मुलाच्या प्रेमसंबंधावरून वडिलांचे झाले होते अपहरण; आता पुढे...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 April 2020

बोराखेडी पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. दरम्यान, आरोपींनी सतीश सुपे यांना जंगल परिसरात नेऊन बेदम मारहाण केली.

मोताळा (जि.बुलडाणा) : नांदुरा तालुक्यातील शेंबा येथील 53 वर्षीय व्यक्तीचे घरातून अपहरण करून त्यांना बेदम मारहाण झाल्याची घटना 18 मार्च रोजी घडली होती. यातील चौघा आरोपींच्या बोराखेडी पोलिसांनी मंगळवारी (ता.21) मुसक्या आवळल्या. त्यांना न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.

नांदुरा तालुक्यातील शेंबा येथील सतीश प्रभाकर सुपे (वय 53) यांना 18 मार्चला दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास काही अनोळखी व्यक्तींनी शेंबा येथील घरातून ओढत जबरदस्तीने दुचाकीवर बसवून घेऊन गेले होते. यावेळी त्यांचा मुलगा तुषार सुपे याने मज्जाव केला असता, त्याला लोटपाट करण्यात आली होती. सतीश सुपे यांचा मुलगा प्रितेशच्या प्रेमसंबंधाच्या कारणावरून अनोळखी व्यक्तींनी वडिलांचे अपहरण केल्याची तक्रार तुषार सतीश सुपे याने बोराखेडी पोलिसांत दिली.

आवश्‍यक वाचा - ...या गावाने टाळली बँकेत होणारी गर्दी; कोरोनाच्या लढ्यात गावाचे नाव पोहचले दिल्लीपर्यंत

यावरून बोराखेडी पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. दरम्यान, आरोपींनी सतीश सुपे यांना जंगल परिसरात नेऊन बेदम मारहाण केली. त्यानंतर जखमी सतीश सुपे यांना 18 मार्चच्या सायंकाळी जवळा फाट्यानजीक सोडून आरोपी पसार झाले होते. दरम्यान, बोराखेडीचे पोलिस निरीक्षक माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनात पीएसआय अशोक रोकडे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवीत आरोपींचा छडा लावला. तब्बल एक महिन्यानंतर मंगळवारी मध्यरात्री पोलिसांनी आरोपी आतिषसिंग परमेश्वरसिंग राजपूत (वय 33, रा. दाताळा) याला शिताफीने पकडले.

हेही वाचा - अरे वा! लग्न लागले मात्र, मंगलाष्टकात नव्हे तर राष्ट्रगीताने

तर, शेख इम्रान शेख इसा (वय 25), धर्मेंद्रसिंग उर्फ भूषण जीवनसिंग राजपूत (वय 24), अमोलसिंग उर्फ गिल्लू जीवनसिंग राजपूत (वय 31) सर्व रा. दाताळा या तिघांना मंगळवारी दुपारी अटक करण्यात आली. पोलिसांनी चौघा आरोपींना आज (ता.21) नांदुरा येथील न्यायालयात हजर केले असता, त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अशोक रोकडे, पोकाँ संजय गोरे करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four arrested in Shemba kidnapping case, accused given four-day PCR