esakal | विदर्भातील शेतकऱ्यांची कापूसकोंडी; निम्मी खरेदी केंद्रे बंद; नोंदणी आणि खरेदी केंद्र भिन्न ठिकाणी
sakal

बोलून बातमी शोधा

Farmers are in trouble while selling cotton in Amravati

पश्‍चिम विदर्भ कापसाच्या उत्पादनाचा भाग आहे. विशेषतः अमरावती व यवतमाळ हे जिल्हे कापसाचे मुख्य उत्पादक जिल्हे आहेत. अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत ६५ हजार ३५४ क्विंटल तर यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक २ लाख ४४ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली

विदर्भातील शेतकऱ्यांची कापूसकोंडी; निम्मी खरेदी केंद्रे बंद; नोंदणी आणि खरेदी केंद्र भिन्न ठिकाणी

sakal_logo
By
कृष्णा लोखंडे

अमरावती :  कापसाच्या शासकीय खरेदीत शेतकऱ्यांना नोंदणी व खरेदी केंद्र भिन्न ठिकाणी दिल्याने प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. काही केंद्रे अपुऱ्या मनुष्यबळाअभावी तर काही केंद्रांवरील ग्रेडर कोरोना संक्रमित आढळल्याने खरेदी प्रभावित झाली आहे. शिवाय एफअेक्‍यू व एलआरए वन दर्जाचाच कापूस घेतल्या जात असल्याने विदर्भातील शेतकऱ्यांची कापूसकोंडी होऊ लागली आहे.

पश्‍चिम विदर्भ कापसाच्या उत्पादनाचा भाग आहे. विशेषतः अमरावती व यवतमाळ हे जिल्हे कापसाचे मुख्य उत्पादक जिल्हे आहेत. अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत ६५ हजार ३५४ क्विंटल तर यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक २ लाख ४४ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. अकोला, वाशीम व बुलडाणा जिल्हे चांगलेच माघारले आहेत. या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची कापूसकोंडी होऊ लागल्याचे चित्र आहे. यंदा सीसीआयने कापसाच्या खरेदीत हात आखडता घेत पणनलाही कमी केंद्रे दिली आहेत. नोंदणी केंद्र ज्याठिकाणी आहे तेथे खरेदी नसल्याने या तालुक्‍यातील शेतकऱ्यांना आवाक्‍याबाहेरील खरेदी केंद्रावर कापूस न्यावा लागत आहे. यासाठी त्याला वाहनखर्चाचा भूर्दंड मात्र सहन करावा लागत आहे. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

नक्की वाचा - घरी काम करणाऱ्या मजुरांनी स्लॅब टाकण्याची केली तयारी अन् तेवढ्यात आला धडकी भरवणारा आवाज

अमरावती जिल्ह्यात पणन महासंघाच्या अमरावती, दर्यापूर, मोर्शी, वरुड व अचलपूर या तालुक्‍यातील सात केंद्रांवर आजपर्यंत ४६ हजार ९३८ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. १४ हजार ५७६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी ९ हजार ४१४ शेतकऱ्यांना संदेश देण्यात आले आहेत. काही शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा संदेश दिल्यानंतरही ते आलेले नाहीत, असे पणन महासंघाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

अकोला जिल्ह्यातील सीसीआयची केंद्रे बंद असल्याच्या तक्रारी आहेत. ढगाळ वातावरणाचे कारण देत ही केंद्रे बंद ठेवण्यात आली. ग्रेडिंग व माप घेणे बंद केल्याने खरेदी प्रभावित झाली आहे, तर अकोट केंद्रावरील ग्रेडर कोरोना संक्रमित आढळल्याने येथील केंद्र बंद आहे. शेतकऱ्यांचा कापूस घरी पडून आहे. बुलडाणा जिल्ह्यात खामगाव झोनमध्ये खामगावसह मलकापूर, नांदुरा, चिखली येथे सीसीआयचे तर पणनचे जळगाव जामोद, देऊळगाव राजा, शेगाव येथे केंद्र आहे. 

सात केंद्रांवर खरेदी सुरू आहे. मात्र नोंदणी व खरेदी भिन्न ठिकाणी असल्याने शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना कापूस विकणे पसंत केले आहे. पाच हजार रुपये क्विंटल दराने कापूस विक्री सुरू आहे. वाशीम जिल्ह्यात मंगरूळपीर, अनसिंग येथे सीसीआयची खरेदी सुरू आहे. या दोन केद्रांसह तीन केंद्रांवर आतापर्यंत १५०० शेतकऱ्यांचा ३५०२ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा - कोरंभीच्या नदीपात्रात आढळलेल्या मृतदेहाची पटली ओळख; प्रियकराच्या मदतीनं केला पतीचा खून

यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक कापूस खरेदी

विभागात सर्वाधिक खरेदी यवतमाळ जिल्ह्यात झाली आहे. यवतमाळ, कळंब, आर्णी येथील पणनच्या केंद्रावर १ लाख ६ हजार तर, घाटंजी, राळेगाव, दारव्हा व वणी येथील सीसीआयच्या केंद्रावर १ लाख ३८ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. त्यातुलनेत खासगी खरेदीदारांनीही २ लाख २७ हजार क्विंटल कापसाची खरेदी करून शासकीय खरेदीतील कोंडी समोर आणली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ