मंदिरे उघडण्याची आहे सर्वांना प्रतीक्षा! भक्तांसह व्यावसायिकही बेचैन 

Temple
Temple

अमरावती ः कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर देवी-देवतांची मंदिरे बंदच आहेत. मार्चपासून बंद असलेल्या मंदिरांची कवाडे कधी उघडतील व आपला व्यवसाय कधी सुरू होईल, असा प्रश्‍न मंदिरांवर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना पडला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या सप्ताहात नवरात्रास प्रांरभ होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या व्यावसायिकांचे लक्ष मंदिर व्यवस्थापनाच्या निर्णयाकडे लागले आहे. तर शासनाकडून परवानगी मिळाल्याशिवाय मंदिर उघडता येणार नसल्याचे व्यवस्थापन समितीचे उत्तर आहे. 

विदर्भातील प्रसिद्ध अमरावती येथील श्री अंबादेवीचे मंदिर मार्च महिन्यापासून कोरोनाच्या संकटामुळे बंद आहे. परिणामी मंदिर परिसरातील प्रासादिक साहित्यासह खेळणी, बांगड्या, फोटोफ्रेम व हारफुले विकणारे मिळून शेकडोंच्या दुकानातील व्यवहार प्रभावित झाला आहे. लॉजिंग व हॉटेल व्यावसायिकांनाही आर्थिक फटका बसला आहे. दरम्यान, चैत्रातील नवरात्रही झाले. मार्च ते सप्टेंबर या कालावधीत समितीला लाखोंचा फटका बसला आहे. मंदिरात पुजारी व मोजक्‍या सदस्यांची नैमित्तिक पूजाअर्चा सुरू आहे. परंतु बाहेरून येणाऱ्या भाविकांना प्रवेश नाही. 

१७ ऑक्‍टोबरपासून नवरात्र सुरू होत आहे. नवरात्रात जिल्ह्याबाहेरून अगदी परप्रांतातून विक्रेते यात्रेत दुकाने घेऊन येतात. राजकमल चौक ते गांधी चौक दरम्यान रस्त्याच्या कडेला महापालिका भाडे आकारून या व्यावसायिकांना ओटे आखून देते. राज्यभरातून भाविक या यात्रेत सहभागी होतात. व्यवसाय चांगला होतो. किरकोळ विक्रेत्यांसह हॉटेल व लॉजिंगचाही व्यवसाय भरभराटीस येऊन मंदिर समितीलाही उत्पन्न मिळते. 

यंदा शासनस्तरावर मंदिर उघडण्यासंदर्भात निर्णय झालेला नाही. सद्यःस्थितीत शहर व जिल्ह्यातील कोरोना संक्रमणाची गती वाढली आहे. दररोज वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासन बेजार झाले असताना मंदिर उघडण्याची प्रतीक्षा कायम आहे. 

...तर ऑनलाइन दर्शनाची सोय करू 

शासनाकडून धर्मादाय आयुक्तांना काय आदेश येतात त्यावर मंदिर उघडायचे की नाही हे अवलंबून आहे. आमचे प्रयत्न सुरूच आहेत, निवेदनेही सरकारदप्तरी पाठविले आहेत. परवानगी दिल्यास कोरोना नियमांच्या पार्श्‍वभूमीवर भाविकांची दर्शनाची सोय करण्याची तयारी आहे. मात्र नवरात्रात परवानगी न मिळाल्यास भाविकांना घरबसल्या देवीचे दर्शन ऑनलाइन घडविण्याची योजना आहे. मार्चपासून मंदिर बंद असल्याने आर्थिक नुकसान झाले आहे, असे श्री अंबादेवी मंदिर संस्थानचे सचिव रवींद्र कर्वे यांनी सांगितले. 

आदेशावर अवलंबून आहे 

नवरात्रात किरकोळ व्यावसायिकांना ओटे देण्याचे नियोजन असले तरी ते शासनाच्या परवानगीवर अवलंबून आहे. मंदिर उघडण्याची व यात्रा भरविण्याची परवानगी मिळाली तरच योजना अमलात आणता येणार आहे. नियोजन तयार आहे, असे महापालिकेच्या बाजार व परवाना विभागाचे अधीक्षक उदय चव्हाण यांनी सांगितले. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com