या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाहीच; 20 वर्षांपासून प्रतीक्षा

विरेंद्रसिंह राजपूत
रविवार, 26 जानेवारी 2020

सन 1980 मध्ये सर्वप्रथम बॅ. ए. आर. अंतुले मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांचे कर्जमाफ झाले व तेव्हापासून कर्जमाफ होते, या आशेने शेतकरी कर्जमाफीत गुरफटले गेले. एकविसाव्या शतकात 2008 मध्ये केंद्रात शरद पवार कृषिमंत्री असताना अशीच काहीशी भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांची कर्जमाफी केली गेली.

नांदुरा (जि.बुलडाणा) : आजपासून बरोबर 20 वर्षांपूर्वी शेतीच्या पिककर्जासाठी व पाइपलाइन, ठिबक अथवा शेतीच्या अन्य इतर कामासाठी राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज काढणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना आजही बँकांकडून कोणतेच कर्जमाफ झालेले नाही. कारण काय तर जमिनीच्या हेक्टरची मर्यादा किंवा बँकांनी अगोदर राबविलेले चुकीचे धोरण यामुळे हे असे अनेक शेतकरी गेल्या वीस वर्षांपासून कर्जमाफीपासून वंचित ठरले आहेत.

बँका कर्ज देत नसल्याने या शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या वेळेस खासगी सावकारांचे दरवाजे ठोठावण्याशिवाय पर्याय नसल्याने अशा शेतकऱ्यांचा शेतीतील नफा हा शून्यावर आल्याचे खरे वास्तव आहे. सन 1980 मध्ये सर्वप्रथम बॅ. ए. आर. अंतुले मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांचे कर्जमाफ झाले व तेव्हापासून कर्जमाफ होते, या आशेने शेतकरी कर्जमाफीत गुरफटले गेले. एकविसाव्या शतकात 2008 मध्ये केंद्रात शरद पवार कृषिमंत्री असताना अशीच काहीशी भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांची कर्जमाफी केली गेली.

महत्त्वाची बातमी - बच्चू कडू इन ॲक्शन, अधिकाऱ्यांवर कारवाईचा धडाका

सरसकटमध्ये निकषामुळे अडसर
आतापर्यंत झालेल्या सर्वच कर्जमाफीत सरसकटमध्ये निकष टाकले गेल्याने प्रत्येक वेळेस काहीना काही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित ठरत आले आहेत. त्यात दोन हेक्टरची मर्यादा असेल किंवा रकमेची सोबतच बँकांची चलाखी असेल, या ना त्या कारणाने आतापर्यंत कर्जमाफीपासून सुटलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज हे आजरोजी कितीतरी पटीत वाढले असून, ते कर्ज त्यांना भरणे शक्य नाही हे शासनाला व बँकांनाही ठाऊक आहे.

हेही वाचा - #Republic day 2020 : तिरंग्याच्या खाली एकवटण्याची गरज : बच्चू कडू

‘एनपीए’त कन्व्हर्ट करून दरवाजे बंद
पुन्हा कर्ज मागू नये ही त्यांची भूमिका ठाम झाल्याचे यावरून दिसून येत आहे. अशा खातेदार शेतकऱ्यांना ‘एनपीए’त कन्व्हर्ट करून त्यांचे दरवाजेच शासनाने बंद करून खासगी सावकारीच्या बाहुपाशात ढकलून दिले आहे. गेल्या वीस वर्षांपासून असे राज्यात लाखो शेतकरी अडकले असून ते कोणत्याच कर्जमाफीत बसणार नाहीत याची जणू तजवीज करून ठेवली आहे.

शेतकऱ्यांची अवस्था दयनीय
शेतकऱ्यांसाठी फक्त तडजोड नावाचे औषध तयार ठेऊन बँका असल्या तरी या तडजोडीतही अनेक शेतकरी बसण्याच्या मनस्थितीत नाही. कारण बँका तडजोड करून पुन्हा कर्ज देत नसल्याने खरे तर शेतकऱ्यांची अवस्था ही दयनीय होत असल्याचे वास्तव आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer loan free waiting for 20 years