मतदान केंद्रावर दोन गटांत हाणामारी; शेंबाळपिंपरी येथील घटना; पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

टीम ई सकाळ
Friday, 15 January 2021

मतदान सुरू असताना प्रभाग चारच्या मतदान केंद्रावर मतदानासाठी उभ्या असलेल्या व्यक्तीला धक्का मारल्याच्या कारणांवरून दोन गटात हाणामारी झाली. त्यामुळे जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.

शेंबाळपिंपरी (जि. यवतमाळ) : येथील ग्रामपंचायतीच्या 17 जागांसाठी होत असलेल्या मतदानाला हिसेंचे गालबोट लागले. जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत गावातील प्रभाग क्रमांक तीन, चार, पाच व सहा या वॉर्डांमधील सदस्य निवडीसाठी मतदान सुरू असताना प्रभाग चारच्या मतदान केंद्रावर मतदानासाठी उभ्या असलेल्या व्यक्तीला धक्का मारल्याच्या कारणांवरून दोन गटात हाणामारी झाली. त्यामुळे जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.

अधिक माहितीसाठी - मन सुन्न करणारं वास्तव! जीवाचं रान करून वाढवलेल्या जीवांना खड्ड्यात पुरण्याची आली वेळ

एकाच इमारतीत चार मतदान केंद्र असल्यामुळे मतदान करण्यासाठी मतदारांची संख्याही मोठी होती. त्यामुळे अचानक झालेल्या या हाणामारीने एकच गोंधळ उडाला. आवारातील जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला.

सदरील केंद्र अतिसंवेदनशील म्हणून नोंद असून, पुरेसा पोलिस बंदोबस्तही तैनात होता. परंतु, मतदानाच्या प्रारंभापासूनच मतदारांव्यतिरिक्त इतर लोकांचा संचार जास्त होता. अचानक उद्‌भवलेल्या या परिस्थितीत पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला. 

नक्की वाचा - नवनीत राणांनी घेतला उखाणा अन् उपस्थितांच्या तोंडी एकच वाक्य 'वाह वाह क्या बात है!'

परंतु, मतदारांची झालेली धावपळ पाहता अनेकांनी मतदान न करताच घर गाठले. राखीव पोलिस बलाचे जवान बंदोबस्तावर आहेत. वृत्तलिहेस्तोवर पोलिसांकडून कुणावरही कारवाई करण्यात आलेली नव्हती.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fighting between people while voting in Yavatmal