हे बयाण पोहचवणार अंकिताच्या मारेकऱ्याला फाशीपर्यंत

ankita
ankita

वर्धा : हिंगणघाट शहरात भर रस्त्यावर अंकिता पिसुड्डे या प्राध्यापक युवतीला अंगावर पेट्रोल टाकून जाळणारा आरोपी विकेश ऊर्फ विक्‍की नगराळे याच्या विरोधात भारतीय पुरावा कायद्यातील मृत्युपूर्व बयानाबाबतचा नियम पोलिसांसाठी वरदान ठरला आहे. अंकिताने घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शीजवळ दिलेले मृत्युपूर्व बयाणही आरोपीच्या गळ्याभोवती फाशीचा दोर आवळण्यास पुरेसा आहे.

संपूर्ण राज्यात संताप निर्माण करणाऱ्या या प्रकरणात घटनेनंतर पीडिता सतत मृत्यूशी झुंज देत होती. पीडितेच्या गंभीर प्रकृतीमुळे तिचे मृत्यूपूर्वी बयाण घेणे पोलिसांना शक्‍य झाले नव्हते. त्यामुळे पोलिसांचा तपासही रखडला होता. मात्र, मृत्युपूर्व बयानाबाबत असलेला नियम आरोपीच्या गळ्याभोवती फाशीचा दोर आवळणार आहे.

घटनेच्या वेळी एक महिला आणि दोन युवकांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस अंकिताने या तिघांना विक्की नगराळेने पेट्रोल टाकून पेटविल्याचे सांगितले होते. हे मृत्युपूर्व बयानच आरोपीला फाशीपर्यंत पोहोचविण्यासाठी पुरेस असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांच्या या तपासाला सरकारी अभियोक्‍त्यांकडूनही दुजोरा मिळत आहे.

अशा प्रकारच्या घटनांमध्ये मृत्यूशी झुंज देत असलेला व्यक्ती शुद्धीवर आल्यानंतर त्याचे मृत्युपूर्व बयान नोंदविण्यात येते. गंभीररीत्या जळालेल्या महिला किंवा पुरुषाचे मृत्युपूर्व बयान तहसीलदार किंवा नायब तहसीलदारांच्या समक्ष नोंदविला जाते. तर काही वेळ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलिस अधिकारी किंवा कर्मचारी ते बयाण नोंदवून घेतात. मात्र, हिंगणघाट प्रकरणात मृत्युपूर्व बयाण नोंदविता आले नाही. त्यामुळे पीडितेने घटनास्थळावर उपस्थितांना दिलेले बयाण महत्त्वाचे ठरते, असे विधि वर्तुळातून सांगण्यात आले आहे.

आज व्हिडिओ कॉन्फरन्सने पेशी
पोलिसांनी खबरदारीच्या दृष्टीने आरोपी विक्कीला न्यायालयात मध्यरात्रीच हजर केले होते. नंतर त्याला न्यायालयीन कोठडीसाठी वर्धा जिल्हा कारागृहातून नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात हलविले होते. त्याची न्यायालयीन कोठडी गुरुवारी (ता. 20) संपणार आहे. त्यामुळे आरोपीला हिंगणघाटच्या न्यायालयात नागपूर कारागृहातून व्हिडिओं कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजर केले जाणार आहे.

भारतीय पुरावा कायदा 1872 कलम 32(1)मध्ये कोणत्याही व्यक्तीने मृत्युपूर्वी त्याच्या मृत्यूबाबत काही कथन केले असेल तर ते ग्राह्य मानल्या जावे, असे नमूद आहे. जळत असलेल्या अंकिताला दोन तरुणांसह एका महिलेने विझविले होते. त्यावेळेस विक्की नगराळेने पेटवल्याचे अंकिताने सांगितले होते. हीच कबुली व रुग्णालयातील उपचार विक्कीला फाशीपर्यंत पोहोचविणारा ठरणार आहे.
विनय घुडे,
सरकारी अभियोक्‍ता, जिल्हा न्यायालय, वर्धा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com