VIDEO: वृद्ध विधवेचा सरकारला प्रश्न ‘सोयाबीनच्या शेंगांमध्ये दाणा नाही, सोंगायचे की नाही तुम्हीच सांगा’

प्रशिक मकेश्वर
Sunday, 25 October 2020

दुसऱ्यांदा सोयाबीन पेरणी करून नुकसान भरून निघेल या आशेत नर्मदा सरदार यांनी पेरणी केली. मात्र, या सोयाबीनच्या शेंगांमध्ये दाणेच नसल्याने त्यांच्या पदरी पुन्हा निराशा आली. त्यामुळे आता शेतात असलेले सोयाबीन पीक सोंगायचे की नाही हा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे. सोयाबीन सोंगुनही जर हाती दाणा लागला नाही तर मजूर व सोयाबीन काढणाऱ्यांचे पैसे द्याचे कुठून.

तिवसा (जि. अमरावती) : निसर्ग कोपला आणि धो-धो बरसला. शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी करून गेला. यावर्षी निसर्गाने तुटपुंजा आलेला घास शेतकऱ्यांच्या तोंडून हिसकावून घेतला आहे. त्यामुळे तिवसा येथील वृद्ध विधवा महिलेने सरकारकडे मदतीची मागणी करीत ‘सोयाबीनच्या शेंगामध्ये दाणा नाही हो साहेब, सोंगायचे की नाही’ अशी दरकार लावली आहे.

यावर्षी पावसाचा ऋतूकाळ संपूनही मेघगर्जनेसह वादळी वारा पाऊस बरसला. या वादळी पावसामुळे बागाईदारपासून तर कोरडवाहू शेतीमध्ये पीक घेणारे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला आहे. जिल्ह्यात संत्रा, कपाशी, सोयाबीन या पिकाचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी होत आहे.

अधिक वाचा - VIDEO: मृत्यूचा 'अभद्र योगायोग'; या गावात एकाचा मृत्यू झाला तर आठवडाभरात दुसरा जातोच; नागरिकांची वाढते धाकधूक

तिवसा येथील नर्मदा सरदार या वृद्ध विधवा महिलेकडे शासनाची भोगवटदार २ची अडीच एकर शेत आहे. दरवर्षीप्रमाणे ते शेतात स्वतः पेरणी करून उत्पन्न घेतात. या अडीच एकरात त्यांना नफा-तोटा प्रमाणे दरवर्षी उत्पन्न होते. मात्र, यावर्षी त्यांना याच अडीच एकराच्या शेतीमध्ये मोठे नुकसान सोसावे लागत आहे. पावसाच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी सोयाबीन व तुरीची पेरणी केली. मात्र, सोयाबीन उगवलेच नसल्याने त्यांना पुन्हा पेरणी करावी लागली.

दुसऱ्यांदा सोयाबीन पेरणी करून नुकसान भरून निघेल या आशेत नर्मदा सरदार यांनी पेरणी केली. मात्र, या सोयाबीनच्या शेंगांमध्ये दाणेच नसल्याने त्यांच्या पदरी पुन्हा निराशा आली. त्यामुळे आता शेतात असलेले सोयाबीन पीक सोंगायचे की नाही हा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे. सोयाबीन सोंगुनही जर हाती दाणा लागला नाही तर मजूर व सोयाबीन काढणाऱ्यांचे पैसे द्याचे कुठून. त्यामुळे आता प्रशासनानेच सांगावे की हे सोयाबीन सोंगायचे की नाही, अशी हाक नर्मदा सरदार या प्रशासनाला देत आहे.

अधिक माहितीसाठी - श्वास घेण्यास त्रास होतोय? घाबरू नका पुढील उपाय करा आणि घ्या मोकळा श्वास

तालुक्यात सर्वचे पिकाचे मोठे नुकसान

महिनाभराआधी तालुक्यात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आला होता. यामध्ये संत्रा, कपाशी या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. याच पावसामुळे हाती आलेले सोयाबीन काळे पडले. एका आठवड्या आधीच्या पावसामुळे कपाशीचे कापूस असलेले बोंड खराब झाले. त्यामुळे तालुक्यात संत्रा, कपाशी, सोयाबीन या पिकांचे आतोनात नुकसान झाल्याचे दिसून येते.

 

 

पाहणीसाठी आले आणि गेले

नर्मदाबाई सरदार यांचे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लागतच शेत आहे. पीक उगवले नसल्याने त्यांच्या शेतात जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी पाहणी दौरा केला व मदत करू असे आश्वासन दिले. पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी आले पंचनामा केला व निघून गेले. मात्र, मदत अजूनपर्यंत आली नाही. त्यामुळे थेट पंचनामा व मदत अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Elderly widow needs help from government