esakal | जिल्हाधिकारी आणि CEO च्या बनावट सह्या करून २० ते २५ जणांना गंडवले
sakal

बोलून बातमी शोधा

fraud

जिल्हाधिकारी आणि CEO च्या बनावट सह्या करून २० ते २५ जणांना गंडवले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : जिल्हा परिषदेतील विविध विभागात वर्ग-३ च्या नोकरीसाठी तत्कालीन जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची संगणकीकृत स्वाक्षरी वापरून बनावट आदेश दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. बल्लारपुरातील एका व्यक्तीकडून हा प्रकार करण्यात आला असून, त्याने जिल्हाभरातील २० ते २५ युवकांना लाखो रुपयांनी गंडविल्याची माहिती असून, जिल्हा परिषदेत चांगलीच खळबळ माजली आहे.

दरम्यान, सोमवारी हा प्रकार उजेडात आल्यानंतर मंगळवारी जिल्हा परिषदेकडून रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर पोलिसांनी मूळ आदेश मागितल्याने पुन्हा बुधवारी आदेश जमा करून तक्रार दिली जाणार असल्याची माहिती आहे. मात्र, या प्रकारामुळे जिल्हा परिषद चांगलीच हादरली असून, नोकरीचे बनावट आदेश देणारी टोळी सक्रीय असण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून, मिळेल ते काम युवक करण्यासाठी तयार होत आहेत. अशातच बल्लारपूरच्या एका व्यक्तीने काही युवकांना आपल्या जाळ्यात ओढून जिल्हा परिषदेतील कनिष्ठ साहाय्यक व परिचराच्या नोकरीचे बनावट आदेश माथी मारले. जिल्हा परिषदेत या प्रकारची कोणतीही भरती प्रक्रिया राबविली गेली नसताना २०१९-२० या आर्थिक वर्षात तत्कालीन जिल्हाधिकारी आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची संगणकीकृत स्वाक्षरी चोरून हे आदेश तयार करण्यात आले आहे.

हेही वाचा: घोटभर पाणी जीवावर बेतलं; अंजनगावात शेततळ्यात बुडून मायलेकींचा मृत्यू

दरम्यान, सोमवारी दोन ते तीन युवकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची भेट घेवून बनावट आदेश दाखविल्यानंतर त्यांनाही धक्काच बसला. बनावट आदेश देवून फसवणूक झालेले आणखी २० ते २२ युवक असल्याची माहिती त्या युवकांनीच सीईओंना देत बल्लारपुरातील एका व्यक्तीने हा गोरखधंदा केल्याचेही सांगितले. मात्र, एवढे गंभीर प्रकरण असताना जिल्हा परिषदेनेही तात्काळ निर्णय न घेता एक दिवसानंतर मंगळवारी रामनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यासाठी अधिकारी पोहचले. परंतु, पोलिसांनी मूळ कागदपत्र मागितल्याने या प्रकरणाच्या तक्रारीसाठी बुधवारचा दिवस उजाडणार आहे.

जिल्ह्यातील २० ते २२ युवक बल्लारपुरातील त्या व्यक्तीच्या जाळ्यात फसले असून, प्रत्येकाकडून ६ ते २० लाखापर्यंतची रक्कम उखळली आहे. दरम्यान, २०१९ - २० या आर्थिक वर्षात हे बनावट आदेश दिल्यानंतर तब्बल एक वर्ष काही युवकांनी नोकरीची वाट बघितली. परंतु, आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यानंतर शहानिशा करण्यासाठी जिल्हा परिषदेचे कार्यालय गाठले असता नोकरीच्या बनावट आदेशाचा पर्दाफाश झाला आहे. फसगत झालेल्या व्यक्तींमध्ये शासकीय कार्यालयात ७ ते ८ वर्ष काम केलेला एक व्यक्तीसुद्धा असल्याची माहिती सीईओ डॉ. मित्ताली सेठी यांनी 'पुण्य नगरी'शी बोलताना दिली. दरम्यान, जिल्हा परिषदेत घडलेला नोकरीच्या बनावट आदेशाचा हा खळबळजनक प्रकार पोलीस किती गंभीरपणे घेतात, याकडे लक्ष लागले आहे. सोमवारी आलेल्या युवकांनी बल्लारपूरच्या व्यक्तीचे नाव सांगितले असले तरी अशा प्रकारचे बनावट आदेश देणारी टोळी जिल्ह्यात सक्रीय असण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा: सलग चौथ्या दिवशी दिलासा; देशात सक्रीय रुग्णांच्या संख्येत घट

सोमवारी काही युवकांनी जिल्हा परिषदेत येवून नोकरीचे आदेश आपल्याला दाखविले. परंतु, ते पूर्णपणे बनावट असून, या प्रकरणाची पोलिसात तक्रार देण्याच्या सूचना केल्या आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून, जिल्हा पोलीस अधीक्षकांशी या संदर्भात चर्चासुद्धा करणार आहे. मात्र, युवकांनीही अशा प्रकारापासून सावध होणे गरजेचे आहे.

- डॉ. मित्ताली सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. चंद्रपूर

जिल्हा परिषदेतील नोकरीसाठी बनावट आदेश दिल्याचे प्रकरण समोर आले असून, या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर वकिलांचा सल्ला घेवून तक्रार देण्यासाठी अधिकारी रामनगर पोलीस ठाण्यात गेले होते. परंतु, पोलिसांकडून मूळ कागदपत्रांची मागणी केली असल्याने बुधवारी तक्रार दिली जाणार आहे. सोमवारी युवकांनी दिलेल्या तक्रारीसोबत असलेल्या बनावट आदेशावर तत्कालीन जिल्हाधिकारी आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची संगणकीकृत स्वाक्षरी स्कॅन करून टाकण्यात आली आहे.

- श्याम वाखर्डे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. चंद्रपूर

loading image
go to top