हा हिवाळा की पावसाळा? नागरिकांमध्ये संभ्रम; अवकाळी पावसाने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

farmers are in trouble because of raining in November
farmers are in trouble because of raining in November

गडचिरोली : दिवाळीनंतर बऱ्यापैकी गुलाबी थंडी पडत असताना शुक्रवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हा पावसाळा आहे की, दोन्ही ऋतुंचा मिळून हिवसाळा झाला आहे, असा प्रश्‍न नागरिकांना पडला. अनेक ठिकाणी आलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या धानपिकाचे मोठे नुकसान झाले.

धान उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा अशी गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. आता खरीप हंगाम संपत आला असून कित्येक शेतकऱ्यांचे धान कापून झाले आहेत. पण, कापणी झाल्यानंतर धान शेतातच ठेवण्यात आले आहेत. शुक्रवारी आलेल्या पावसाने शेतात ठेवलेल्या धानाच्या कडपा पूर्ण भिजल्या. त्यामुळे शुक्रवारची रात्र शेतकऱ्यांसाठी वैऱ्याची रात्रच ठरली. 

जिल्ह्यातील चामोर्शी, कुरखेडा, देसाईगंज, गडचिरोली, अशा अनेक ठिकाणी पाऊस कोसळला. चामोर्शी, कुरखेडा येथे दुपारीच पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर सायंकाळी गडचिरोली येथे पावसाच्या सरी कोसळू लागल्या. अचानक आलेल्या पावसामुळे घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. दिवसभर ढगाळ वातावरण असले, तरी पावसाची विशेष चिन्हे नव्हती. त्यामुळे नागरिक निर्धास्त होते. पण, सायंकाळी अचानक वातावरण बदलले आणि पावसाच्या सरी कोसळू लागल्या. 

रात्री बराच उशिरापर्यंत चाललेल्या या पावसाने अनेक ठिकाणी नुकसान केले. अधूनमधून पावसाचा वेग वाढतच होता. त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडलेले नागरिक तिथेच अडकले. नागपूर व इतर ठिकाणांहून रात्री बसगाडी तसेच इतर खासगी वाहनातून प्रवास करून आलेल्या प्रवाशांनाही अडचणीचा सामना करावा लागला. 

हिवाळ्याला सुरुवात झाल्याने घरातील स्वेटर काढून वापरणाऱ्या नागरिकांना ऐनवेळी रेनकोट शोधायची वेळ या पावसाने आणली. त्यामुळे हा अचानक आलेला पाऊस शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी त्रासदायकच ठरला. शनिवारी सकाळी पाऊस नसला, तरी आदल्या रात्रीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी चिखल साचले होते. शेताच्या खाचरात पाणी साचून धान भुईसपाट झाले. 

विचित्र ऋतूबदल

पूर्वी हिवाळा, उन्हाळा, पावसाळा हे ऋतू क्रमवार यायचे. पण, मागील काही वर्षांत ऋतुचक्रच बिघडलेले दिसून येत आहे. कधी हिवाळ्यात पावसाळा, उन्हाळ्यात हिवाळा, पावसाळ्यात उन्हाळा, असे काहीसे झाले आहे. यंदा वर्षभर अधूनमधून पावसाने हजेरी लावल्याने नेमका कोणता ऋतू आहे, हेच समजेनासे झाले. मानवी प्रगतीचा उच्चांक गाठला जात असताना निसर्गाचे अतोनात नुकसानही होत आहे. त्यामुळेच निसर्गचक्राचे संतुलन बिघडून असे प्रकार घडत असल्याचे मत निसर्ग अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com