शिवसेनेच्या पदासाठी मुंबईतील नेत्याला पन्नास लाखांची ऑफर; जिल्हाप्रमुख हटविण्यासाठी हालचाली

Fifty lakh offer for Shiv Sena post Chandrapur political news
Fifty lakh offer for Shiv Sena post Chandrapur political news

चंद्रपूर : राज्यात महाविकासआघाडीचे नेतृत्व मुख्यमंत्रीपदाच्या रूपाने शिवसेनेकडे आले. यापार्श्‍वभूमीवर राज्यात सेनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी जमीन सुपीक झाली. बऱ्याच वर्षांनंतर भरघोस उत्पन्न घेण्याची संधी असताना जिल्ह्यातील शिवसेनेचे काही आजी-माजी नेते अडगळीत फेकले गेले. याच नेत्यांनी एकत्र येत सध्या जिल्हाप्रमुख हटवा हा एकसूत्री कार्यक्रम सुरू केला आहे. त्यासाठी मुंबईतील सेनेच्या एका नेत्याला चक्क पन्नास लाखांची ऑफर दिल्याची जोरदार चर्चा आहे.

शिवसेनेचे जिल्ह्यात संदीप गिऱ्हे आणि नितीन मत्ते हे दोन जिल्हाप्रमुख आहेत. शिवसेनेचे वरोरा विधानसभा क्षेत्राचे तत्कालीन आमदार बाळू धानोरकर लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसवासी झाले. त्यानंतर तत्कालीन जिल्हाप्रमुख अनिल धानोरकर आणि सतीश भिवगडे यांना पदावरून हटविण्यात आले. त्यांच्या ऐवजी गिऱ्हे आणि मत्ते यांच्याकडे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांना त्यांचे कार्यक्षेत्र वाटून देण्यात आले.

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील सत्तासमीकरण बदलली. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आणि सेनेला चांगले दिवस आले. चांगल्या दिवसांचा लाभ उठविण्यासाठी आता पक्ष संघटनेत सक्रिय नसलेले सेनेचे काही पदाधिकारी सक्रिय झाले. त्यांनी एका श्रीमंत माजी जिल्हाप्रमुखाला हाताशी पकडले. पुन्हा जिल्हा प्रमुख करण्याचे आमिष देऊन त्याच्याच खर्चाने मुंबईवाऱ्या सुरू केल्या.

दोन्ही जिल्हा प्रमुखांविरोधात तक्रारीचा पाऊस पाडायला सुरवात केली. मुंबईतील नेत्यांही तक्रारकर्त्यांना नाराज केले नाही. लवकरच खांदेपालट करू, असे आश्‍वासन देऊन प्रत्येकवेळी त्यांची बोळवण केली. त्यामुळे यांचाही संयम सुटला आणि जिल्हाप्रमुख बदलविण्यासाठी ‘मुद्रास्त्र’ वापरण्याचे ठरविले. त्यासाठी मुंबईतील एका नेत्याला या चौकटीने पन्नास लाखांची ऑफर दिल्याची चर्चा आहे. मात्र, या नेत्याने ती धुडकावून लावली.

हे प्रयत्न सपशेल अपयशी ठरले. त्यानंतरही प्रयत्न सुरूच ठेवले. एका नेत्याला चारचाकी वाहनाचे आमिष देण्यात आले. परंतु, या नेत्याचेही ‘कदम’ डगमगले नाही. त्यानेही वाहन घेण्यास नकार दिला. सध्या या ऑफरची जोरदार चर्चा सेनेच्या वर्तुळात रंगली आहे.

आमच्या विरोधात तक्रारी
पक्षसंघटनेत कोणतेही योगदान नसलेल्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांकडून आमच्या विरोधात तक्रारी केली जात आहे.
- संदीप गिऱ्हे,
जिल्हाप्रमुख शिवसेना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com