...या कारणांमुळे शेतकरी झाले त्रस्त अन्‌ ऊस सोडून धानात झाले व्यस्त 

rice crop
rice crop

भंडारा : कृषी विभागाने नगदी पिकाबाबत प्रोत्साहन दिले. तसेच जिल्ह्यात दोन कारखाने उभे झाल्याने धानउत्पादक शेतकरी ऊस लागवड करण्याकडे वळले आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून वन्यप्राण्यांचा उपद्रव आणि चुकाऱ्यांना होणाऱ्या विलंबामुळे शेतकरी उसाऐवजी पुन्हा धान लागवडीकडे वळले आहेत. त्यामुळे उसाचे क्षेत्र झपाट्याने खाली आले आहे. 

भंडारा जिल्ह्यातील शेतकरी पूर्वापार धानाची लागवड करीत आहेत. परंतु, त्यातही तेल व डाळवर्गीय पिकांसोबत कडधान्य, भाजीपाला, ऊस इत्यादी पिके घेतली जात असल्याचा उल्लेख इंग्रज शासन काळातील गॅझेटियरमध्ये आहे. साकोली, तुमसर तालुक्‍यातील गुळाचा मध्य प्रदेश व विदर्भातील जिल्ह्यात व्यापार केला जात होता. आधुनिक काळात कृषी उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात आला. सिंचनाच्या सोयीनुसार शेतकरी वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन घेत आहेत. 1980 च्या दशकात जिल्ह्यातील नेत्यांनी शेतकऱ्यांना नगदी पीक घेता यावे यादृष्टीने प्रयत्न करून सहकारी तत्त्वावर साखर कारखाना सुरू केला. त्यानंतर पवनी तालुक्‍यात आणखी एका कारखान्याची मुहूर्तमेढ रोवण्याचा प्रयत्न झाला. परंतु, आपसातील ओढाताणीमुळे तो कारखाना पूर्ण झालाच नाही. 

दरम्यान, नगदी पीक घेण्याबाबत शासन व कृषी विभागाने प्रोत्साहन दिल्यामुळे शेतकऱ्यांनी उसाची लागवड करण्यावर भर दिला. या पिकाला सिंचनाची अधिक गरज असते. त्याबाबत भंडारा जिल्ह्यात तलाव, बोड्या विपुल प्रमाणात असल्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. त्यामुळे शेकडो टन उसाचा साखर कारखान्यांना पुरवठा होत होता. जिल्ह्यात उसाचे उत्पादन अधिक होत असल्याने मौदा व उमरेड तालुक्‍यातील कारखान्यांनासुद्धा जिल्ह्यातून ऊस पुरवठा केला जात होता. दरम्यान, सहकारी साखर कारखाना आर्थिक संकटात आल्याने त्याची विक्री करण्यात आली. 
तसेच लाखांदूर येथे एक लघु साखर कारखाना स्थापन करण्यात आला. त्याचा फायदा लाखांदूर व चौरास भागातील शेतकऱ्यांना होत होता. त्यावेळी जिल्ह्यातील उसाच्या पिकाखालील क्षेत्र 15 हजार हेक्‍टरपेक्षा अधिक होते. 

मात्र, कारखान्यांकडून चुकाऱ्यांना होणारा विलंब, वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढत गेल्याने शेतकऱ्यांना उसाचे पीक परवडेनासे झाले. शेवटी लाखांदूर येथील साखर कारखानाही बंद पडला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा आपल्या पारंपरिक पिकाकडे वळले आहेत. यावर्षी जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र 622 हेक्‍टरच्या जवळपास आहे. 

कोट्यवधींचे चुकारे अडले 

गेल्या हंगामात साकोली तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी साखर कारखान्याला उसाचा पुरवठा केला होता. मार्च महिन्यापासून कोरोना संकटामुळे लॉकडाउन करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे चुकारे कारखान्याकडे अडले आहेत. आता खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांवर आर्थिक संकट येत आहे. अशावेळी त्यांना उसाचे चुकारे लवकर मिळावे, अशी अपेक्षा आहे. 

वन्यप्राण्यांची वाढती संख्या 

जिल्ह्यात कोका, न्यू नागझिरा आणि कऱ्हांडला- पवनी- उमरेड हे नवीन अभयारण्य झाले आहेत. जिल्ह्यातील बहुतेक सर्व तालुक्‍यांतील अनेक गावे अभयारण्याच्या बफर झोनमध्ये येतात. गावाजवळील जंगलातून रानडुकरे व अन्य प्राणी उसाच्या वाडीत आश्रय घेतात. त्यांच्या शिकारीसाठी बिबटे व हिंस्र प्राणीही शेतात आल्याने शेतकऱ्यांसोबत वन्यप्राण्यांचा संघर्ष वाढला आहे. पवनी तालुक्‍यात व कोका या गावाजवळ उसाच्या शेतात बिबट्याची पिल्ले आढळून आली होती. वन्यप्राण्यांच्या भीतीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी उसाची लागवड करणे बंद केले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com