ब्रेकिंग : दिलेला शब्द पाळणारा नेता अ‍ॅड. अनंतराव देवसरकर यांचे निधन

अनिल काळबांडे
Thursday, 26 November 2020

१९७८ मध्ये उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले. त्यांची ही कारकीर्द लक्षणीय ठरली. १९८३-८४ मध्ये ते पुसद बार असोसिएशनचे अध्यक्ष होते. त्यानंतर १९८६ ते ९२ या काळात यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच वसंत सहकारी साखर कारखाना पोफाळी ते संचालक होते.

उमरखेड (जि. यवतमाळ) : महागाव विभागाचे लोकनेते तथा माजी आमदार अ‍ॅड. अनंतराव देवसरकर (वय ८८) यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.

एक जुलै १९३६ उमरखेड तालुक्यातील देवसरीत त्यांचा जन्म झाला. देवसरी येथेच १९४२ ते ४५ पर्यंत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर १९४६ ते ५५ पर्यंत उमरखेड येथे त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. शालेय जीवनात विविध क्षेत्रातील त्यांची कामगिरी लक्षणीय होती. क्रीडा, वक्तृत्व व अभ्यासात त्यांनी नैपुण्य प्राप्त केले होते. त्यानंतर १९५५ ते ५७ या काळात अमरावती येथे महाविद्यालयीन जीवनात त्यांनी शिक्षण छात्रसंघाचे जनरल सेक्रेटरी म्हणून कार्य केले आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग घेतला होता.

जाणून घ्या - वाघाचा मागोवा घेण्यासाठी वनविभागाचे पथक जंगलात घालत होते गस्त; समोरचे दृष्य पाहताच बसला धक्का

१९५७ ते ६१ मध्ये त्यांनी नॅशनल कॉलेज व हिस्लॉप कॉलेज नागपूर येथून बीएची पदवी प्राप्त केली. १९६१-६२ दरम्यान त्यांनी अध्यापनाचे कार्य केले आहे. त्यानंतर १९६२-६५ विधी महाविद्यालय नागपूर येथून एलएलबीची पदवी मिळविली. याच काळात ते विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते. त्यानंतर १९६५ पासून त्यांनी पुसद येथे वकिली व्यवसायास सुरुवात केली. १९६६ मध्ये अखिल भारतीय कुर्मी विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांची नागपूर विद्यापीठावर निवड झाली.

१९७२-७६ दरम्यान ते यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी युनियनचे अध्यक्ष होते. १९७४ मध्ये त्यांनी युरोपियन राष्ट्रांचा दौराही केला होता. १९७७ मध्ये ते पुसद सूतगिरणीचे अध्यक्ष होते. उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्दल हैदराबाद येथे सुवर्णपदक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. दरम्यान कृषी विद्यापीठाचे सदस्य व नागपूर विद्यापीठ सिनेट सदस्य म्हणून त्यांची कारकीर्द लक्षणीय ठरली.

सविस्तर वाचा - ऐटीत खरेदी करायला गेला पोलिसांची वर्दी; दुकानदाराला आला संशय आणि घडली जेलवारी

१९७८ मध्ये उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले. त्यांची ही कारकीर्द लक्षणीय ठरली. १९८३-८४ मध्ये ते पुसद बार असोसिएशनचे अध्यक्ष होते. त्यानंतर १९८६ ते ९२ या काळात यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच वसंत सहकारी साखर कारखाना पोफाळी ते संचालक होते.

त्यानंतर १९९२ मध्ये यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांची अविरोध निवड झाली. १९९३ मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या विभागीय कार्यालय नागपूरच्या अध्यक्षपदी त्यांची अविरोध निवड झाली. १९९५ ला वसंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून ते निवडून आले.

अधिक वाचा - पाण्याच्या कॅनलमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; अवस्था बघून उपस्थितांच्या पायाखालची सरकली जमीन

दिलेला शब्द पाळणारा नेता

उत्कृष्ट प्रशासक, शिस्तप्रिय राजकारणी, एक तत्त्वज्ञ, शब्दाला जागणारे व दिलेला शब्द पाळणारा राजकीय नेता म्हणून ओळख त्यांची ओळख होती. शैक्षणिक क्षेत्रात मैलाचा दगड ठरणारे त्यांचे कार्य यवतमाळ जिल्हा कुणबी समाज संस्थेच्या शैक्षणिक संकुलाच्या रूपाने जिल्हाभर पाहायला मिळतात. १९९९ साली उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून ते निवडून आले. २००१ मध्ये त्यांच्या कार्याची दखल घेऊन जनतेने स्वंयस्फतीने मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते नागरी सत्कार घडवून आणला होता.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former MLA Adv. Anantrao Deosarkar passed away