425 वर्षांची परंपरा जोपासत रुक्‍मिणीची पालखी पंढरपूरला रवाना 

प्रशिक मकेश्‍वर 
मंगळवार, 30 जून 2020

विदर्भातील एकमेव कौंडण्यपूर येथील माता रुक्‍मिणीच्या पालखीने आज पंढरपूरसाठी प्रस्थान केले. दरवर्षी या पालखीसोबत 300 पेक्षा जास्त वारकरी पायी जात असतात, परंतु यावर्षी पालखीसोबत मोजकेच 20 वारकरी गेले.

तळेगाव ठाकूर (अमरावती) :  विदर्भातील प्रती पंढरपूर व रुक्‍मिणीचे माहेरघर असलेल्या तिवसा तालुक्‍यातील कौंडण्यापूर येथील देवी रुक्‍मिणीची पालखी आज कोरोनाच्या महामारीमुळे एस. टी. महामंडळाच्या बसमधून पंढरपूरकडे रवाना झाली. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. 

हे वाचा— चिदानंद रुपम शिवोहम शिवोहम 
 

विदर्भातील एकमेव कौंडण्यपूर येथील माता रुक्‍मिणीच्या पालखीने आज पंढरपूरसाठी प्रस्थान केले. दरवर्षी या पालखीसोबत 300 पेक्षा जास्त वारकरी पायी जात असतात, परंतु यावर्षी पालखीसोबत मोजकेच 20 वारकरी गेले. येथील 425 वर्षांची परंपरा कायम ठेवत यावर्षी कोरोना महामारीमुळे पंढरपूरसाठी राज्यातील केवळ 9 मानाच्या पालख्यांना परवानगी देण्यात आली. त्यात विदर्भातील एकमेव कौंडण्यापूरच्या पालखीचा समावेश आहे. रुक्‍मिणी माता आपल्या सासरी पंढरपूरला बुधवारी (ता. एक जुलै) पोहोचणार असून या पालखीला मुख्य मान पंढरपूरला असतो. त्यामुळे शासनाच्या परवानगीने व पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नाने ही पालखी रवाना करण्यात आली. सकाळी आठ वाजता शासकीय पूजा करीत मंदिराच्या परिसरात काही वेळ रिंगणसोहळा व फुगडी खेळत नाचतगाजत पालखीला रवाना करण्यात आले. 
या वेळी पालकमंत्री यशोमती ठाकूर, त्यांची कन्या आकांशा, संस्थांचे अध्यक्ष नामदेवराव अमाळकर, सचिव सदानंद साधू, शिवसेनेचे राजेश वानखडे, आरती वानखडे, नगराध्यक्ष वैभव वानखडे, उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझले, जिल्हा परिषद सभापती पूजा आमले, पंचायत समिती सभापती शिल्पा हांडे, उपसभापती शरद वानखडे, अब्दुल सत्तार, कौंडण्यपूरचे सरपंच श्री. धावणे, रितेश पांडव, रवींद्र हांडे, मुकुंद पुनसे उपस्थित होते. 

हे वाचा— 'मी त्याच्यावर जीवापाड प्रेम केले, पण त्याचे प्रेम नव्हतेच', अशी चिठ्ठी सापडली आणि...
 

वारकऱ्यांच्या कोरोना चाचण्या 
शासनाच्या आदेशानुसार कौंडण्यपूर येथील मानाची पालखी एस. टी. महामंडळाच्या बसने रवाना करण्यापूर्वी 20 वारकऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनाने एसटी बस निर्जंतुकीकरण करण्यात आली. 

425 वर्षांची परंपरा कायम राहावी, या उद्देशाने कॅबिनेटच्या बैठकीत कौंडण्यपूर येथील पालखी पंढरपूरला जावी हा विषय मी मांडला. त्यानंतर पालखी जाण्यासाठी मान्यता मिळाली. कोरोना महामारी कायमची जाऊ दे, गोरगरीब, मजूर व शेतकऱ्यांच्या पदरी सुखसमृद्धी येऊ दे, असे साकडे यानिमित्ताने मी देवाला घालते. 
- यशोमती ठाकूर, पालकमंत्री, अमरावती. 

20 वारकऱ्यांसह इन्सिडेंट कमांडर तहसीलदार वैभव फरतारे व पोलिसांची एक तुकडी पाठविण्यात आली आहे. पंढरपूरला जाणाऱ्या सर्वांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या आहेत. पालखी परत आल्यावर कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जे नियम आहेत त्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. 
- नरेंद्र फुलझले, उपविभागीय अधिकारी, तिवसा. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Following the tradition of 425 years, Rukminini's palanquin left for Pandharpur