ण आढळून आला असला, तरी खबरदारी म्हणून आजाराविषयी खरी माहिती आत्मसात करणे गरजेचे आहे. म्युकरमायकोसिस या आजाराचे निदान वेळेत झाल्यास रुग्ण गंभीर स्थितीमध्ये न जाता त्याचा आजार बरा होतो, असे दिसून आले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनद्वारे म्युकरमायकोसिसबाबत मार्गदर्शक तत्त्वेही देण्यात आली आहेत. म्युकरमायकोसिस या आजाराला काळी बुरशी असेही म्हटले जाते.

हेही वाचा: कोरोना काळात तत्काळ पैसे हवेत? जाणून घ्या, बचत खात्यातून कसे काढायचे पैसे

हा बुरशीजन्य आजार असून, शरीरातील रोगप्रतिकारशक्ती जास्त प्रमाणात कमी झाल्यामुळे होतो. नुकतेच शासनाकडून या आजाराला साथरोग आजार म्हणूनही घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आरोग्य विभाग प्रशासन या रोगाबाबत सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करीत आहे. यातून लक्षणे असलेल्या संशयित रुग्णांना वेळेत उपचार व्हावेत हा उद्देश आहे.

या आजारामध्ये प्रामुख्याने सायन्समध्ये बाधा होते. तेथून डोळे, मेंदू, जबडा तसेच फुप्फुसापर्यंत पसरू शकतो. मधुमेह असलेले रुग्ण, रोग प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्ती, कॅन्सरबाधित रुग्ण, एचआयव्ही-एड्‌स बाधित रुग्ण व सद्य:स्थितीत कोविडसाठी स्टेरॉईडचे उपचार घेणारे रुग्ण आदींमध्ये या बुरशीचा संसर्ग झाल्यास गंभीर स्वरूपाचा आजार उद्‌भवू शकतो. या आजारामध्ये मृत्यूदर ५० टक्‍केच्या आसपास असून स्टेरॉईडचा वापर या आजाराची लागण होण्यातील एक प्रमुख घटक आहे.

हेही वाचा: विदर्भात १५ जूनपर्यंत मॉन्सून धडकणार? हवामान विभागातर्फे संकेत

स्टेरॉईडमुळे फुप्फुसामधील दाब कमी होतो व त्यामुळे रोगप्रतिकारकशक्तीच्या अनियंत्रित प्रतिक्रियेमुळे होणारे नुकसान टाळले जाते. तथापि यामुळे मधुमेह असलेल्या व नसलेल्या दोन्ही व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते तसेच रोगप्रतिकारक शक्ती कमी होते व हे म्युकरमायकोसीस होण्यास कारणीभूत ठरते त्यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तीमध्ये रक्तातील साखरेचे नियंत्रण हे खूप महत्त्वाचे आहे. साधारणपणे कोविडमधून उपचारानंतर बरे झालेल्या कोविड पश्‍चात एक महिन्यापर्यंत म्युकरमायकोसिस होण्याची शक्‍यता असते.

अनियंत्रित मधुमेह औषधांचा उपचारात वापर, स्टेरॉईडच्या वापरामुळे प्रतिकारशक्ती कमी होणे, इम्यूनोमॉडूलेटर औषधाचा उपचारात वापर, दीर्घकाळ आयसीयूमध्ये उपचार, दीर्घकाळ ऑक्‍सिजनवरील उपचार (नसल प्रॉंगचा वापर करून ), सहव्याधी (अवयव बदली किंवा कॅन्सर), होरीकॉमेझोल उपचार, दीर्घकाळासाठी ट्यूबमधून अन्न देणे, हुमीडीफायर बॉटलचे कंटामिनेशन, उच्च प्रतिजैविकाचा दीर्घकाळासाठी वापर, किडणी व लिव्हरचे जुने आजार म्युकरमायकोसिस होण्यास कारणीभूत ठरतात.

हेही वाचा: चंद्रशेखर बावनकुळे अचानक मौनात! राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा

असा ओळखा रुग्ण

साधारणपणे म्युकरमायकोसिस संशयित रुग्ण काही लक्षणांवरून ओळखता येतात. यात डोळे दुखणे, नाक बंद होणे, चेहऱ्यावर बधिरता येणे, दिसायला कमी किंवा दोन दोन प्रतिमा दिसणे, डोळ्याला सूज येणे, डोळा लाल होणे, डोळे दुखून उलटी होणे, वागण्यामध्ये बदल (नातेवाइकांना विचारणे), नाकातून रक्त किंवा काळा स्राव येणे, सध्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णामध्ये वाढ झालेली असल्याने म्युकरमायकोसिस या आजाराचा साथरोग आजारामध्ये समावेश केला असल्याने त्याचे नियमित सर्वेक्षण होणे आवश्‍यक आहे. या माध्यमातून रुग्णांचा लवकर शोध घेऊन त्यांना उपचाराखाली आणता येईल व रुग्णांमधील गंभीर आजार व मृत्यू टाळता येतील.

(Doctor said, The new crisis of Mucor mycosis is challenging)