भयंकर! रुग्णाने तीन दिवसांत पिल्या खोकल्याचा दोन बॉटल, आराम न झाल्याने हे सत्य आले बाहेर...

Expiry drug to corona positive patients
Expiry drug to corona positive patients

यवतमाळ : जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. पॉझिटिव्ह रुग्ण कोरोनावर मात करीत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. डॉक्‍टर परिश्रम घेत असले तरी कर्मचारी त्यावर पाणी फेरत आहे. असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. 

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन वॉर्डात पुसद येथील एक रुग्ण २३ जुलैपासून भरती आहे. त्या दिवसापासून एक्‍सापयरी (मुदतबाह्य) झालेले औषध रुग्णांना देण्यात येत आहे. खोकल्याने त्रस्त असलेल्या रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप रुग्णाने केला आहे. कोरोनात खोकल्याचे प्रमाण वाढून ऑक्‍सिजन लेवल कमी होते. त्यामुळे रुग्णाची तब्येत खालावते अगदी असेच सदर रुग्णासोबतही झाले. 

पॉझिटिव्ह रुग्णाने भरती झाल्यापासून ३१ जुलैपर्यंत दोन बॉटल औषध पिऊन घेतले. मात्र, उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने औषधाची बॉटल बघितली. त्यातून एक्‍सपायरी झालेले औषध आपल्याला देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार लक्षात आला. दिवसभर आयसोलेशन वॉर्डात पिण्याच्या पाण्याच्या बॅरल आल्या नाहीत.

रविवारी (ता. दोन) हीच अवस्था होती. रुग्णांना पाणी मिळत नाही. सॅनिटायझर, मास्कचा अभाव आहे. डॉक्‍टरांकडून सलाईन लावण्याचा सल्ला दिला जातो. सलाईन संपल्यावर दोन-दोन तास काढली जात नाहीत. डॉक्‍टर परिश्रम घेत असले तरी कर्मचारी त्यावर पाणी फेरत असल्याचे रुग्णाचे म्हणणे आहे. 

रुग्णाने जिल्हाधिकारी, अधिष्ठाता यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही, असा आरोपदेखील करण्यात आला. जिल्हा शल्यचिकीत्सकांनीदेखील रुग्णासोबत खोकल्याच्या औषधाबाबत बोलण्यास नकार दिला. डॉ. महसकोल्हे हेदेखील दहा मिनिटांत पोहोचतो, असे म्हणत एक तास उशिराने पोहोचले. एका वार्डात १७ ते २० रुग्ण आहेत. त्यांना मास्कदेखील उपलब्ध करून देण्यात आले नाहीत. या निमित्ताने रुग्णालयातील कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

चौकशी करून माहिती देतो 
मी प्रत्येकाचे फोन उचलतो. रुग्णांवर चांगले उपचार झाले पाहिजे, यासाठी आमची यंत्रणा दिवसरात्र काम करीत आहे. सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न सुरूच आहे. औषधीबाबत काही तक्रार असल्यास चौकशी करून माहिती देतो. 
- डॉ. आर. पी. सिंह, 
अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ

घटनाक्रमाची माहिती घेण्याचे आदेश दिले 
रुग्णांना चांगले उपचार मिळावे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. प्रशासन म्हणून ज्या काही बाबीला प्राधान्य द्यायचे आहे, ते आम्ही देत आहोत. मला आलेले प्रत्येक कॉल घेतो. संबंधित व्यक्तीचा फोन आला होता. त्याची दखल घेत मी जिल्हा शल्यचिकित्सक व अधिष्ठाता यांना सूचना दिल्या. त्यानंतरच्या घटनाक्रमाची माहिती घेण्याचे आदेश दिले आहेत. 
- एम. डी. सिंह, जिल्हाधिकारी

संपादन - नीलेश डाखोरे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com