QR कोड स्कॅन करताय? जरा थांबा...

संतोष ताकपिरे
Thursday, 14 January 2021

संपर्क साधणाऱ्याने स्वत:ला सैन्यदलात कार्यरत असल्याचे सांगितले. महिला व्यावसायिकेचा विश्‍वास बसावा यासाठी त्याने स्वत:चे ओळखपत्र दाखविले.

अमरावती : फौजी असल्याची बतावणी करून एका तोतयाने शहरातील एका महिला व्यावसायिकाची तब्बल 85 हजार 100 रुपयांनी फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली. शहर सायबर पोलिसांनी याप्रकरणी तोतया फौजीविरुद्ध फसवणुकीसह आय. टी. ऍक्‍ट अन्वये गुन्हा दाखल केला.

हेही वाचा - बहिण भावाला बोलवायला गेली, खिडकीतून दृश्य बघताच मोठ्यानं किंचाळली

सदर महिला फायर इक्विपमेंट विक्रीचा व्यवसाय करते. काही दिवसांपूर्वी महिला व्यावसायिकासोबत एका व्यक्तीने मोबाईलवरून संपर्क साधला. संपर्क साधणाऱ्याने स्वत:ला सैन्यदलात कार्यरत असल्याचे सांगितले. महिला व्यावसायिकेचा विश्‍वास बसावा यासाठी त्याने स्वत:चे ओळखपत्र दाखविले. तोतया फौजीने महिलेकडून फायर इक्विपमेंट खरेदी करायचे असल्याची बतावणी केली. त्यासाठी महिलेच्या खात्यावर पैसे पाठवीत असल्याचे सांगितले. अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावर इक्विपमेंट विकल्या जाणार, या अपेक्षेने महिलेने तोतया फौजीसोबत व्यवहार करण्यास होकार दिला. त्यासाठी महिलेचा क्रमांक माहिती करून घेण्यासाठी तिला पाच रुपये पाठविण्यास सांगितले.

हेही वाचा - लग्नानंतरच दीड वर्षात झाले पतीचे निधन, तरीही खिचडी शिजविली तिथेच गाठले नगराध्यक्षपद

महिलेने पाच रुपये फोन पे वरून पाठविले. त्यानंतर तोतयाने चार ते पाच वेळेस क्‍यूआरकोड पाठवून स्कॅन करण्याचा सल्ला दिला. महिलेने तोतया फौजीने सांगितल्याप्रमाणे कृती केली असता चार टप्प्यात प्रत्येकी 20 हजार रुपये, तर पाचव्यांदा पाच हजार, असे एकूण 85 हजार रुपयांची रोख रक्कम तोतयाने महिला व्यावसायिकाच्या खात्यातून परस्पर हडपली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने सायबर पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

हेही वाचा - हृदयद्रावक! खेळता-खेळता स्वयंपाकघरात पोहोचली, आई गंSSS ओरडली अन् सोडला जीव

अनोळखी व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार करताना प्रत्येकाने सतर्क राहणे गरजेचे आहे. स्वत:च्या खात्याची कुठलीही गोपनीय माहिती अनोळखी व्यक्तीला पाठवू नये.
-रमेश टाले, पोलिस निरीक्षक, सायबर ठाणे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fraud with traders by scanning QR code in amravati