खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट; राष्ट्रवादीत प्रवेश? 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 December 2019

गेल्या चार वर्षांपासून भाजपमध्ये कोंडी होत असल्याने नाराज असलेले एकनाथ खडसे कुठली भूमिका घेणार? कुठल्या पक्षात जाणार? याबाबत संपूर्ण राज्याला उत्सुकता आहे. नुकतेच भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी आयोजित कार्यक्रमात खडसे यांनी खदखद व्यक्त केली नाही तर भाजप नेतृत्वात जोरदार प्रहार करीत पक्ष सोडण्याचे संकेतही दिले होते. 

नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज नागपुरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. भाजपमध्ये डावलले जात असल्यामुळे नाराज असलेल्या खडसे यांनी काही दिवसांपूर्वी गोपिनाथगडावरील कार्यक्रमात पक्ष नेतृत्वावर थेट टीका केली होती. या वेळी भाषणात त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. त्यामुळे आज नागपुरात झालेल्या खडसे - पवार भेटीला महत्त्वप्राप्त झाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यापाठोपाठ आज सायंकाळी भाजपमधील नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेही नागपुरात दाखल झाले. त्यामुळे एकनाथ खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

गेल्या चार वर्षांपासून भाजपमध्ये कोंडी होत असल्याने नाराज असलेले एकनाथ खडसे कुठली भूमिका घेणार? कुठल्या पक्षात जाणार? याबाबत संपूर्ण राज्याला उत्सुकता आहे. नुकतेच भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी आयोजित कार्यक्रमात खडसे यांनी खदखद व्यक्त केली नाही तर भाजप नेतृत्वात जोरदार प्रहार करीत पक्ष सोडण्याचे संकेतही दिले होते. 

हेही वाचा - #NagpurWinterSession : महाविकास आघाडी पाच वर्षांची "मॅच' जिंकणार : मुख्यमंत्री

राज्यात ज्येष्ठ नेत्यांचा अपमान होत असल्याबाबतची माहिती देण्यास ते दिल्लीलाही जाऊन आले. परंतु, त्यांना विशेष प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी गोपीनाथगडावरून "माझा भरवसा करू नका' असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच सांगितले. या पार्श्‍वभूमीवर आज ते नागपुरात दाखल होताच राजकीय वर्तुळात त्यांच्या भाजप सोडण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. राज्याचे विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे. पक्षाच्या आमदारांचा वर्ग घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज सायंकाळी नागपुरात दाखल झाले. काही तासाच्या अंतराने एकनाथ खडसेही उपराजधानीत दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

महत्त्वाची बातमी - Video : जालियनवाला बागेतील दिवस परत आले : उद्धव ठाकरे

राजकीय वर्तुळात त्यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या सत्कार समारंभानिमित्त शरद पवार दिवसभर नागपुरात आहेत. खडसे उद्या त्यांच्यासोबत पुढील राजकीय वाटचालीबाबत खलबते करण्याची शक्‍यता आहे. राजकीय वर्तुळातील अंदाज खरे ठरल्यास खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश व्हाया नागपूर होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eknath khadse at nagpur, may enter in ncp