शेतात राबतानाच चालवतात ढाबा, रस्त्यानं जाणाऱ्या गरजूंना देतात मोफत जेवण

संदीप रायपुरे
Sunday, 17 January 2021

तेरा एकर शेतीचे नियोजन अन्‌ पूर्णवेळ ढाब्याची जबाबदारी सांभाळायची. ते कशासाठी? तर रस्त्याने जाणाऱ्या गरजूंना विनामूल्य जेवण मिळावे आणि त्यांचे मन तृप्त व्हावे यासाठी.

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : सकाळी सहा वाजता उठायच अन् थेट शेत गाठायचं. तिथली काम आटोपून मग शेतातील ढाब्यात कामाला लागायच. तेरा एकर शेतीचे नियोजन अन्‌ पूर्णवेळ ढाब्याची जबाबदारी सांभाळायची. ते कशासाठी? तर रस्त्याने जाणाऱ्या गरजूंना विनामूल्य जेवण मिळावे आणि त्यांचे मन तृप्त व्हावे यासाठी. काही प्रेरणादायी कहाणी आहे, सामाजिक दायीत्व जोपासणऱ्या धानापुरातील अरुणा साळवे या शेतकरी महिलेची.

हेही वाचा - १८ वर्ष होवूनही झालं नाही बाळ, पती घरी येताच पत्नी मोठ्यानं किंचाळली अन् घडला थरार

गोंडपिपरी तालुक्‍यातील धानापूर येथील दिलीप साळवे यांची अहेरी- चंद्रपूर मुख्य मार्गावर तेरा एकर शेती आहे. रस्त्यालगत शेती असल्याने अनेक भुकेले लोक त्यांना नेहमी दिसायचे. त्यांच्यासाठी काहीतरी करावे या हेतूने त्यांनी शेतातच ढाबा सुरू  केला. सुरुवातीला त्यांनी ही सर्व जबाबदारी पेलली. पण काही कारणास्तव हा सारा भार त्यांची पत्नी अरुणा सावळे यांच्यावर आला. तेरा एकर शेतीत त्या धान, सोयाबीन, कापूस, हरभरा, गहू, कांदे, मिरची या पिकांचे उत्पादन घेतात. सकाळी सहा वाजतापासून शेतातील काम करतात. त्यानंतर दोन मुलींच्या शाळेची तयारी अन् मग ढाब्यावर स्वयंपाक बनविण्यापासून तर सर्वच नियोजन त्या करतात. रात्री उशिरापर्यत स्वयंपाकाचे काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा पहाटे उठून कामाला लागायचे. हा त्यांचा दिनक्रम आहे. बल्लारपूर, आल्लापल्लीपासून चिकनचा आस्वाद घेण्यासाठी या धाब्यावर खवय्ये येतात. मुख्य मार्गावरील अनेक अडलेल्या प्रवाशांना त्या विनामूल्य जेवण देतात. प्रत्येक दिवसातून असे अनेक प्रंसग येतात. पण आम्ही कधी पैशाचा हिशोब करीत नाही. माणुसकीच्या भावनेतून आम्ही अशा अडलेल्या, भुकेल्यांना विनामूल्य जेवण देत असल्याचे ते सांगतात. गेल्या दहा वर्षांपासून व्यवसायातून सामाजिक दायीत्व जोपासण्याचे त्यांचे अविरत कार्य सुरू  आहे.

हेही वाचा - काळोखात कुत्रासदृश्य प्राणी दिसल्यानं मारली काठी, समोर येताच वाचवा-वाचवा ओरडली

सामाजिक कार्य करण्यासाठी मनाची तयारी असणे आवश्‍यक असते. यातूनच प्रत्यक्षात ती साकारली जात असते. अरुणा साळवे यांनी याचाच प्रत्यय दिला आहे. महिला असूनही तेरा एकर शेतीच्या नियोजनासह ढाब्यावर अडलेल्यांना विनामूल्य जेवण देणाऱ्या अरुणा साळवेंची वाटचाल अनेकांसाठी प्रेरणेची शिदोरी ठरली आहे.

हेही वाचा - स्वदेशी लस नको रे बाबा! कोव्हॅक्सिनऐवजी कोव्हिशिल्ड लसीची मागणी; अनेक डॉक्टरांचा नकार

सासूंचीही मदत -
अरुणाताईंच्या सासू विठाबाई यांची त्यांना मोठी मदत मिळते. दुसऱ्या सासू शोभा वडस्कर या अंगणवाडी सेविका आहेत. पण त्याही आपली नोकरी पार पाडून पूर्णवेळ अरुणाच्या मदतीसाठी तत्पर असतात. अरुणा यांचे पती दिलीप साळवे, सासरे हरिशचंद्र साळवे, दिर विपील घाटे हे सर्वजण त्यांच्या मदतीला पूर्णवेळ असतात, असेही त्या सांगतात.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: female farmer provide meal to needy without money in gondpipari of chandrapur