घाबरण्याची गरज नाही, त्यांचा प्रयोग झाला यशस्वी.

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 April 2020

गडचिरोलीत सामूहिक निर्जंतुकीकरण कक्षाची सोय नव्हती. ही समस्या लक्षात घेत येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांच्या संकल्पनेतून सतीश त्रिनगरीवार यांच्या अजब-गजब विचार मंच या संस्थेने अनोखे निर्जंतुकीकरण कक्ष तयार केले आहे.

गडचिरोली : सध्या कोरोना विषाणूचे जगभरात थैमान सुरू असून त्यासाठी निर्जंतुकीकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, गडचिरोलीत सामूहिक निर्जंतुकीकरण कक्षाची सोय नव्हती. ही समस्या लक्षात घेत येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांच्या संकल्पनेतून सतीश त्रिनगरीवार यांच्या अजब-गजब विचार मंच या संस्थेने अनोखे निर्जंतुकीकरण कक्ष तयार केले आहे. विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी या कक्षाची यशस्वी चाचणी घेऊन हा उपक्रम प्रारंभ करण्यात आला आहे.

हा अजब-गजब निर्जंतुकीकरण कक्ष अनेक वैशिष्ट्यांनी युक्त आहे. यात अत्याधुनिक टिकाऊ तंत्रज्ञान, स्वयंचलित यंत्रणा, मानवरहित कार्यशैली, पर्यावरणपूरक साहित्य व सुलभ स्थापना आदी वैशिष्ट्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे कक्ष अतिशय अल्प खर्चात तयार झाले असून देखभालमुक्त व कुठेही नेता येऊ शकेल, असे तयार करण्यात आले आहे.

आठवत का आपली पहिली भेट कुठे झाली होती ?

या संयंत्राचा उपयोग शासकीय, निमशासकीय कार्यालय, कंपनी, उद्योग, संस्था, रुग्णालये, औषधालये, प्रयोगशाळा, राशन दुकाने, बसस्थानक, रेल्वेस्थानक, बँक, पेटोंल पंप, गॅस एजंसी, भाजीपाला मार्केट, विद्यापीठ, शाळा, महाविद्यालये आदी ठिकाणी प्रवेशद्वारावर करता येऊ शकतो. हा निर्जंतुकीकरण कक्ष तयार करण्यासाठी सतीश त्रिनगरीवार, आशुतोष कोरडे, सचिन मून, इम्रान अजीज खान, कैलास आदींनी सहकार्य केले.

धक्कादायकच! 60 हजार लोक बेरोजगार ?  

अशी आहे कार्यपद्धती
पाण्यात सोडिअम हायपोक्लोराईडचा निर्जंतुकीकरण द्रव्य म्हणून वापर केला जातो. हे द्रव्य सुरक्षितरीत्या साठवलेल्या टँकमधून पाइपद्वारे उच्च क्षमता पंपाच्या साहाय्याने धुके निर्माण करणार्‍या उच्च दर्जाच्या नोजलमधून निर्जंतुकीकरण कक्षातील व्यक्तीवर 7 ते 10 सेकंद फवारून त्या व्यक्तीचे निर्जंतुकीकरण केले जाते. या उपकरणामध्ये स्वयंचलित सेन्सर आहेत. व्यक्ती कक्षात प्रवेश करताच यंत्रणा सुरू होते व त्या व्यक्तीचे निर्जंतुकीकरण झाल्यास तसा बिपचा आवाज व एलईडी लाइटने दर्शविले जाते. या यंत्रामध्ये विजेसोबतच निर्जंतुकीकरण द्रव्याचा कमी वापर होतो. दिवसातील आठ तास चालल्यास 500 ते 650 व्यक्तीचे निर्जंतुकीकरण करू शकतो. जागतिक आरोग्य संघटना तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकारच्या व्यावसायिक मार्गदर्शक सूचनेनुसार या यंत्राची निर्मिती करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Experiment of Santization booth is successful